माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,
महोदय,
पालघर जिल्ह्याला नवे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक द्यावेत ही नम्र विनंती. हे अधिकारी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना खीळ घालणारे ठरले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडून विरार वसई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार काढून घेऊन तिथे नवे आयुक्त देण्याचा तडकाफडकी घेतलेला निर्णय तुमच्याकडून आशा वाढवणारा आहे. आपले निर्णय राबविण्यात जिल्हा प्रशासन पूर्णत: अपयशी ठरलेले आहे. जिल्हाधिकारी यांच्याविषयी स्वतंत्रपणे भाष्य करु या. सध्या पोलिसांचे अपयश पालघर जिल्ह्यात अस्वस्थता निर्माण करणारे आहे. कृपया आम्हाला सक्षम पोलिस अधिक्षक द्या.

पालघर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक गौरव सिंग यांचे नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. 16 एप्रिल रोजी गडचिंचले येथे 3 वाटसरुंची हत्या होणे, या एकच कारणाने मी हा निष्कर्ष काढत नाही. बळी पडलेले वाटसरु कोण होते हे उल्लेख करणे येथे मला अप्रस्तुत वाटते, ती माणसे होती इतके पुरेसे आहे, त्या घटनेकडे गांभीर्याने बघायला. या हत्यांचे राजकारण करु नये हे तुमचे म्हणणे मला 100% पटते आहे. पण त्यासाठी गृह खात्याचे कोंबडे झाकण्याची काही एक आवश्यकता नाही.

सर्वप्रथम आपल्या निवेदनाविषयी : आपण आपल्या निवेदनामध्ये गडचिंचले हे 110 किलोमीटर अंतरावर असताना, तेथे वेळेत पोलिस पोचले असे नमूद आहे. इथे गडचिंचलेचे अंतर मुंबईपासून 110 किलोमीटर असून पालघर पोलिस मुख्यालया पासून त्याच्या अर्ध्या अंतरावर आहे हे स्पष्ट करतो. अधिकारी चुकीची माहिती देतात असे निदर्शनास आल्याने हा खुलासा. आपण मयत वाटसरूंना एवढ्या मध्यरात्री केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवरुन अडवून परत पाठवले आणि ते परतत असताना हल्ला झाल्याचे नमूद केले आहे. अर्थात पालघर पोलिसांनी त्यांच्यावरील जबाबदारी झटकण्यासाठी ही भूमिका मांडली असली तरी ते खरे आहे. ते वाटसरू कमनशीबी होते म्हणूनच त्यांना तेथे अडवले गेले. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या बहाण्याने आपल्या महाराष्ट्रातील 9 हजार मच्छीमार खलाशांना जसे महाराष्ट्र सरकारने गुजरातमधून स्वीकारण्यास नकार दिला, अगदी त्याप्रमाणेच. आम्हाला राज्याच्या सीमेवरच्या लोकांना तर, महाराष्ट्र आणि गुजरात ही स्वतंत्र राष्ट्रे असल्याचा आभास निर्माण होतो आहे. तरीही पालघर पोलिसांना देखील काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतीलच. हे वाटसरू मुंबई येथून जिल्हा सीमाबंदी असताना, पालघर जिल्ह्यात कसे पोहोचले? ते अधिकृत परवान्यासह आले असल्यास त्यांना मध्ये पोलिसांनी का अडवले? ते अनधिकृत प्रवासी असल्यास आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे सामान्य लोकांची 3663 वाहने जप्त करणाऱ्या पालघर पोलिसांनी त्यांचे वाहन जप्त का केले नाही? ते पोलिसांना चुकवून केंद्रशासित प्रदेशापर्यंत कसे गेले? असे काही प्रश्न उपस्थित होतात.

गौरव सिंग यांच्या कारकिर्दीत स्वतः पोलिस सुरक्षित आहेत का? दिनांक 7 मार्च 2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलिस अधिकारी सिद्धवा जायभाये यांच्यावर भर रस्त्यात, महामार्गावर गोळीबार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. (गुन्हा दाखल क्र. 256/2020, विरार पोलिस स्टेशन) त्यात आरोपी हाती लागले का? 14 एप्रिल रोजी कासा पोलिसांच्या हद्दीत पोलिसांवर हल्ला झाला. पोलिसांच्या वाहनाची तोडफोड झाली. (गुन्हा क्र. 75/2020) यानंतर पोलिसांनी अफवा रोखण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले? 16 तारखेला गडचिंचलेच्या हद्दीत समाजकंटक 3 वाटसरूंना जीवे ठार मारत असताना, त्यांना वाचवण्यासाठी तलासरी पोलिसांचा ताफा खानवेल मार्गे शॉर्टकट ने गडचिंचले येथे पोहोचण्याचा प्रयत्न करत असताना केंद्र शासनाच्या खानवेल हद्दीत, गडचिंचले पासून 7/8 किमी अंतरावर त्यांना अडवून हल्ला करण्यात आला (खानवेल पोलिस स्टेशन, गुन्हा क्र. 8/2020). पोलिसांची गाडी फोडण्यात आली. हा हल्ला पोलिसांना चोर किंवा किडणीचोर समजून झाला का? गडचिंचले मध्ये पोलिसांनी पोहोचू नये यासाठी महाराष्ट्रासह खानवेलमध्ये ठिकठिकाणी अडथळे कोणी आणि कशासाठी निर्माण केले असावेत? आणि गडचिंचले येथे पोलिसांवर झालेला हला हा दिड महिन्यातील पोलिसांवरचा चौथा हल्ला ठरला आहे.

आपण या प्रकरणाच्या फिर्यादीकडे लक्ष देऊ या. एकाच घटनेबद्दल पोलिसांनी 2 स्वतंत्र फिर्यादी का नोंदविल्या आहेत. 3 वाटसरूंच्या खूनाचा प्रयत्न करणे व पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आणि पोलिसांना मारहाण करण्याबाबत पोलिस उप निरीक्षक कटारे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्याच वाटसरूंचा खून केल्याची फिर्याद सहाय्यक निरीक्षक काळे यांनी नोंदवली आहे. खरे तर ही एकच घटना आहे. 3 वाटसरूंना अडवले, मारले, घेरुन ठेवले आणि पुन्हा मरेस्तोवर मारले. ही घटना विभागणी करण्याचे कारण काय? पहिल्या फिर्यादीमध्ये 9 आरोपी व 400/500 चा जमाव आणि दुसऱ्या फिर्यादीमध्ये 5 आरोपी व 400/500 चा जमाव असा उल्लेख आहे. 9 जणांनी 400/500 जणांना घेऊन खूनाचा प्रयत्न केला व मग त्यांची पाळी संपली व दुसऱ्या 5 जणांनी उरलेले खूनाचे कृत्य पार पाडले असे पोलिसांना म्हणायचे आहे का? अन्य अटक 96 आरोपींपैकी किती लोकांनी खूनाचा प्रयत्न केला आणि किती लोकांनी खून केला? अशा हास्यास्पद फिर्यादी पाहून पोलिसांच्या एकंदरीत भूमिका किंवा कुवतीवर शंका घ्यायला वाव आहे.

पालघर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख गौरव सिंग हे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले असताना, त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवला असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही. पोलिस अधिक्षकांना वाचवण्याच्या नादात, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन, वाटसरूंचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकणाऱ्या, मार खाणाऱ्या कटारे सारख्या उप निरीक्षकाला बळीचा बकरा बनवल्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची नाही का होणार? कटारेना वरिष्ठ असलेले सहाय्यक निरीक्षक काळे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या उपस्थितीत कटारे यांनी गोळीबाराचे आदेश देणे शासनाला अपेक्षित आहे का?

वास्तविक या प्रकरणी चौकशी आयोग नेमून चौकशी झाली पाहिजे. किंवा सीबीआयने समांतर चौकशी केली पाहिजे. कारण 3 वाटसरूना पोलिसांच्या कस्टडीत असताना जिवे ठार मारले आहे. 2 मृत हे पोलिसांच्या वाहनात बसवले गेल्यानंतर मारले गेले. आणि 1 जणाला फॉरेस्टच्या (शासकीय) चौकीतून जमावाने बाहेर काढून ठार केले. हे मृत्यू पोलिसांच्या ताब्यातील असहाय्य व्यक्तींचे आहेत. दुसरे म्हणजे, या गुन्ह्याची व्याप्ती दोन राज्यात आहे. व्याप्ती महाराष्ट्र राज्य आणि दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशातील आहे. आरोपींनी पोलिस घटनास्थळी पोहोचू नयेत यासाठी महाराष्ट्रातील हद्दीत जसे अडथळे लावले होते, तसेच खानवेलच्या हद्दीत देखील पोलिसांना घेरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कृती नुसती घेरण्याची नाही, खानवेल मध्ये स्थानिक पोलिसांची अतिरिक्त कुमक पोचली नसती तर पोलिसांचा जीव धोक्यात आला असता. आणि म्हणून केंद्र सरकारने खानवेल मधील गुन्ह्याचा देखील गांभीर्याने तपास केला पाहिजे.

पोलिसांच्या दुसऱ्या फिर्यादीद्वारे (आनंद काळे यांची फिर्याद) खून केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. त्या फिर्यादीमध्ये पोलिसांचे शासकीय कर्तव्य पार पाडताना अडवल्याचा किंवा पोलिसांवर हल्ला झाल्याचा उल्लेख नाही. म्हणजे आनंद काळेंची फिर्याद स्पष्ट करते की, खून होताना पोलिसांनी कर्तव्य पार पाडलेच नाही, त्यामुळे पोलिसांच्या कामात अडथळा आलाच नाही. असे आम्ही म्हणत नाही, तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचे पोलिसांचा कागद सांगतो आहे. आम्हाला मात्र तेथे जीवाची बाजी लावणाऱ्या सर्व पोलिस बांधवांविषयी आदर आणि सहानुभूती आहे. उंटावरून शेळ्या हाकल्याप्रमाणे पोलिसांनी गोळीबार का केला नाही, असे प्रश्न आम्ही विचारत नाही आहोत. पण जिल्हा पोलिसांना नेतृत्व मात्र सक्षम मिळालेले नाही असे आमचे म्हणणे आहे.

जामीनपात्र गुन्ह्यांमध्ये लोकांना डांबून ठेवणे, तपासात आवश्यक नसताना वाहने जप्त करणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये लोकांना अडकवणे, समांतर न्यायव्यवस्था चालवणे, दिवाणी स्वरुपाच्या प्रकरणांचा तपास करणे, असे अनेक आक्षेप पालघर पोलिस यंत्रणेवर आहेत. त्यांच्या Intelligence चे पूर्णत: failure समोर आलेले आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना उठाबशा काढाला लावून आणि सर्वसामान्यांवर दांडूकेशाही चालवणाऱ्या पोलिसांचा कुठलाही प्रभाव खऱ्या गुन्हेगारांवर नाही. येथे 2 उदाहरणे देऊन विषय संपवतो. तलासरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत, दिनांक 28 मार्च रोजी दुधाच्या टॅन्करमधून जीवघेणी प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा (दाखल क्र. II 77/2020) दाखल केला आहे. त्यामध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188 व मोटर वाहन कायदा कलम 66/192 अशी फुटकळ कलमे लावली आहेत. सर्व सामान्य माणसांच्या वाहनांवर यापेक्षा कितीतरी भलतीभलती गंभीर कलमे लावली जात आहेत. मास्क न लावल्याबद्दल यापेक्षा अधिक गंभीर कलमे लावली गेली आहेत. प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे झाल्यास,  सातपाटी पोलिस स्टेशनमध्ये दिनांक 14 एप्रिल रोजी मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकाच्या विरोधात (गुन्हा दाखल क्र. II 36/2020) मध्ये भारतीय दंड संहितेचे कलम 188, 186, 269, 270, 271 सह आपत्ती व्यवस्थापन, साथ रोग नियंत्रण व कोव्हीड 19 उपाययोजना अशी कितीतरी कलमे लावली आहेत. यातून लोकांना कोरोना परवडला पण पोलिसांना आवर असे वाटू लागले आहे.

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात मात्र प्रगती शून्य आहे :- पालघर जिल्हा पोलिसांनी, दिनांक 30 सप्टेंबर 2019 रोजी (मनोर दाखल क्र. 169/2019) 13 कोटी 60 लाख रुपयांचा एके 47, पिस्तुले, काडतुसे व अंमली पदार्थांचा साठा जप्त केल्याचा दावा केला. जुगाराच्या फुटकळ केसेस मध्ये गाड्या जप्त करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणात वाहन जप्त केले नाही. एके 47 सारखी शस्त्रे लोक पायी चालत विक्री करत फिरण्याचा दावा हास्यास्पद आहेच. पण नंतर त्यात काय तपास आणि प्रगती केली हे जाहीर न करणे शंकास्पदही आहे. गडचिंचले येथील क्रुर हल्ल्याच्या व्हिडिओ क्लिप सोशल मिडियाद्वारे खूलेपणाने व्हायरल झाल्या. ज्यातून विद्वेश पसरवण्याच्या घातकी प्रवृत्तीला बळ मिळते आहे. असे व्हिडिओ पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने गौरव सिंग यांनी काय पावले उचलली, हे देखील लोकांना कळले पाहिजे. सामान्यांना असुरक्षित वाटणारा पालघर जिल्हा, गुन्हेगारांना सुरक्षित वाटू लागला आहे. कृपया येथील All परिस्थिती Well नाही हे लक्षात घ्यावे व कठोर पावले उचलावीत.

संजीव जोशी
संपादक दैनिक राजतंत्र
[email protected] /9822283444
rajtantra.com / 9890359090

Print Friendly, PDF & Email

comments