जव्हारमध्ये बेजबाबदारीमुळे कोरोनाचा प्रसार होत असताना, प्रशासन झोपले होते का? जिल्हाधिकारी महोदय उत्तर द्या!

संजीव जोशी (संपादक दैनिक राजतंत्र
[email protected] / 9822283444
दिनांक 18/06/2020

जव्हार येथील सदानंद हॉस्पिटलमध्ये सेवेत असलेल्या एका लॅब टेक्निशिअन वर शासनाचा मनाई आदेशाचा भंग करुन हळदीचा कार्यक्रम आयोजीत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी लग्नसमारंभ आयोजीत केल्यामुळे दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. हळदीचा कार्यक्रम 10 जून रोजी मोखाडा तालुक्यात व लग्नाचा कार्यक्रम 11 जून रोजी जव्हार तालुक्यात झाल्याने अनुक्रमे मोखाडा व जव्हार येथे स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पण हे दोन्ही समारंभ खूलेपणाने होत असताना प्रशासन झोपले होते का?

जव्हार येथील सदानंद हॉस्पिटलमध्ये सेवेत असलेल्या एका लॅब टेक्निशिअन वर शासनाचा मनाई आदेशाचा भंग करुन हळदीचा कार्यक्रम आयोजीत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी लग्नसमारंभ आयोजीत केल्यामुळे दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. हळदीचा कार्यक्रम 10 जून रोजी मोखाडा तालुक्यात व लग्नाचा कार्यक्रम 11 जून रोजी जव्हार तालुक्यात झाल्याने अनुक्रमे मोखाडा व जव्हार येथे स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. पण हे दोन्ही समारंभ खूलेपणाने होत असताना प्रशासन झोपले होते का?

आता प्रशासन गुन्हे दाखल करुन काहीतरी केल्याचे दाखवत आहे. परंतु त्यामुळे प्रश्न सुटणार आहे का? हे गुन्हे 10 व 11 जून रोजी घडले असताना, ते 16 जून रोजी उशीराने दाखल का झाले? त्याची कारणे वेगळी आहेत आणि ती झाकण्याचा प्रयत्न केलात तरी झाकली जातील अशा भ्रमात जिल्हा प्रशासनाने राहू नये. पालघर जिल्ह्यामध्ये हजारो गुन्हे दाखल झालेत, त्यामध्ये आणखी 2 गुन्ह्यांची भर पडल्याने काय साध्य होणार आहे? 17 एप्रिल 2020 रोजीच्या महाराष्ट्र राज्याच्या शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी नसावा असे नमूद असताना मोखाडा येथे पोलीस पाटलांने दाखल केलेला आणि जव्हार येथे ग्रामसेवकाने दाखल केलेला गुन्हा कायद्याच्या कसोटीत टिकेल किंवा नाही हे पुढे स्पष्ट होईलच. पण हे गुन्हे अपराध घडल्यानंतर दाखल होण्याऐवजी प्रतिबंध का केला गेला नाही, हा कळीचा मुद्दा आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या प्रतिबंधक उपायांचे नक्कीच अपयश आहे.

जिल्हाधिकारी मा. कैलाश शिंदे महोदय, आपण जिल्हाधिकारी कार्यालयाची सुरक्षा चोख ठेवलेली असली तरी जिल्ह्यात कोरोनाचा मुकाबला तुमच्या कर्तबगारीपेक्षा दैवावरच जास्त अवलंबून आहे. डहाणू पोलीस स्टेशनमध्ये पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या पोलीसाला ड्यूटीवर ठेवल्याचे प्रकार घडले. होम क्वारन्टाईनचा वैद्यकीय सल्ला झुगारुन पोलीसांना ड्युट्या देण्यात आल्या. तुमच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही तुम्ही काहीच केले नाही. त्यामुळे होम क्वारन्टाईन हे फक्त सामान्य लोकांचा छळ करण्यापुरती नौटंकी आहे असा गैरसमज पसरणे स्वाभाविक होते. आणि झालेही तसेच! जव्हारमध्ये सदानंद हॉस्पिटलच्या डॉक्टरनेही होम क्वारन्टाईनचा सल्ला मानला नाही आणि त्याच्या स्टाफनेही मानला नाही.

जव्हारमध्ये नेमके काय घडले, प्रथम समजून घ्या. कारण तुमच्यापर्यंत वस्तुस्थिती पोचली नसेलही. जव्हारच्या सदानंद हॉस्पिटलमध्ये रेड झोनमध्ये सेवा देणाऱ्या एका व्यक्तीवर तापाच्या आजारावर उपचार झाले. तो अनेकदा ह्या रुग्णालयात येत असे. पुढे त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यामुळे, उप जिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. ह्या रुग्णाचे डहाणू येथील प्रयोगशाळेत नमुने दोनदा तपासण्यात आले असता ते अनिर्णित आले. म्हणून तिसरा नमुना 9 जून रोजी हाफकिन इन्स्टिट्यूट येथे पाठविण्यात आला. अहवाल स्पष्टपणे निगेटिव्ह न आल्यामुळे सदानंद हॉस्पिटलच्या डॉक्टरसह तेथील स्टाफचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले व सर्वांना होम क्वारन्टाईनचा सल्ला देण्यात आला. सर्वांनी होम क्वारन्टाईनचा सल्ला धुडकावून बेजबाबदार वर्तन केले. त्यातील लॅब टेक्निशिअनने तर 10 जून रोजी मोखाडा तालुक्यात धुमधडाक्यात हळदीचा कार्यक्रम साजरा केला. तुमचे प्रशासन झोपलेले राहिले. 11 जून रोजी जव्हार तालुक्यात धुमधडाक्यात लग्न लावले. तुमचे प्रशासन झोपलेले राहिले. 12 जून रोजी ज्या रुग्णामुळे लॅब टेक्निशिअनचा घशाचा नमुना घेतला, त्या रुग्णाचे आणि लॅब टेक्निशिअनचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर तुमचे प्रशासन जागे झाले. 12 जून रोजी जव्हार तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या 4 वरुन 6 झाली. हळदीत गेलेल्या आणि लग्नाला गेलेल्या लोकांच्या चौकशा करुन त्यांच्या घशाचे नमुने घेण्यात आले. हे लोक तोपर्यंत कितीतरी लोकांमध्ये मिसळले. त्यातील काहीतरी आरोग्यसेवेत कार्यरत असल्यामुळे चिंता वाढली. 13 जून रोजी कोरोना पॉझिटीव्हची संख्या 10 झाली. 14 जून रोजी 11 झाली. 16 तारखेला 12 ने वाढून 23 झाली. आणि 17 तारखेला 14 ने वाढून 37 झाली. सायंकाळी 2 ने वाढून 39 झाली. दुर्दैवाने, कोरोना जव्हार भागातील केळघर, डेंगाची मेट, देहरे अशा सर्व ग्रामीण भागात पोचला.

आता तुम्ही, ह्या प्रकरणी मोखाडा व जव्हार पोलीस स्टेशन्समध्ये गुन्हे दाखल करुन काहीतरी केल्याचे सोंग करता आहात. पण तितक्याने भागणार नाही. दुष्परिणाम समोर आल्यावर कारवाई करुन भागणार नाही. ह्या बेजबाबदारपणाला तुमच्या प्रशासनातील कोणकोण जबाबदार आहेत, आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार, याचा जबाब द्या. आणि हो पालघरच्या तहसिलदार सुनील शिंदेना जसे मजूराना लाथेने मारहाण केल्याबद्दल सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा देखावा करुन, कागदोपत्री विवाह निमित्ताने रजेवर पाठविल्याचे दर्शविले, तितका आत्मविश्वास नेहमी दाखवू नका. तुर्तास इतकेच.

Print Friendly, PDF & Email

comments