3 निरपराधांच्या हत्यांना जबाबदार कोण?

संजीव जोशी (9890359090 / [email protected]

12 एप्रिल रोजी कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील निकणे या गावी, रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अनोळखी व्यक्ती फिरताना दिसल्याचा ग्रामस्थांचा दावा होता. ग्रामस्थांनी संपूर्ण गावात शोध मोहीम घेतली. कोपरा आणि कोपरा तपासला. निकणे गावाचे सरपंच यांनी 13 एप्रिल रोजी याबाबत कासा पोलिसांना कळवले. पत्रामध्ये गावात भीतीचे वातावरण पसरल्याचे नमूद केले. पोलिसांपर्यंत ही बातमी आल्यानंतर पोलिसांनी काय केले? हा प्रश्न येथे महत्वाचा आहे. पोलिसांनी लोकांच्या मनातील भीती दूर केली का? कशी दूर केली? की कोरोनाच्या बंदोबस्तातील व्यस्ततेमुळे काही शक्यच झाले नाही? कदाचित ही पालघर जिल्ह्यातील पहिली अफवा असू शकते.
14 एप्रिल रोजी, कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत सारणी येथे शिवसेना कार्यकर्ते डॉ. विश्वास वळवी यांची गाडी स्थानिकांनी अडवली. ओळख पटवूनही त्यांना सोडले नाही. त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिस तेथे पोहोचले. मात्र पोलिसांवरच हल्ला झाला. साहाय्यक पोलिस अधिकारी तेथे पोचले. मात्र जेमतेम तेथून डॉ. वळवी व स्वतःची सोडवणूक करु शकले. तरीही वळवी व पोलिसांच्या गाडीवर दगडफेक झालीच. गाड्यांचे नुकसान झाले.
आम्हाला वाटले, पोलिसांवर हल्ला झाला म्हणजे पोलिस गांभीर्याने घेतीलच. यावर उपाय योजना करतीलच. अफवांवर नियंत्रण मिळवतील. पोलिसांनी 15/16 लोकांना अटक केली. दरम्यान संपूर्ण डहाणू तालुक्यातील खेडोपाडी चोर आल्याची अफवा पसरली. लोक स्वरक्षणासाठी शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. डहाणू चारोटी रस्त्यावर रात्रीच्या वेळी अनेक गाड्यांवर दगदफेकीच्या घटना घडल्या. 16 एप्रिलला मात्र पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका असा संदेश सोशल मिडियावर प्रसारित केला. पोलिसांनी गांभीर्याने घेतले असावे असे वाटून गेले.
मात्र ( 17 एप्रिल) आजची सकाळ अस्वस्थ करणारी उगवली. कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीत गडचिंचले येथे, 3 निरपराध लोकांची चोर असल्याच्या संशयातून हत्या झाली. पोलिसांच्या समक्ष हत्या झाली. कोणीही त्यांना वाचवू शकले नाही. लोकांनी कायदा हातात घेतला. गैरसमजातून लोक हैवान बनले. आपण काही करु शकलो नाही. आता पोलिस 40/50 लोकांना ताब्यात घेतील. हे लोक जेलमध्ये सडतील. परंतु 3 निरपराध लोकांचे जीव परत येणार नाहीत.
तरीही आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

 • लॉक डाऊन मध्ये फसलेल्या लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडण्यासाठी हे वाहन रस्त्यावर आले होते का?
 • मुंबई उपनगरात नोंदणी झालेले हे वाहन अनेक पोलिस स्टेशन्सच्या हद्दी ओलांडून गडचिंचले पर्यंत कसे पोहोचले?
 • फसलेले लोक, रात्रीच्या वेळी, आडमार्गाने घरी पोचण्याच्या प्रयत्नात जीवाचा धोका पत्करत आहेत का?
 • कोणाचे काय चुकले? पोलिसांचे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद काळे, पोलिस अधिक्षक गौरव सिंग, जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांचे परिस्थिती हाताळण्यातील हे अपयश आहे का? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याआधी आपण सर्वच चुकलो हे मान्य करावे लागेल. आपण देशाचे स्वातंत्र्य समजून घेण्यात कमी पडलो. आपण स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक म्हणून कमी पडलो. सर्व नागरिकांना माणूस बनविण्यात कमी पडलो. कोणाचेच जर चुकले नसेल, तर त्या 3 लोकांचे नशीब खराब होते असे म्हणून हा विषय सोडावा लागेल.
  या घटनेतून आपण 100 वर्षे मागे जाऊन आत्मपरीक्षण करु या! बरोबर आजपासून 122 वर्षांपूर्वी 18 एप्रिल रोजी दामोदर चापेकर यांना इंग्रजांनी फाशी दिली. त्यापाठोपाठ वासुदेव व बाळकृष्ण चापेकर अशा 3 बंधूंना फाशी देण्यात आली. या चापेकर बंधूनी त्यावेळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीचे निर्मूलन करण्यासाठी लोकांचा छळ करणाऱ्या ब्रिटिश अधिकारी रॅन्डवर 22 जून 1897 रोजी हल्ला केला होता. 2 जुलै रोजी रॅन्डने अखेरचा श्वास घेतला. या संदर्भात लोकमान्य टिळकांनी 13 जुलै रोजी ” सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ” असा अग्रलेख लिहिला. त्याबद्दल त्यांना राष्ट्रद्रोही ठरवून दिड वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. हे सर्व ब्रिटिश राजवटीत 120 वर्षांपूर्वी घडले. आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 73 वर्षानंतरही आपण साथ रोगांचे निर्मूलन हे इंग्रजांनी 1897 मध्ये बनवलेल्या कायद्याने आणि आदेशांवर आदेश काढून, दंडूकेशाहीने किंवा गुन्ह्यांवर गुन्हे दाखल करुन, या मार्गाने कोरोनाच्या विषाणूंशी मुकाबला करणार असू तर मला यशासाठी आपण दैवावरच अधिक अवलंबून असल्यासारखे वाटते. आणि तसे करणार असू तर तिहेरी हत्याकांडाविषयी माझी कोणाविषयी काहीच तक्रार नाही. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून या घटनेची स्वतःची जबाबदारी स्विकारून प्रायश्चित्त करणे इतकेच माझ्या हाती आहे.
  संजीव जोशी
  संपादक – दैनिक राजतंत्र
  9890359090
  [email protected]

  Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
  https://imjo.in/vq7QpV

  Print Friendly, PDF & Email

  comments