डहाणू पोलिसांची तृतीयपंथीयांकडून खंडणी वसुलीची नामर्दानगी

दि. 12 मे 2020 (संजीव जोशी): डहाणूचे पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी भ्रष्ट्राचाराची परिसीमा गाठली असून वयोवृद्ध तृतीयपंथीय (Third Gender) मुंबईतून डहाणूतील स्वगृही परतल्यानंतर त्यांच्याकडून 25 हजारांची खंडणी वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ओमासे यांनी अनेकांकडून खंडण्या गोळा केल्याच्या तक्रारी आहेत. गौरव सिंग यांच्या कार्यकाळात मोकाट सुटलेल्या व फक्त पैसे वसुलीचा एक कलमी कार्यक्रम राबवणाऱ्या ओमासेंवर प्रभारी पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख काय कारवाई करणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

गोविंद ओमासेवर कोणाचा वरदहस्त?
ओमासे हे अहमदनगर जिल्ह्यातील शेगांव पोलिस स्टेशनचे प्रभारी असताना, त्यांची वर्दी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. आणि ती वर्दी ओमासे आपल्या घरी सोडून गेल्याचा दावा एका महिलेने केला होता. याबाबतची बातमी जवळपास डहाणूतील पोलिसांशी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने पाहिली आहे. आजही ती यूट्यूब वर उपलब्ध आहे. मात्र लोकांना हे माहिती नाही की नेमके काय झाले होते. वर्दी सापाडली किंवा नाही? तीच वर्दी घालून ओमासे डहाणूला आले की नवी वर्दी घेऊन आले? त्यांना शेगांव मध्ये क्लिन चीट मिळाली होती का? त्यांच्या वर्दीचे डाग कोणी पुसून दिले? त्यांना नेमका वरदहस्त कोणाचा? शेगांवमध्ये पराक्रम गाजवून आल्यानंतर, त्यांना डहाणू पोलिस स्टेशनचे प्रभारी कसे बनविण्यात आले? पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या ओमासेंवर वरिष्ठांनी काय लक्ष दिले? डहाणूत देखील ओमासेंच्या अनेक कथा असून, वरिष्ठ अधिकारी नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गोविंद ओमासेची अन्य कृष्णकृत्ये वाचायची आहेत? खालील Link ला भेट द्या! …..
सैनिक पत्नीला मारहाण, माजी मुख्याद्यापिकेला मारहाण, रोटरी क्लबच्या महिला पदाधिकारीकडून पैसे उकळले …. या पोलिस निरीक्षक ओमासेवर वरिष्ठ लक्ष देतात की नाही?

16 एप्रिल रोजी नेमके काय घडले होते?
16 एप्रिल रोजी कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत, गडचिंचले येथे जमावाने मुंबईतून आलेल्या साधूंना व त्याच्या चालकांना घेरले होते. त्याच वेळी डहाणू पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुंबईतून डहाणूतील स्वगृही परतलेल्या तृतीयपंथींचा कोरोनाच्या भीतीने पछाडलेल्या लोकांनी छळ मांडला होता. गडचिंचले येथे पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवताना, साधूंना जमावाच्या ताब्यात दिले व 3 जणांची पोलिसांच्या समोर हत्या करण्यात आली. डहाणूमध्ये संतप्त जमावाचा दबाव असल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी ओमासे व त्यांच्या टिमने तृतीयपंथीयांकडून 25 हजार रुपयांची खंडणी वसूल केली. त्यानंतर तृतीयपंथीयांना त्यांच्या नशिबावर सोडण्यात आले. लोकांनी तृतीयपंथीयांच्या वाड्याला त्यातील 36 रहिवाशांसहीत खूंटे, जाळी, पत्रे लावून बंदिस्त करण्यात आले. त्यांची रसद तोडली गेली. आणि ओमासे नवे गिऱ्हाईक शोधत राहिले.

घटना अशी आहे:
डहाणू शहरातील डहाणू गांव परिसरात काही तृतीयपंथी रहातात. त्यांची येथे मालमत्ता असून त्यात 13 खोल्या आहेत व त्यातून भाडोत्री रहातात. सध्या येथे 36 रहिवाशी आहेत. व जवळपास 11/12 तृतीयपंथी रहातात. त्यांच्यातील सर्वात वरिष्ठ व्यक्ती ही त्यांची गुरु मां असते. ही 75 वर्षीय गुरु मां हृदयविकारग्रस्त आहे. सध्या लॉकडाऊन मुळे ती मुंबईतील भायखळा येथे अडकली होती. तीला मुंबईत कुठलीही वैद्यकीय सोय उपलब्ध होत नसल्याने, आणि 14 एप्रिल नंतर पुन्हा पुढील लॉक डाऊनची घोषणा झाल्याने तीने डहाणूत परतण्याचा निर्णय घेतला. येथील डॉ. कांबळे यांच्याकडे त्या नियमित उपचार व तपासणी करुन घेत असतात. तीने डहाणूतील सहकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या संपर्कातील योगेश मोरे कडे एम एच 48 ए डब्ल्यू 6108 क्रमांकाची मारुती इको व्हॅन असून या वाहनासाठी वैद्यकीय कारणात्सव व अन्न वितरणाचा पास आहे. तृतीयपंथीयाची वैद्यकीय अडचण लक्षात घेऊन, योगेश मोरे एक तृतीयपंथी सोबत भायखळा येथे व्हॅन घेऊन गेला. तिथून येतांना गुरु मां बरोबर त्यांची सेवा सुश्रुषा करण्यासाठी आणखी 2 तृतीयपंथी सोबत आले. 4 तृतीयपंथीयांना घेऊन योगेश मोरे डहाणूत परतला. या सर्वांची डहाणू उप जिल्हा रुग्णालयात तपासणी देखील करण्यात आली. मुंबईतून आलेल्या तीनही तृतीयपंथींची तपासणी करुन त्यांना होम क्वारन्टाईनचा सल्ला देण्यात आला. ते आपल्या घरी परतले. परिसरातील लोकांनी मात्र त्यांचे परतणे स्वीकारले नाही.

डहाणू : तृतीयपंथी व ग्रामस्थांमध्ये तणाव; पोलिस निरीक्षक ओमासेसमोर बाचाबाची

परिसरातील लोक आक्रमक झाले:
मुंबईतून तृतीयपंथी डहाणूत परतल्याचे कळल्यानंतर परिसरातील लोक कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने आक्रमक झाले. त्यांनी डहाणू पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याऐवजी व लोकांची समजूत घालण्याऐवजी ओमासेने यातून संधी शोधली. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक तृतीयपंथीयांकडे पोहोचले व त्यांनी योगेश मोरेला व्हॅन सह पोलिस स्टेशनला बोलावले. ओमासेने त्या परिसरातून येणारे फोन कॉल मोरेला स्पीकर फोनवर ऐकवले व दबाव निर्माण करुन कारवाईची धमकी दिली गेली. मात्र हे सर्व चालू असताना, गडचिंचलेमध्ये हत्याकांड घडले व सर्व पोलिस स्टेशनमधून पोलिसांची कुमक गडचिंचले येथे पाठविण्याच्या सूचना आल्यामुळे, हे सावज, त्या रात्री सोडून द्यावे लागले.

14 मार्च 2020 रोजी कोळश्याच्या जहाजावर, ठार झालेल्या झारखंडच्या मजूरांच्या टाळूवरील लोणी कोणी खाल्ले?

तिकडे लोकांनी तृतीयपंथीयांवर जागता पहारा ठेवला:
16 ची रात्र लोकांनी घोषणाबाजी करीत गाजवली. 17 तारखेला सकाळी त्यातील लक्ष्मी ही अन्य मार्गाने बाहेर पडली व तीने डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्याकडे कैफियत मांडली. त्या दरम्यान लोकांनी पुन्हा हंगामा केला. डहाणू नगरपालिका पथक आले व त्यांनी 2 तृतीयपंथीना अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर जाण्याची सुट देवून अन्य लोकांना होम क्वारन्टाईनचे आदेश दिले. मात्र तरीही तेथील लोकांनी तृतीयपंथींचे निवासस्थान असलेला वाडा, त्यातील 36 रहिवाशांसह बाहेरुन खुंटे, जाळ्या व पत्रे बसवून बंदिस्त केला. कोणीही बाहेर पडू शकणार नाही अशी व्यवस्था केली. जे सामान होते त्यासह सर्वांचे जगणे सुरु राहिले. येथील अनेकांचे हातावर पोट आहे. मोलमजुरी करणारे लोक आहेत. त्यांचे हाल झाले. वाड्यातील लोकांना औषधे देखील मिळाली नाहीत. तृतीयपंथीयांकडे जे किराणा सामान व चीजवस्तू होत्या, ते त्यांनी वाड्यातील रहिवाशांसह शेअर करुन गुजराण सुरु केली. 30 एप्रिल रोजी ह्या सर्वांची बंदीवासातून सुटका झाली.

पोलिस निरीक्षक गोविंद ओमासेंवर शेवगांवमध्ये कारवाई झाली असती तर, डहाणूमध्ये खाकी बदनाम झाली नसती!

19 एप्रिल रोजी वसूल केली खंडणी:
16 तारखेच्या रात्री गडचिंचले हत्याकांड घडल्यानंतर, 17 व 18 एप्रिल हे दिवस ओमासेसाठी व्यस्ततेत गेले. 19 एप्रिल रोजी मोकळीक मिळाल्याबरोबर, ओमासेने योगेश मोरेच्या घरी पोलिस वाहन पाठवून तातडीने त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणले. पुन्हा एकदा इको व्हॅन पोलिसांनी जमा केली. पुन्हा ड्रामा सुरु झाला. लोकांचा खूप दबाव आहे. कारवाई करावी लागेल. मोरेने सांगितले, खूपच दबाव असेल व तुमची अडचण होत असेल तर एकदाची कारवाई होऊन जाऊ द्या. ओमासेने सांगितले, तसे नव्हे, ” येस की नो ” सांग! आपल्यामुळे मोरे अडचणीत येतो असे पाहून तृतीयपंथीनी ” येस ” चा निरोप दिला. पोलिसांनी या प्रकरणात तृतीयपंथींकडून 25 हजार रुपयांची खंडणी वसूल केली. गोविंद ओमासे यांनी 15 हजार, सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल पाटीलसाठी 3 हजार व स्वत: साठी 3 हजार सहाय्यक फौजदार भाकरे, 3 हजार सहाय्यक फौजदार पाटील व 1 हजार ठाणे अंमलदार कक्ष असे 25 हजार रुपयांचे वाटप झाले. तक्रारदार रहिवाशांना गाडीवर केस केल्याचे खोटे सांगण्याचे ठरले. त्यानंतर पोलिसांनी मोरेच्या वाहनाचा मोफत वापर देखील सुरु केला. 20 तारखेला हे वाहन खूनाच्या आरोपींना घेऊन मुंबईत पाठविण्यात आले. कुठलेही सॅनिटायझेशन न करता!
वाड्याचा वेढा सोडवण्यासाठी धनेश आक्रेचे प्रयत्न:
धनेश आक्रे हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता पोलिसांच्या बरोबरीने मदतकार्य करीत होता. त्याने पोलिसांकडे तृतीयपंथींची वेढ्यातून सुटका करण्याची मागणी केली. त्यांनी नगरपालिकेकडे संपर्क साधायची सूचना केली. नगरपालिकेने तहसिल कार्यालयाकडे जाण्यास सांगितले. तहसिल कार्यालयाकडे तक्रार गेल्यानंतर तहसिलदारांनी हस्तक्षेप करुन वाड्याच्या भोवतालचे कुंपण काढून टाकले आणि तृतीयपंथीयांचा बंदिवास संपला.

आम्ही किन्नर आहोत म्हणून सरकारने आम्हाला वाऱ्यावर सोडले. आम्ही खूप घाबरलो आहोत. लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. त्यात 25 हजारांचा खर्च आणि नवे संकट. लोकांकडून जमा झालेल्या, मुठमुठभर धान्यातून आम्ही हे दिवस जसेतसे भागवले. आमच्यामुळे वाड्यातील गोरगरीबांचे हाल झाले. आजही आम्ही भीतीच्या वातावरणात आहोत. बाहेर पडायची आमची हिंमत नाही. सरकारने आमच्यावर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी!
लक्ष्मी (तृतीयपंथी)

सर्व संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 2 दिवसांत खूलासा मागवत आहे. वरिष्ठांना अहवाल पाठवला जाईल!
– मंदार धर्माधिकारी, उप विभागीय अधिकारी (डहाणू)

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV
Print Friendly, PDF & Email

comments