मा. जिल्हाधिकारी महोदय,
वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असताना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी तुमच्या कार्यपद्धतीविषयी टिका केली होती. आता तुमच्याकडे तो पदभार नाही. त्यामुळे तुमच्या तेथील कारभाराविषयी आम्हाला आता प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. मात्र तुम्ही 26 मार्च 2020 (जावक क्र. 2323/2020) रोजी वसईतील अग्रवाल हॉस्पिटल ताब्यात घेऊन तेथील भूलतज्ज्ञ डॉ. राजेश त्रिमुखे यांची सेवा न घेता जागा खाली करायला लावून, तेथील हॉस्पिटल बंद करुन त्याजागी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या योजनेतून, तुम्हाला नेमके काय साध्य करायचे होते, याबाबत आम्हाला समजून घ्यायचे आहे.

विक्रमगड तालुक्यातील रिव्हेरा हॉस्पिटल येथे पूर्वी सीबीएससी शाळा होती. परिसरातील लोकांना अवाढव्य फि न परवडल्यामुळे ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. मग येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा घाट घातला गेला. तपासणीच्या दिवशी शाळेच्या फलकावर हॉस्पिटलचे बोर्ड लागले. विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचे वॉर्ड झाले. प्रयत्न अयशस्वी ठरला. मग पुन्हा रुग्णालयासारखी एक अतिरिक्त इमारत बांधण्यात आली. मात्र तरीही येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले नाही कारण प्रत्यक्षात तेथे हॉस्पिटल अस्तित्वात नव्हतेच. दरम्यान शाळा देखील पूर्णपणे बंद झाली. तुम्ही ही वास्तू ताब्यात घेऊन तेथे लाखो रुपये खर्च करुन 200 खाटांचे डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल व 150 खाटांचे कोव्हीड केअर सेंटर बनविले. रिव्हेराच्या संचालकांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण केलेत. अन्य शासकीय रुग्णालयातील सेवा विस्कळीत करुन तेथील डॉक्टरांना येथे तैनात करण्यात आले. येथे नेमके किती व कशावर पैसे खर्च झाले? रिव्हेरा हॉस्पिटल नावाची इमारत तुम्ही भाड्याने घेतली की मोफत? अशी सर्व माहिती आम्हाला समजून घ्यायची आहे.
सर्वात महत्वाचा विषय म्हणजे, डहाणू तालुक्यातील 500 खाटांचे रुग्णालय सलग्न असलेल्या वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ह्या वैद्यकीय महाविद्यालयात तुम्ही सुरु केलेल्या 250 खाटांच्या डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटलमध्ये व 250 खाटांच्या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 0 का आहे? तुम्ही तेथे रुग्ण दाखल करत नाही कि व्यवस्थापन दाखल करुन देत नाही? तुम्ही हॉस्पिटल बंद करुन क्वारन्टाईन सेंटर सुरु करता, लाखो रुपये खर्चून नव्याने एखादे हॉस्पिटल उभे करता, मग आस्तित्वातील 500 खाटांच्या हॉस्पिटलचा उपयोग का करुन घेत नाही आहात? तुमचा अभ्यास कमी आहे की तुम्ही अर्थपूर्ण रितीने झोपेचे सोंग घेता आहात? दोन्ही बाबी गंभीर आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोपी करुन सांगतो.
8 जानेवारी 2020 रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी वेदांतामध्ये गेलो होतो. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वाणेरे तेथे उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते तेथे वृक्षारोपण देखील करण्यात आलेले आहे. मी उत्कंठा म्हणून तेथील आयसीयू विभागात गेलो. तेथे फलकावर 3 डॉक्टरांची नावे होती. 1. डॉ. राजेश यादव, 2. अमरीश पांडे, 3. जिलानी अन्सारी हे तीनही डॉक्टर बीएएमएस होते. त्यांचे वरिष्ठ डॉ. युवराज शिंदे हे एमबीबीएस डॉक्टर होते. डॉ. अमोल घुले नावाचे प्राध्यापक हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. संपूर्ण हॉस्पिटल रिकामे होते. सर्जीकल आयसीयू मध्ये एक त्वचारोग झालेला रुग्ण उपचार घेत होता. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो. रुग्णालयात फेरफटका मारला व दुपारी 1 वाजता बाह्य रुग्ण विभागात गेलो. ईएनटी विभागासाठी केस पेपर काढला. मी दिवसभरातील चौथा पेशंट होतो. मला 5 रुपये भरुन केस पेपर क्र. 090120575 मिळाला. तो घेऊन ईएनटी विभागात गेलो. तेथे कोणीही नव्हते. मग अर्धा तास थांबून एक फोटो काढला आणि परतलो. तेथे कुठेही डॉक्टरांच्या नावांचा फलक नव्हता. मी यादी मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तेथे गुप्ता नावाचे व्यवस्थापक होते. यांची भेट घेताना मोबाईल व्यवस्थापनाच्या ताब्यात द्यावा लागतो. संभाषण रेकॉर्ड होण्याची यांना भीती असते. मी अट मान्य केली नाही. व्यवस्थापनाला इमेल करुन माहिती मागितली. मात्र उत्तर मिळाले नाही.

मग मी हे वैद्यकीय महाविद्यालय कसे सुरु झाले ह्याबाबत अभ्यास सुरु केला असता, माझ्या हाती मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या 8 डिसेंबर 2015 रोजीच्या निर्देशानुसार डॉ. बी. सी. दत्ता, डॉ. उज्वल भट्टाचार्य, डॉ. पी उषाकिरण यांचा दिनांक 14 डिसेंबर 2015 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन सादर केलेला अहवाल हाती आला. हे पथक आलेले असताना, एकही रुग्ण दाखल नव्हता. पॅथोलॉजी, मायक्रोबॉयलॉजी, फार्माकोलॉजी, फॉरेन्सिक मेडिसिन, कम्युनिटी मेडिसिन, आरोग्य केंद्र हे विभागच नव्हते. एकही टिचींग स्टाफ उपलब्ध नव्हता. कुठल्याही विभागात निवासी डॉक्टर नव्हता. हॉस्पिटल सुरु होणे बाकी होते. एक डॉक्टर छोट्याशा कन्सल्टींग मध्ये सेवा देत होता. एकंदरीत सगळीच बोंबाबोंब होती.
वेदांताने 29 डिसेंबर 2018 रोजी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडे सादर केलेल्या कागदोपत्रांत वेदांतकडे 81 प्राध्यापक आणि 48 निवासी डॉक्टर आहेत. मेडिकल काऊन्सिलच्या नियमावलीनुसार (मिनिमम स्टॅण्डर्ड रिक्वायर्ड क्लॉस बी 1.11 नुसार) वैद्यकीय महाविद्यालयाच्या डिनसह सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक यांची यादी दर्शनी भागात व संकेतस्थळावर प्रदर्शित करणे बंधनकारक असताना ती गुलदस्त्यात ठेवलेली आहे. मागूनही मिळत नाही. तुमच्याकडे मात्र साथ रोग नियंत्रण करताना अमर्याद अधिकार आहेत. त्याचा योग्य वापर करण्याची संधी तुमच्याकडे उपलब्ध होती.
जिल्हाधिकारी महोदय, वेदांता विषयी खूप काही मांडता येईल. पण तो स्वतंत्र विषय आहे. तूर्तास इतकेच सांगतो की 500 खाटांचे वेदांत हॉस्पिटल कधीही किमान क्षमतेनेही चलल्याचे कोणी पाहिले नाही. इतक्या लांब दुर्गम भागात, खड्डेयुक्त रस्त्याने गेल्यानंतर उपचार होत नसतील तर कोणी कशाला जाईल? रुग्णालय व्यवस्थापनाला देखील व्याप नकोच आहे. तुम्ही शासनाचे पैसे खर्चून तातडीने वेदांत कडे जाणारा रस्ता बनवून घेतला. आणि वेदांताने जसे कागदावर वैद्यकीय महाविद्यालय उभे केले तसेच तुमच्या कागदावर 250 खाटांच्या डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटलमध्ये व 250 खाटांच्या डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर उभे राहिले. तुमच्यावर पालकमंत्री आणि मुख्यमंत्री खूष झाले असतील. पण प्रत्यक्षात काय? तुम्ही प्रेस नोट द्वारे दिलेल्या माहितीप्रमाणे येथे (0) शून्य रुग्ण दाखल आहेत. ह्या गोष्टीवर तुम्ही देखील शुन्यावर नापास ठरता. तुम्हीच नाही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन देखील नापास ठरतात. अशी पोकळ यंत्रणा उभारुन कोरोनाशी मुकाबला होणार नाही. केवळ जनतेची फसवणूक होईल.

मा. जिल्हाधिकारी महोदय, खरच तुम्हाला आणि डॉ. कांचनना काही कळलेच नाही? की तुम्ही मुद्दामहून झाकलेली मुठ झाकूनच ठेवली? काहीही असले तरी ते पालघर जिल्ह्यासाठी दुर्दैवीच आहे. तुम्ही वेदांतचे व्यवस्थापन, त्यातील सेवा न देणारे डॉक्टर (खरेच असल्यास) यांना इशारे दिलेत का? त्यांच्यावर काही कारवाई केली का? ह्या प्रश्नांची आम्हाला उत्तरे हवी आहेत.
– संजीव जोशी [email protected]
संपादक – दैनिक राजतंत्र / rajtantra.com
वैयक्तिक संपर्क : 9822283444
Rajtantra Media 9890359090
महोदय, तुम्ही समजता तितकी जनता मुर्ख नाही हे लक्षात ठेवा! (क्रमशः)