दि. 8.02.2020: जिल्हा पोलिस प्रमुख गौरव सिंग यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, काल ७ मार्च रोजी गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नशीबाने त्यांच्यासह सर्व पोलिस सुरक्षित आहेत. पालघर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला असतानाच जिल्ह्यात आता महिला सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आल्याने गौरव सिंग यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काल, शनिवारी पालघर येथून नालासोपारा येथील आपल्या घरी एम एच ४८ ए सी ७१५१ क्रमांकाच्या परिवहन विभागात अमित म्हसेकर यांच्या नावे असलेल्या मारुती स्विफ्ट गाडीतून परतत असताना 9 वाजताच्या सुमारास विरार फाटा येथे असलेल्या बर्गर किंगजवळ पार्सल घेण्यासाठी थांबल्या होत्या. बर्गर किंगमधून पार्सल घेऊन बाहेर येताच चेहरा झाकलेल्या आणि नंबर प्लेट कोरी असलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळी झाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गोळी कारच्या बोनेटला लागल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. हल्ल्याच्या वेळी सिद्धवा जायभाये यांच्यासोबत दोन पोलीस सहकारीही होते. हल्लेखोर एक राउंड फायर करून पसार झाला. तो काळ्या रंगाच्या पल्सरवरून आला होता व त्याने अंगात जॅकेट घातले होते, इतकीच माहिती हाती आली असून पोलिस बर्गर किंगच्या सीसीटीव्ही फूटेज वरुन तपास करीत आहेत.
या प्रकारात खरे आरोपी पकडले जावेत व त्यासाठी गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलिसांकडे न ठेवता राज्याच्या गुप्तचर विभागाकडे सोपविण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.
माफिया आणि खंडणीखोर सुरक्षित, सर्वसामान्य मात्र असुरक्षित

जिल्हा पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत वेगवेगळे नमुने समोर येत आहेत. बोईसर औद्योगिक वसाहतीतून २७ जानेवारी रोजी एम एच १८ बी जी १५१३ क्रमांकाच्या टॅंकरमधून वाणगांव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील साखरा जलाशयात रासायनिक सांडपाणी सोडल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार तेथून जाणाऱ्या काही दारुच्या तस्करांनी रंगेहाथ पकडला व टॅन्कर चालकाला मारहाण करुन त्याच्याकडून कबुली जबाब देणारे वक्तव्य करुन घेतले व त्याचे व्हिडिओ चित्रण केले. चालकाच्या नशीबाने त्याचवेळी पोलिस गस्त पथक आले. त्यांनी टॅन्कर वाणगांव येथे आणला. तेथे उभयपक्षात तडजोड झाली. तडजोडीबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे आहेत. टॅन्करचे कागदपत्र तपासून तो सोडल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांनी केवळ कागदपत्रे पाहून जर टॅन्कर सोडला असेल तर मग मोठेच प्रश्नचिन्ह यानिमित्ताने उभे राहते.
या दरम्यान व्हिडिओ चित्रण करणाऱ्या टोळीतील एकाने संबंधित सॅरेक्स या कारखान्यामध्ये जाऊन खंडणी वसुलीचे प्रयत्न केले. खंडणी न मिळाल्याने या टोळीने व्हिडिओ व्हायरल केले. मग कारखाना व्यवस्थापनाने स्वतःच दिनांक ४ फेब्रुवारी रोजी बोईसरच्या उप विभागीय अधिकारी यांच्याकडे आणि बोईसर पोलिस स्टेशनकडे तक्रार केली. खंडणीखोर कारखान्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. मात्र पोलिसांनी याबाबत एफआयआर न दाखल करता, तक्रारी अर्ज लिहून घेतला आणि खंडणीखोरांना अभय दिले. पुढे त्या अर्जाचे काय झाले ते अजून गुलदस्त्यातच आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले किंवा नाही, व काय प्रगती झाली ते पोलिसांनी जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र अजून त्यावरचा पडदा उठलेला नाही.
अशा खंडणीखोरीच्या निमित्ताने प्रकार उजेडात आल्याने झोपलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे झाले आणि त्यांनी वाणगांव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध सार्वजनिक जलाशयात रासायनिक सांडपाणी सोडल्याबद्दल गुन्हा दाखल केला. महसूल विभागाच्या अखत्यारीतील रेती तस्करी, अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीतील गुटखा तस्करी, उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारीतील विदेशी दारु पकडण्यात आणि त्यात फिर्यादी होण्यात भलतीच कार्यतत्परता दाखवणारे पोलिस, जलाशयात सांडपाणी सोडून लोकांच्या जिवीताशी खेळ करत असताना फक्त टॅन्करची कागदपत्रे तपासून तो सोडतील आणि टॅन्करच्या नंबरपासून सर्व प्रकाराची इत्यंभूत माहिती असताना स्वतः फिर्यादी न होता प्रदूषण नियंत्रण मंडळाने अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद नोंदवण्याची वाट बघतील यावर गौरव सिंग विश्वास ठेवत असले तरी लोकांचा त्यावर विश्वास नाही. (क्रमशः