पालघर एस. पी. दत्तात्रय शिंदे In Action! दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी पकडली!

पालघर, दि. 6 जून : जिल्ह्यात (नालासोपारा) 8 महिन्यांपूर्वी एका सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या आस्थापनेवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1 कोटी 76 लाखांची लूट करणाऱ्या टोळीला पालघर जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या टिमने जेरबंद केले आहे. आरोपींचा अनेक गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांचे हे मोठे यश मानले जाते.

गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली रक्कम व अग्नीशस्त्रे दाखवताना पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे व अन्य पोलीस अधिकारी

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून कामकाज: सर्वोच्च न्यायालयाने आरोपींच्या अटकेबाबत निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करता पत्रकारांनी आरोपींचे फोटो व ओळख पटेल असा तपशील प्रसिद्ध करु नये असे आवाहन पोलीस अधिक्षकांनी गुन्ह्याच्या उकलीसंदर्भात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना केले. ह्यावरुन जिल्ह्यात यापुढे जामीनपात्र गुन्ह्यात सर्वसामान्यांना उगाचच कोठडीत डांबणे व छापेमारीतून लूटमार होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

20 सप्टेंबर 2019 रोजी दिवसाढवळ्या 6 दरोडेखोरांनी नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत युनायटेड पेट्रोल फायनान्स गोल्ड व व्हॅल्युअर आयटीआय गोल्डन शॉपवर दरोडा टाकून ही लूट केली होती. याप्रकरणी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ४० लाख रुपये रोख, 1 रिव्हॉल्वर, 1 पिस्तूल, 8 जिवंत काडतुसे, 1 प्रवासी रिक्षा, 1 इनोव्हा कार असा ऐवज हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी माहिती मिळवल्यानंतर ही महत्वपूर्ण उकल झाली आहे. आरोपींना न्यायालयाने 14 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटकेतील आरोपींकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी 2013 मध्ये नालासोपारा येथील ॲक्सिस बॅंकेतून 3 कोटी 87 लाखांची लूट केल्याची कबूली दिली आहे. चालू वर्षातील वापी येथील दरोड्यात देखील आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून तेथे काही जणांना आधीच अटक झालेली आहे. आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

गुन्ह्याचा तपास नालासोपारा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे करीत असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखालील टिम अन्वेषणात सहभागी आहे. या कामगिरीत सहभागी पथकातील पोलीसांना पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी 15 हजार रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्याचे जाहीर केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments