वाडा तालुक्यात एकही करोनाचा रुग्ण नाही

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यात मुख्यत: परदेशातून आलेल्या नागरीकांचे अलगीकरण करण्याचे म्हटले असुन त्यानुसार वाडा तालुक्यात परदेशातून आलेल्या 12 नागरिकांचे अलगीकरण करण्यात आले आहे.

स्पेन, हंगेरी, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, दुबई आदी ठिकाणांहून आलेल्या या नागरिकांमध्ये भारतीय व्यक्तींसह काही परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. मात्र यामधील एकाही व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे वाड्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले आहे. दरम्यान करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार तालुक्यातील किराना दुकाने, भाजीपाला आणि मेडिकलसारख्या अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली असून त्याला व्यापार्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.