पोलिस निरीक्षक गोविंद ओमासेंवर शेवगांवमध्ये कारवाई झाली असती तर, डहाणूमध्ये खाकी बदनाम झाली नसती!

दि. 15 मे 2020: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगांव पोलिस स्टेशनचे प्रभारी तत्कालीन प्रभारी असलेले गोविंद ओमासे आणि तेथील नवनाथ इसरवडे यांच्यात ऑगस्ट 2018 मध्ये उद्भवलेल्या प्रकरणाची जर सखोल चौकशी झाली असती तर, डहाणूतील लोकांना त्रास उद्भवला नसता. ओमासेचे त्या प्रकरणात काहीच नुकसान झाले नाही. नवनाथ इसरवडे मात्र पूर्णपणे संकटात सापडला. आजही न्यायासाठी वणवण फिरतो आहे. त्याच्या घरी ओमासेची खाकी वर्दी कशी गेली, ह्या प्रश्नाचे खरे उत्तर तेव्हा शोधले गेले पाहिजे होते. कलंकित होऊन, पोलिसांची प्रतिमा मलिन करुन, जिल्हा बदलीने शेवगांवमधून पालघर जिल्ह्यात आलेले ओमासे कोणाच्या वरदहस्ताने डहाणूचे प्रभारी बनले? ह्याचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे.

डहाणू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासेची तृतीयपंथीयांकडून खंडणी वसुलीची नामर्दानगी

डहाणू पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्यावर पालघरचे सक्तीच्या रजेवर असलेले पोलिस अधिक्षक गौरव सिंग हे डहाणू पोलिस स्टेशनमध्ये, कमी गुन्ह्यांची नोंद होते असा ठपका ठेवत दबाव ठेवायचे आणि खरडपट्टी काढायचे असे ऐकिवात होते. आणि मग आकडेवारी वाढवण्यासाठी डहाणूमध्ये ज्यांना कोणी वाली नाही, अशा लोकांवर गुन्हे दाखल होऊ लागले. खरे गुन्हेगार मात्र सोडले जात होते. ओमासे हे शक्यतो गुन्हा दाखल न करता तोडपाणी करण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात. पैसे न देणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जातो. त्यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती भरडली जाते. ओमासेंसाठी 15 हजारचा आकडा लकी असावा. बऱ्याचशा तक्रारी, ओमासेंनी 15 हजार रुपये उकळल्याच्या आहेत. कितीतरी तक्रारी समोर येत आहेत. त्यातील 2 उदाहरणे येथे देत आहे.

सैनिक पत्नीला मारहाण, माजी मुख्याद्यापिकेला मारहाण, रोटरी क्लबच्या महिला पदाधिकारीकडून पैसे उकळले …. या पोलिस निरीक्षक गोविंद ओमासेवर वरिष्ठ लक्ष देतात की नाही? कि हिस्सेदारी करतात?

10 मे रोजी गुटखा विक्रेत्याकडून 22 हजारांची तोडपाणी:- सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास डहाणूचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी 2 पोलिसांना इराणी रोडवरील एका दुकानात पाठवले व पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. त्याला सांगितले की, दुकानात 60/70 हजारांचा गुटखा व तंबाखूजन्य असा माल असल्याची आम्हाला माहिती आहे. थेट छापेमारी न करता तुला पोलिस स्टेशनला बोलावले आहे. गुन्हा दाखल केला, तर तुझे नुकसान होईल. त्यापेक्षा 50 हजार रुपये दे. तुझ्याकडे पैसे नसतील तर, तो सर्व गुटखा व सिगरेट आम्हाला दे. आमची माणसे विकतील. गुन्हा दाखल केला तर मात्र तुझे सामानही जप्त होईल आणि कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतील. कशाला प्रकरण वाढवतोस? तासभर मांडवली चालली. त्यानंतर 22 हजार रुपयांत मांडवली झाली. रात्री 8 वाजता व्यापाऱ्याला सोडण्यात आले. डहाणू पोलिस स्टेशनचे सीसीटीव्ही फूटेज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कृपया तपासावे. सर्व प्रकार उजेडात येईल.

14 मार्च 2020 रोजी कोळश्याच्या जहाजावर, ठार झालेल्या झारखंडच्या मजूरांच्या टाळूवरील लोणी कोणी खाल्ले?

सर्वच घटनांमध्ये संधी शोधण्याची मानसिकता: डहाणू शहरातील एक घटना आहे. (पिडीतांची ओळख उघड करायची नसल्याने, तपशील त्रोटक देत आहे) एका अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी तीचा मित्र आला होता. त्याचवेळी मुलीचा भाऊ आल्यावर मुलीने घाबरुन जाऊन पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. तीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. उप जिल्हा रुग्णालय व तेथून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. प्रकरण पोलिसांकडे गेले. सहाय्यक फौजदार भाकरे याने आत्महत्येचा गुन्हा दाखल करावा लागेल अशी भीती घातली. मग मेहेरबानी दाखवून मुलीचा जबाब मोटारसायकलवरुन पडली असा नोंदवण्यात आला. आणि मुलीचा भाऊ आणि मित्र दोघांकडून वारेमाप पैसे उकळण्यात आले. पुन्हा ओमासेंना कमी पडले म्हणून फाईल पुन्हा ओपन करण्याची धमकी देऊन 15 हजार रुपये उकळण्यात आले.

आता पालघरच्या प्रभारी पोलिस अधिक्षकांनी डहाणू शहरात जनता दरबार भरवावा, म्हणजे सर्वसामान्यांच्या तक्रारी पोलिस प्रशासनासमोर येतील आणि आपलेही ऐकले जाऊ शकते असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल, अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

Print Friendly, PDF & Email

comments