डॉक्टरकी विसरुन अधिकार डोक्यात गेलेले डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे

डहाणू नगरपरिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे हे वैद्यकीय शिक्षण घेऊन सरकारी सेवेत आले आहेत. ते बी. ए. एम. एस. आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू विरोधातील लढाईमध्ये त्यांचा खूप मोठा उपयोग होऊ शकला असता. आरोग्य विषयक जनजागृती आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणेत त्यांचा डहाणू शहराला फायदा झाला असता. पण तसे होताना दिसत नाही. द्वासेंच्या डॉक्टरकीवर अधिकारशाहीने विजय मिळवलेला आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे डहाणू शहराच्या जीवनमानात अनावश्यक अडथळे वाढत आहेत.

डहाणू शहराच्या तारपा चौक ते रेल्वे स्थानक परिसरात अनेक अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. त्यातील रेल्वे सेवा व रिक्शा सेवा बंद असली तरी, डहाणू पोलिस स्टेशन, स्टेट बॅंकेसह शहरातील सर्व प्रमुख बॅंका, या परिसरात आहेत. अगदी गरिबांसाठीची शिवभोजन योजना याच परिसरात आहे. गरिबांना जेवण्यासाठी व पेन्शनर पासून ते जनधन योजनांसाठी सर्वांना बॅंकेत यावे लागते. बॅंकेत येण्यापासून श्रीमंतांचे काही अडलेले नाही, मात्र गोरगरिबांना यावे लागते. डहाणू नगरपरिषदेचे कार्यालय देखील याच भागात आहे. त्यातून द्वासेना अत्यावश्यक सेवा देणे गरजेचे वाटत नसले तरी, लोकांची तशी श्रद्धा आहे. सध्याच्या भाड्याच्या नगरपरिषद कार्यालयाचे ५ वर्षांचे भाडे, टक्केवारीत अडवून ठेवल्यामुळे व आता कदाचित नगरपालिका दिवाळखोरीत गेल्यामुळे, ही जागा ३१ मार्च रोजी खाली करावी लागली असती व ती कोरोनाच्या संकटाने अजूनही ताब्यात राहिली असली, तरी नगरपालिकेचे मोडकळीस आलेले जुने कार्यालय देखील याच परिसरात आहे.

हा परिसर बॉटल नेक सारखा आहे. सोशल डिस्टन्सींग साठी येथील गर्दी नियंत्रणात आणणे आवश्यक आहेच. हे खरे असले तरी त्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे येथील भाजीपाल्याचा घाऊक बाजार मोकळ्या जागेत हलविणे. येथे तालुक्यातून भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर किरकोळ भाजी विक्रेते येतात. शिवाय येथे तुलनेत भाजी स्वस्त मिळत असल्यामुळे लोक गर्दी करतात. मग त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवेश मिळू नये याकरिता पोलिसांनी तीनही रस्त्यांवर पोलिस तैनात करुन अस्थायी चौक्या बनवल्या आहेत. मोठ्या प्रमाणात येथे पोलिसांचे बळ खर्च केले जात आहे. येथून वाहनांना प्रवेश नसल्याकारणाने लोक शेकडो वाहने तारपा चौक, सोमवार बाजार, इराणी रोड येथे उभी करुन या परिसरात येतात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी द्वासेंच्या डोक्यात आणखी डबलबार कल्पना सुचली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी शहरात सकाळी 7 ते 12 इतक्या मर्यादित वेळेत दुकाने सुरु ठेवल्यामुळे सोशल डिस्टन्सींगचे 12 वाजून गर्दीत आणखीच भर पडली आहे. याचा फटका बॅंकेत मोठ्या प्रमाणात नाईलाजाने येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे.

रेल्वे स्थानक परिसर संपूर्णपणे रिकामा असताना देखील तेथे धुळीचे बऱ्यापैकी प्रदूषण जाणवते. लोकांना शिंका येत असतात. कोरोनासाठी नेमके हेच धोकादायक आहे. हे डॉक्टर असणाऱ्या द्वासे यांना कळायला हवे. त्यांना आणि पोलिसांना येथील घाऊक भाजीपाला बाजार अन्यत्र हटवण्यात काय अडचण आहे? ते न करता शेकडो नागरिकांना का वेठीस धरले जाते? शहरात 3/4 ठिकाणी घाऊक भाजीपाला उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे अवघड आहे का? परंतु हे केले जात नाही, कारण द्वासे हे डॉक्टर राहिले नाहीत, ते अधिकारी आहेत. पण त्यांनी इंग्रजांनी 1897 मध्ये बनविलेल्या साथीच्या रोगाच्या नियंत्रण कायद्याने कोरोनाची साथ नियंत्रित करताना, आता इंग्रजांचे राज्य राहिले नसून 73 वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या देशातील एका नगरपालिकेचे ते लोकसेवक आहेत हे विसरता कामा नये. मुख्य अधिकारी म्हणजे लोकांची सेवा करण्याचे प्रमुख कर्तव्य असलेला सेवक हे लक्षात घ्यावे. डोक्यातील अधिकारी काढून टाकावा आणि जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत. या निमित्ताने इतकेच सांगणे आहे.

संजीव जोशी
संपादक – दैनिक राजतंत्र
9890359090

कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA

Print Friendly, PDF & Email

comments