डहाणू नगरपरिषद: 69 लाख रुपये निकृष्ट दर्जाच्या गटारात

0
1276
कॉन्क्रीटमध्ये दगड टाकल्यामुळे पाडून टाकावे लागलेले बांधकाम

दि. 31 मे 2020 (संजीव जोशी): डहाणू नगरपरिषदेने सरावली येथे रोपवाटीकेसमोर 69 लाख रुपये खर्चून कॉन्क्रीट गटाराचे काम सुरु आहे. हे काम भ्रष्ट्राचार आणि निकृष्ट विकासकामाचा नमुना आहे. कॉन्क्रीटचे काम असले तरी त्यामध्ये मोठेमोठे दगड भरले आहेत. ह्याबाबत तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे ह्यांच्याकडे पुरावे सादर केल्यानंतर त्यांना बांधकाम तोडण्याचे आदेश द्यावे लागले. सध्या हे काम थोडेफार तोडून टाकले असले तरी बाकीचे काम तसेच ठेवले जाण्याची शक्यता आहे. कारण ह्या कामावर जिल्हाधिकारी कार्यालयाची देखील अर्थपूर्ण मर्जी आहे. सध्या ह्या कामात रेती न वापरता दगडाचा चूरा वापरला जात आहे. कामात 3 मीटर खोदकामाचे खोटेच नमूद असून तसे कुठलेही खोदकाम केलेले नाही. नगर अभियंता मिश्रा रजेवर आहेत. असेही लॉकडाऊनच्या काळात ते घरी बसूनच काम करीत होते. अधेमधे फक्त बिले काढण्यासाठी ते येत असत. अलीकडे द्वासेंची बदली झाल्यानंतर ते 8 मे च्या तारखांची 50 लाख रुपयांची बिले काढण्यापूरते कार्यालयात आले होते. त्यामुळे कामावर देखरेख शून्य आहे.

खडी आणि दगडी चूरा वापरुन चालू असलेले काम. येथे रेतीचा 1 दाणाही नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयाची अर्थपूर्ण मर्जी कशी?
वास्तविक हे काम 6 वर्षांपूर्वी प्रस्तावित करण्यात आले होते. कामाला 13 ऑगस्ट 2014 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यानंतर 2 नगराध्यक्ष बदलले आणि नवीन परिषद देखील अस्तित्वात आली. तांत्रिक मान्यता कालबाह्य ठरली होती. हे काम सद्यपरिस्थितीत पुन्हा करण्यासाठी नव्याने तांत्रिक मान्यता घेणे आवश्यक होते. मात्र तसे न करता अनेक बोक्यांनी संगनमत करुन हा प्रस्ताव नगरपरिषदेने प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला. ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाने नियंत्रण व पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे, त्या कार्यालयाने कालबाह्य झालेल्या तांत्रिक मंजूरीकडे अर्थपूर्ण डोळेझाक करुन दिनांक 19 सप्टेंबर 2019 रोजी प्रशासकीय मान्यता दिली. ह्या कामासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 63 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.

काम कोणी मिळवले?
हे काम प्रकाश कर्णावट ह्या ठेकेदाराला कर्णावट ट्रेडर्स ह्या नावाने 10 टक्के अधिक दराने मंजूर झाले. त्यासाठी किमान 1 राज्यपातळीवरील व 1 स्थानिक दैनिकात निविदा सूचना प्रसिद्ध करणे आवश्यक असताना, 2 डहाणूत न वाचल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रांमध्ये निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली. ही निविदा भरत बारी यांनी 15.65 अधिक दराने, भाग्यश्री कन्स्ट्रक्शन यांनी 12.65 अधिक दराने आणि प्रकाश कर्णावट याने 9.98 अधिक दराने भरली. स्थायी समितीने दिनांक 23 जानेवारी 2020 रोजी प्रकाश कर्णावट ह्या ठेकेदाराला निविदा मंजूर केली. आणि 28 फेब्रुवारी 2020 रोजी मुख्याधिकारी द्वासे यांनी कार्यादेश दिले.

प्रकाश कर्णावट कोण आहे?
प्रकाश कर्णावट हा खूप मोठा सप्लायर आहे. तो सर्व काही सप्लाय करु शकतो. तो सध्या पण अत्यावश्यक सेवा पुरवत आहे. सध्या कुठल्या सेवा पुरवतो याबाबत माहिती घेणे बाकी असले तरी, तो निवडणूकांमध्ये अधिकाऱ्यांना हवे ते पुरवठा करण्यात मातब्बर आहे. त्याचा जिल्हाधिकारी कार्यालयात दबदबा आहे आणि त्यातूनच त्याने डहाणूतील 2 कोटींच्या कॉन्क्रीटवर डांबर फासण्याच्या प्रकाराची चौकशी त्रयस्त यंत्रणेकडून न करता घोटाळा करणाऱ्या डहाणू नगरपरिषदेकडेच सोपवण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्देश मिळविण्यात यश मिळविले. यापूर्वी नगरपरिषदेने स्थगिती दिलेल्या 4 कामांपैकी एका कामाची स्थगिती उठविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रश्न गांभीर्याने न हातळता हात वर केले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments