दिनांक 21.03.2020: कोरोना व्हायरस चा प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून, प्रशासनाने आता रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पथक प्रवाशांची चौकशी करुन अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, रुग्ण व अत्यावश्यक प्रवासालाच अनुमती देणार आहे. विलगीकरणाचा प्रवासी आढळल्यास त्याची विलगीकरण कक्षामध्ये रवानगी केली जाणार आहे. विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. दापचरी येथील टोल नाक्यावर देखील वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, अशा सूचना प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहेत.