वाचा लक्षणे, घ्यावयाची काळजी व सर्व काही

सध्या करोनाची साथ चालू आहे. सगळ्यांना हे माहीतच असेल कि या आजाराची सुरुवात चीन या देशापासून सुरु झाली आणि गेल्या दोन महिन्यांच्या कालांतरात हि लागण हळूहळू जग भर पसरली आहे. चीन नंतर जापान, इटली या देशांमध्ये जास्त प्रमाणात लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. आपल्या भारतात सुद्धा करोना वायरसची लागण झाल्याचे रुग्ण आढळताहेत. अशावेळी हा विषाणू जास्त पसरू नये यासाठी आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे. सर्वांना या विषाणू बद्दलची खरी माहिती मिळावी यासाठी डहाणूच्या सर्व डॉक्टरांचा या लेखाद्वारे एक प्रयत्न.
करोना काय आहे?
हा एक विषाणू आहे जो वेगाने पसरतो. या विषाणूचा जन्म नक्की कशातून झाला याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही. हा विषाणू मानवाच्या श्वसनसंस्थेला बाधित करतो.
कुणाला जास्त धोका आहे?
हा विषाणू सगळ्याच वयोगटाला बाधित करतो. तरी, लहान मुले व वृद्धांना या विषाणूपासून जास्त धोका आहे. तसेच ज्या लोकांमध्ये कमी प्रतिकारशक्ती आढळून येते जसे – कर्करोगाचे रुग्ण अथवा कर्करोगाचे उपचार चालु असलेले रुग्ण, मूत्रपिंडाचे विकार असलेले रुग्ण, एड्सचे रुग्ण, दम्याचे रुग्ण, गरोदर स्त्रिया वगैरेंना या विषाणूचा संसर्ग सहजतेने होऊ शकतो व चिंताजनक स्थिती उद्भवू शकते.
- करोना विषाणू कसा पसरतो?
-करोना दोन प्रकारे पसरतो :
हा आजार मुख्यत्वे हवेतून पसरतो – रुग्णांच्या खोकण्या शिंकण्यातून जे तुषार बाहेर पडतात ते हवेवाटे पसरतात. या तुषारातील कणांमध्ये विषाणू असतात.
वस्तूंच्या स्पर्शातून – रुग्णांच्या खोकल्यातून काही तुषार त्यातील विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. या वस्तूंना हात लावल्याने व ते हात नंतर तोंडा नाकाला लावल्याने विषाणूची लागण होते.
आजाराची लक्षणे काय ?
- खोकला, सर्दी
- घसा तीव्रतेने दुखणे
- ताप 100 डिग्री फॅरेनहिटहून अधिक
- अंगदुखी
- श्वासाला त्रास होणे
- उलट्या व जुलाब
- खोकल्यावाटे रक्त पडणे
(तरी लक्षात घेणे कि वरील लक्षणे इतर विषाणूंच्या आजारात देखील आढळू शकतात.)
सद्य परिस्थितीत, बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांचा संपर्क झाला असल्यास आणि वरील लक्षणे असल्यास, करोना विषाणूचा संसर्ग असण्याची शक्यता जास्त आहे हे लक्षात घेणे.
लागण टाळण्यासाठी काय करावे ?
- वारंवार साबण आणि पाण्याने हात धुणे. हँड सॅनीटायझर (करपव ीरपळींळूशी) पण वापरण्यास हरकत नाही. तरी हे लक्षात घेणे कि सॅनीटायझर नसल्यास घाबरून जायची गरज नाही. साबण आणि पाणी उत्तम रित्या काम करते.
- शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल ठेवणे अथवा स्वतःच्या खाखेत खोकणे. स्वतःला सर्दी खोकला असल्यास सर्जीकल मास्कचा वापर केल्यास उत्तम. हि बाब आपण लक्षात घ्यायची आहे कि सगळ्यांनी मास्क वापरणे गरजेचे नाही. जे पिडीत आहेत आणि जे पीडितांची सेवा करतात त्यांनी सर्जीकल मास्क अथवा एन-95 मास्क वापरणे गरजेचे आहे.
- वारंवार नाका तोंडाला हात लावणे टाळणे.
- खोकला झालेल्या व्यक्तींपासून निदान तीन फूट लांब राहणे. त्यांचा सहवास शक्यतो टाळणे.
- गर्दीची ठिकाणे टाळणे.
- पूर्ण शिजवलेलेच शाकाहारी / मांसाहारी अन्न खाणे.
- चिकन, मटण प्रमाणित दुकानातूनच घेणे.
- जंगली अथवा आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांचा संपर्क टाळणे.
- सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकणे टाळणे.
- परदेशातून आलेल्या व्यक्तींमध्ये रोगाची काही लक्षणे आढळल्यास रुग्णालयास कळवणे व असल्या व्यक्तींना औषधोपचार घेण्यास प्रोत्साहित करणे.
आजाराची लक्षणे दिसल्यास काय करणे?
- तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे व औषधोपचार चालू करणे.
- स्वतःला इतरांपासून लांब ठेवणे. आयसोलेट करणे व मास्क घालून राहणे.
- बाहेर जाणे टाळणे व घरीच राहणे.
- डॉक्टरांचा सल्ला असल्यास दवाखान्यात दाखल होणे.
- लक्षणे आढळून आल्यास अशा व्यक्तींच्या विलगीकरणाची व्यवस्था खालील रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहे.
कस्तुरबा रुग्णालय, मुंबई. (दूरध्वनी – 022-23027769)
नायडू रुग्णालय, पुणे. (दूरध्वनी – 020-25506300)
राष्ट्रीय कॉल सेंटर क्र. +91-11-23978046
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्र. 020-26127394
टोल फ्री हेलपलाईन क्र. 104
(सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन तर्फे दिलेल्या माहितीनुसार)
हा लेख सर्वांनी आवर्जून वाचावा व दुसर्यांना वाचावयास सांगावा. कृपया अफवा पसरवू नये व चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये. आपण सर्वांनी जबाबदारीने वागणे आजची गरज आहे. असे केल्यानेच आपण या करोना विषाणूवर मात करू शकतो. -इंडियन मेडिकल असोसिएशन, डहाणू
- वाचकांनी हे लक्षात घ्यावे की करोना आजाराबद्दल संभ्रमित करणारा, भीती दाखवणारा किंवा तथाकथित शास्त्रीय किंवा पारंपारिक उपाय सुचवणारा संदेश कोणत्याही माध्यमात आढळून आला, तर त्याने तो अन्य कोणालाही पाठवण्याऐवजी खालील नमूद केलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर फॉरवर्ड करावा.
इंडियन मेडिकल असोसिएशन -9823087561
डॉ. शागीर अत्तार – 9890171165
डॉ. पूनावाला – 9421546660
डॉ. ज्योती बापट – 9822784245
सदर संदेशाचे आमच्या आयएमएमधील तज्ञ डॉक्टरांकडून त्वरित विश्लेषण केले जाईल आणि त्याची सत्यता सांगणारा संदेश त्या व्यक्तीला त्वरित उत्तर म्हणून पाठवला जाईल.
अशा प्रकारचा संदेश जर खूप गैरसमज आणि भीतीदायक वातावरण पसरवणारा असेल तर सदर संदेश मूलतः पाठवणार्या व्यक्तीविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार केली जाईल.