पिंक लेक हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला की दरोडा टाकला?

एकीकडे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरवसिंग हे गुन्हेगारी क्षेत्राचे कंबरडे मोडण्याच्या भूमिकेत रेतीमाफिया, जुगाराचे अड्डे, दारुचे अड्डे, गुटखा तस्करी यांच्याविरोधात मोहीम राबवत असल्याचा देखावा केला जात असला तरी ते चित्र फसवे आहे. आणि त्यामुळेच त्यातून गुन्हेगारीवर कुठलीही जरब बसलेली नाही. या फसव्या कारवायांचा केलेला हा पर्दाफाश!

हॉटेल पिंक लेक

पोलिसांचा छापा की दरोडा?
पोलिसांनी 24 सप्टेंबर 2018 रोजी डहाणूतील हॉटेल पिंक लेक हॉटेलमध्ये तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली छापा मारुन 23 जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी जुगाराच्या डावातून 90 रुपये मुल्याचे पत्ते, 40 हजार रुपये रोख, आरोपींच्या अंगझडतीतून जप्त केलेले 4 लाख 500 रुपये, 2 लाख 85 हजार 500 रुपये किंमतीचे 24 मोबाईल व 58 लाख रुपये मुल्याच्या 5 कार व 1 लाख रुपये मुल्याची 3 दुचाकी वाहने असा एकूण 65 लाख 89 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. अशाप्रकारची छापेमारी करुन वरकरणी फार मोठी कामगिरी केल्याचे चित्र पोलिसांनी उभे केले असले तरी ही कारवाई हा निव्वळ गोंगाट असल्याचे स्पष्ट होत असून पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे.

सर्वप्रथम या गुन्ह्याचे गांभीर्य पाहू या!
पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम या कायद्याच्या कलम 4 व 5 अन्वये गुन्हा नोंदवला असून त्यामध्ये जास्तीत 1 महिन्याची कैद व 500 रुपये दंडाची तरतूद असल्यामुळे असा गुन्हा किरकोळ व फुटकळ मानला जातो. मात्र पोलिसांनी भयंकर भिमपराक्रामाचे चित्र उभे केले. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने पोलिसांनी आरोपींना स्वतःच्या अधिकारात जामीन दिला पाहिजे असा आहे.

हा जुगाराचा अड्डा तत्कालीन पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असल्याची शंका घेऊन, स्थानिक पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना अंधारात ठेवून ही छापेमारी करण्यात आली. यातून स्थानिक पोलीस अधिकारी हॉटेलमध्ये चालणार्‍या जुगाराच्या अड्ड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा निष्कर्ष निघत असला तरी पोलीस निरीक्षक परबकर यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. उलट या गुन्ह्याचा तपास छापेमारी करणार्‍या अपर पोलीस अधीक्षकांनी स्वतःकडे न ठेवता किंवा स्थानिक गुन्हे शाखेकडे न सोपवता परबकर यांच्या नियंत्रणातच सोपवण्याच्या कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या छाप्याबाबत वरिष्ठ अधिकारी जर गंभीर असते तर त्यांनी तपास स्वतःकडे ठेवणे अपेक्षीत आहे. मात्र स्थानिक पोलिसांवर अविश्वास दाखवून त्यांना अंधारात ठेवले गेले असले तरी तपास त्यांच्याकडेच सोपविण्यात आला.

या गुन्ह्याचे दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी न्यायालयासमोर आरोपपत्र सादर करण्यात आले. या आरोपपत्राचाचेच पोस्टमार्टम येथे करण्यात आलेले आहे.

 • त्याआधीच्या एका छाप्याबाबत थोडेसे :-
  पिंक लेक छाप्याच्या बरोबर 6 दिवस आधी पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार त्यांचे तत्कालीन वाचक सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी गुन्हे प्रतिबंधक पथक, सायबर सेल, यांच्या मदतीने डहाणूतील रामदास झावरे उर्फ झिपू याच्या घरावर छापा टाकला. यावेळी देखील डहाणू पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्यावर अविश्वास दर्शविण्यात आला. त्यांच्या संगनमताने येथे अवैद्य धंदे चालत असावेत, अशी पोलीस अधिक्षकांना शंका असावी. या छाप्यात पोलिसांनी 25 हजार रुपये मुल्याचा लॅपटॉप, 39 हजार 520 रुपये मुल्याचे 11 मोबाईल फोन, 2 लाख 22 हजार 795 रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. यावेळी देखील तपास डहाणू पोलीस स्टेशनकडेच देण्यात आला. (छापा मारणार्‍या पथकाने केलेले व्हिडिओ शूटिंग तपासात का नाही आणि जप्त मोबाईल आणि लॅपटॉपमधून पोलिसांनी काय तपास केला? तो आरोपपत्रात का नमूद नाही? अशा प्रश्नांची देखील पोलीस अधिक्षकांकडून उत्तरे अपेक्षीत आहेत.) रामदास झावरे उर्फ झिपू हा पिंक लेक छाप्यातील आरोपी क्रमांक 4 आहे.

पिंक लेक छाप्यातील आरोपी क्रमांक 4 असलेल्या झिपू याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड मागवल्याचे 27 सप्टेंबर 2018 रोजीचे पत्र डहाणू पोलिसांनी तपासात जोडले आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी हे रेकॉर्ड आवश्यक असल्याचे पोलीस अधिक्षकांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे. मात्र असे कुठलेही कॉल रेकॉर्ड तपासात जोडलेले नाही. आणि आरोपीचा मोबाईल त्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात हे पत्र पोलीस अधीक्षकांकडे न पाठवता केवळ तपासाचा देखावा करण्यासाठी तयार केल्याची शक्यता आहे. किंवा कॉल रेकॉर्डमध्ये झिपूचे पोलीस अधिकार्‍यांशी कॉल झाल्याचे अडचणीत आणणारे रेकॉर्ड प्राप्त झाल्यामुळे ते तपासात जोडले नसावे. किंवा मग पोलीस अधिक्षक कार्यालयाने या पत्राला केराची टोपली दाखवली असावी. या तीन पैकी कुठलेही कारण असले तरी ते आक्षेपार्ह असेच आहे.

 • सर्वप्रथम गुन्ह्याबाबतच्या फिर्यादीचे अवलोकन करु या!
  हा छापा अपर पोलीस अधीक्षक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मारला गेला असला तरी खरे सुत्रधार कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनावणे व कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा व मुख्यालयात नेमणूकीस असलेला एक कॉन्स्टेबल हे होते. त्यांनी चव्हाण यांना खबर दिल्यानंतर हा छापा मारल्याचे मानले जाते. प्रकाश सोनावणे हेच गुन्ह्याचे फिर्यादी आहेत.

फिर्यादीत विसंगती काय आहेत?
हा छापा मारल्यानंतर सकाळी 9 वाजता डहाणू पोलीस स्टेशनमध्ये चव्हाण यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी गुन्ह्यात 26 आरोपींना पकडले असून 26 मोबाईल व 6 कार जप्त केल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात सोनावणे यांनी फिर्याद नोंदवताना केवळ 23 आरोपींची नावे नोंदवली व 24 मोबाईल जप्त केल्याचे दर्शविले. हॉटेल पिंक लेकचा मालक विनोद गुप्ता याचे नाव एफआयआरमधून वगळण्यात आले. फिर्यादीमधे अज्ञात हॉटेल मालक असाही उल्लेख केलेला नाही. तडजोड होऊ न शकल्याने त्याला आरोपी बनविण्यात आले अशी वाच्यता आहे. या शिवाय 2 आरोपी आणि 2 मोबाईल कमी झाले; ते कोण हा? प्रश्न उपस्थित झाला आहे.

छाप्यात 45 लाख रुपये हाती लागल्याची बातमी पसरली असली तरी प्रत्यक्षात अवघी 4 लाख 40 हजार 500 रुपये इतकीच रक्कम जप्त केल्याचे दाखविण्यात आले आहेत.

या ठिकाणी 3 पत्ती जुगार खेळला जात होता. पहिल्या फेरीत प्रत्येक सदस्य 2 हजार टाकत होता व दुसर्‍या फेरी पासून प्रत्येकी 1 हजार रुपयांची खेळी खेळली जात होती. अशा पद्धतीने प्रत्येक डाव किमान 50 हजार ते 4 लाख रुपयांपर्यंत पोहोचत होता. येथे जुगार खेळण्यासाठी प्रत्येक सदस्याने किमान 2 लाख रुपये आणल्याशिवाय त्याला खेळण्यास परवानगी नव्हती. पोलिसांनी जप्त केलेली रक्कम पाहता इतकी कमी रक्कम आढळल्याचे दाखविल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या छाप्यात अनेक कोट्याधीश आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असले तरी त्यांच्याकडून जप्त केलेली रक्कम ही त्यांच्या नावाला साजेशी नाही. पोलीसांनी सर्वांची झडती घेतल्यानंतर केवळ 500 आणि 2 हजाराच्या नोटाच कशा सापडल्या? कोणाकडेही 5, 10, 20, 50 ची एकही नोट किंवा सुट्ट्या पैशाचे एकही नाणे कसे सापडले नाही यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

छापा मारताना पोलीसांनी पंच नेले नव्हते!
छापा मारताना परिसरातील प्रतिष्ठित पंचाना घटनास्थळी नेणे अपेक्षित होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचांना नेले नाही व पंचनामा देखील बनवला नाही. अटक आरोपींना अनुकूल असलेल्या व त्यांच्या मर्जीतील सराईत पंचांना पोलीस स्टेशनला मागाहून बोलावून पंचनामा तयार करण्यात आला. यातील एक पंचावर डहाणू पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार व पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचे (आयपीसी 353) आरोप असलेले गुन्हे डहाणू पोलीस स्टेशनला दाखल आहेत.

संबंधित बातमी : डहाणूत 26 जुगाऱ्यांना अटक; 6 कार व 26 मोबाईल जप्त

स्टेशन डायरीत इतक्या विलंबाने नोंद का घेतली?
पोलिसांनी पहाटे 3 वाजता छापा पंचनामा सुरु करुन पहाटे 6.10 वाजता पूर्ण केल्याचे पंचनाम्यात नमूद असले तरी प्रत्यक्षात स्टेशन डायरीमध्ये मुद्देमाल जप्त केल्याची नोंद रात्री 20.19 वाजता, 14 तास इतक्या उशीराने घेण्यात आली हे देखील विवादास्पद आहे.

पोलिसांनी केवळ दहशत निर्माण करण्यासाठी आवश्यकता नसताना हॉटेलजवळील वाहने जप्त केली. वाहने जुगार खेळण्यासाठी वापरली गेलेली नसल्याने ती जप्त करण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. परंतु महत्व वाढवण्यासाठी वाहने जप्त करण्यात आली. तसे करताना, जप्त केलेल्या गाड्यांमधून जप्त केलेल्या रक्कमा फिर्यादीमध्ये नमुद केलेल्या नाहीत. गाड्यांची तपासणी करुन त्या जप्त केल्याचे रीतसर पंचनामे तयार करण्यात आलेले नाहीत. वाहने टोवींग करुन न आणता, चालवून पोलीस स्टेशनला आणली. ही वाहने कोणी चालवली? आरोपपत्रामधे अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.

एकाही आरोपीच्या अंगझडतीमध्ये कुठल्याही वाहनाची चावी आढळून आल्याची नोंद नाही. मग पोलिसांनी वाहनांच्या चाव्या नेमक्या कुठून ताब्यात घेतल्या? की वाहनांना चाव्या लावलेल्याच होत्या? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. म्हणजेच अंगझडतीमध्ये प्रत्यक्षात मिळालेला मुद्देमाल पंचनाम्यात दिसून येत नाही. पोलिसांनी आपल्या मर्जीने ठरवून दाखवलेला मुद्देमाल निष्पन्न केला आहे.

त्यातून काय साधले?
* आरोपी एसटी किंवा रेल्वे किंवा विमानातून आले असते तर एसटी किंवा रेल्वे किंवा विमान जप्त केले असते का? आरोपी चालत आले असते तर त्यांच्यावरील आरोप शाबीत होण्यात काही अडचण आली असती का?
* यातून फक्त पोलिसांचे महत्व वाढले आणि न्यायालयाचा बहुमूल्य वेळ व्यर्थ घालविण्यात आला. ही वाहने सोडविण्यासाठी पोलिसांना म्हणणे मांडण्याची अर्थपूर्ण संधी मिळाली. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली.
* त्यातील काही जप्त वाहने कुठल्याही आरोपींची नव्हती. ती पिंक लेक हॉटेलसमोर कशी आली? कोणी आणली? याबाबत आरोपपत्रामध्ये काहीही संदर्भ दिला नाही. वाहनाच्या मुळ मालकांचे कुठलाही जबाब आरोपपत्रात सादर केलेला नाही. त्यांना साक्षीदार बनविण्यात आलेले नाही.

पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेल्या कार

पोलिसांनी डी.एन. 09/एम. 0123 क्रमांकाची, व्हीआयपी नंबर असलेली एस क्रॉस कार जप्त केली होती. प्रत्यक्षात परिवहन विभागाकडे या क्रमांकाच्या वाहनाची नोंदणी ज्या व्यक्तीच्या नावे आहे, ती व्यक्ती सदरील गुन्ह्यामध्ये आरोपी नाही. साक्षीदार देखील नाही. मग त्या व्यक्तीची कार का जप्त केली याचा बोध होत नाही. शिवाय या क्रमांकाची कार प्रत्यक्षात बीएमडब्ल्यू एक्स 5 एक्स ड्राईव्ह मॉडेलची आहे. या कारचे काय झाले ते आरोपपत्रात नमूद नाही. ही कार पोलिसांनी परस्पर मालकाच्या ताब्यात दिली की न्यायालयाच्या आदेशानुसार दिली याबाबत आरोपपत्रात उल्लेख केलेला नाही.

पोलिसांनी हॉटेल पिंक लेकचे गेस्ट रजिस्टर जप्त केल्याची जप्तीच्या पंचनाम्यात नोंद नाही. ते नंतर तपास करताना जप्त केल्याचा पंचनामा देखील आरोपपत्रात दाखल नाही. मात्र अशा गेस्ट रजिस्टरचा उतारा आरोपपत्रात जोडला आहे.

या संपूर्ण छाप्याचे व्हिडीओ शुटींग करण्यात आल्याचे फिर्यादी प्रकाश सोनावणे यांचे म्हणणे असले तरी ते आक्षेपार्ह असल्याने तपासी अंमलदाराच्या ताब्यात देण्यात आलेले नाही. व्हिडिओ शूटींगमध्ये पोलिसांनी केलेले गैरवर्तन व विहित पद्धतीने छापेमारी न केल्याचे उघड झाले असते. तसेच प्रत्यक्षात किती पैसे जमा झाले व किती जप्त केल्याचे दाखवले याबाबतची पोल खुलण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांवरील संशय गडद होत आहे.

सीसीटीव्ही फूटेज तपासात दाखवले नाही!
कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहाणारा व मुख्यालयात नेमणूकीस असलेला कॉन्स्टेबल हा येथे रोज जुगार खेळत असे. तो लाखो रुपये हरला. त्याच्याकडील पैसे संपल्यामुळे उधारीवर त्याला खेळू दिले नाही. म्हणून तो स्वतः या छाप्यात अग्रस्थानी होता. प्रत्यक्षात तो त्यावेळी कागदोपत्री अन्यत्र बंदोबस्तास असल्याचे सीसीटीव्ही फुटेज अडचणीचे ठरण्याच्या कारणाने ते तपासात घेण्यात आले नाही.

पोलिसांनी सर्व 23 आरोपींना अटक करताना सर्वच अटक पंचनाम्यावर सामाईक पंचांच्या सह्या घेतल्या आहेत. इथपर्यंत ठिक आहे. मात्र गुन्हा घडल्यानंतर 56 दिवसांनंतर हॉटेल पिंक लेकचा मालक विनोद गुप्ता हा न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला पोलिसांनी नाममात्र अटक दाखवताना त्याच दोन पंचांच्या सह्या घेतल्या. म्हणजे संबंधित 2 पंच हे सराईत पंच असल्याचे उघड आहे.

 • अटकेच्या कारणांची चेक लिस्ट :
  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक आरोपीच्या अटकेची समर्थनीय कारणे देणे बंधनकारक असते. हा जामीनपात्र गुन्हा असताना व अटक करण्याची आवश्यकता नसताना, आरोपी आणखी अपराध करु नये, गुन्ह्याचा योग्य व सखोल तपास करणे, साक्षीदारांना धमकी किंवा प्रलोभने दाखवू नये याकरिता अटक केल्याचे दर्शविण्यात आले. प्रत्यक्षात यातील सर्वच साक्षीदार हे पोलीस आहेत. तपासात संधी असतानाही स्वतंत्र्य साक्षीदार सादर नाही. मग पोलीस अधिकार्‍यांना धमकी किंवा प्रलोभने दाखवण्याची भीती का व्यक्त करण्यात आली? पोलीस या आरोपींच्या प्रलोभनांना किंवा धमक्यांना बळी पडणार होते का?
 • अटक पंचनामा किंवा स्टेशन डायरीतील नोंद खोटी.
  आरोपींना अटक केल्यानंतर अटक पंचनाम्यामध्ये त्यांच्या पत्नीना किंवा भावाला कळविण्यात आल्याच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. स्टेशन डायरीमध्ये आरोपी क्रमांक 1 ते 7 यांच्या अटकेची खबर त्यांच्या एका सामाईक मित्राला, आरोपी क्रमांक 8 ते 15 च्या अटकेची अन्य सामाईक मित्राला व आरोपी क्रमांक 16 ते 20 ची माहिती तिसर्‍या सामाईक मित्राला व आरोपी क्रमांक 21 ते 23 ची खबर चौथ्या सामाईक मित्राला दिल्याची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजे अटक पंचनामा व स्टेशन डायरीतील नोंदीत फरक असल्याने यातील एक नोंद नक्कीच खोटी आहे.
 • अटकेची नोंद किती वाजता?
  पोलिसांनी पिंक लेक हॉटेल वर छापा पहाटे 3 वाजता मारलेला असताना आरोपींना अटक दुपारी 2.15 वाजता करण्यात आली. याचा अर्थ तोपर्यंत पोलिसांनी आरोपींना बेकायदेशीरपणे डांबून ठेवले होते. या काळात आरोपींच्या चहापान/भोजनाची व्यवस्था कोणी केली? पोलिसांनी आरोपींची व्यवस्था केली की आरोपींनी पोलिसांची व्यवस्था केली? पोलिसांनी शासकीय निधीतून ही व्यवस्था केली की स्वखर्चाने केली? या सर्व प्रश्नांची पोलीस प्रशासनाने उत्तरे देणे अपेक्षीत आहे. पोलिसांच्या अशा नियमबाह्य डांबवून ठेवण्याच्या भीतीनेच हॉटेल मालक पोलिसांकडे हजर न होता परस्पर न्यायालयासमोर हजर झाला असा निष्कर्ष काढता येईल.
 • स्टोरीतला फिल्मी मसाला:-
  हा छापा टाकल्यानंतर पोलिसांना घाबरुन आनंद सारस्वत या व्यापार्‍याने बाल्कनीतून उडी मारली व त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आनंद सारस्वतला कोणी उचलले आणि रुग्णालयात नेले? त्याच्या आजूबाजूला पडलेली पैशांची बंडले कोणी उचलली? त्याचा पंचनामा केला का? आनंद त्या ठिकाणी कशासाठी आला होता? त्याने पोलिसांच्या दमनशाहीला घाबरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला की बदनामीला घाबरुन आत्महत्या करण्याच्या इराद्याने दुसर्‍या मजल्यावरुन उडी मारली? तो आरोपी होता की पोलिसांच्या छाप्यातून अनावश्यक छळ झालेला पिडीत व्यापारी? त्याची जप्त केलेली काळ्या रंगाची वॉक्स वॅगन कार पोलिसांनी कोणाच्या ताब्यात दिली? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

आनंद सारस्वत हा आरोपी किंवा घटनास्थळाचा प्रत्यक्षदर्शी स्वतंत्र साक्षीदार असताना त्याचा कुठलाही जबाब पोलिसांनी तपासात जोडलेला नाही. त्याला आरोपी देखील केले नाही किंवा साक्षीदार देखील केले नाही.

पोलिसांनी आनंदच्या अपघाताचा प्रश्न दडपण्यासाठी खोटेपणा केला. 1 ऑक्टोबर 2018 रोजी (गुन्हा घडल्यानंतर एक आठवड्याने) पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये नोंद टाकून पुरावा निर्माण केला. त्यामध्ये त्यांनी घटनेतील आजारी इसम आनंद सारस्वत याचा पोलीस नाईक किणी यांनी डहाणू उप जिल्हा रुग्णालय येथून जबाब घेतल्याचे नमूद केले. स्टेशन डायरीतील नोंदीत नमूद जबाब देखील गमतीशीर आहे. त्यामध्ये आनंद असे म्हणतो की, मी जेवण करण्यासाठी हॉटेल पिंक लेक येथे गेलो होतो. तेव्हा दुसर्‍या मजल्यावर काही लोक पत्ते खेळत होते. तेव्हा मी गॅलरीत बसलो होतो. खालच्या मजल्यावरुन धावपळीचा आवाज आल्याने मी खाली उतरण्याचा प्रयत्न करीत असताना गडबडीत खाली पडलो तेव्हा माझे उजव्या हाताला दुखापत झाल्याने मला पोलिसांनी गाडीत घालून डहाणू पोलीस स्टेशनला आणले व तेथून मेमो देऊन डहाणू उप जिल्हा रुग्णालयात आणले. माझेवर दवा उपचार चालू असून सदर बाबत संशयाचा प्रकार नसून माझी काही एक तक्रार नाही. आनंद म्हणतो तो हॉटेल पिंक लेक मध्ये जेवायला गेला होता. रात्री 3 वाजता तो जेवायला गेला? दुसर्‍या मजल्यावर गॅलरीत बसून जेवत होता? गॅलरीतून उतरण्याचा प्रयत्न केला? काहीच पटत नाही. त्यातही त्याला पोलिसांनी 24 तारखेला ताब्यात का घेतला? त्याच दिवशी आनंदचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्याला गुजरात राज्यातील अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. असे असताना पोलिसांनी तो उप जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची खोटी नोंद का घेतली?

आनंद जर जेवायला तिथे गेला होता तर पोलिसांनी अशा निरपराध व्यक्तीला मारहाण करुन गॅलरीतून उडी मारण्याइतकी दहशत का निर्माण केली?

पोलिसांचा सुरुवातीचा बचाव :-
छापा मारल्यानंतर खासगीमध्ये बोलताना पोलिसांनी आनंद हा पिंक लेकमधील एका रुममध्ये मुक्कामाला होता व वेगळ्याच कारणाने छापा पडल्याचे समजून पकडले जाऊ या भीतीने आनंदने बाल्कनीतून उडी मारली अशी शंका व्यक्त केली होती. मात्र अशी स्टोरी पुढे आणण्यात आलेली नाही. आनंद तिथे रात्री जेवायला नक्कीच गेला नसणार. तो जुगार खेळत होता की दुसर्‍या रुममध्ये अन्य काही करीत होता हे आनंदच्या जबाबात किंवा पोलिसांच्या तपासात येणे अपेक्षीत होते. मात्र ते झाकून ठेवण्याचा निर्णय पोलीस आणि आनंदने घेतल्याचे समोर आले आहे. झाकण्याची किंमत किती ठरली, ते देखील गुलदस्त्यात आहे.

आनंदने तक्रार केली तर पोलिसांची अडचण आणि आनंदला आरोपी केला तर आनंदची अडचण; या परिस्थितीवर मात करण्यासाठी हा तडजोडीचा मार्ग काढण्यात आला.

वेटर्स नेमके जुगार्‍यांना काय पुरवत होते असे पोलीसांचे म्हणणे आहे?
तीन पत्ती या जुगाराच्या खेळात 4/5 डाव झाल्यावर पत्ते बदलले जातात. अशा मोठ्या डावात तर प्रत्येक डावानंतर पत्ते बदलले जातात. पोलिसांनी घटनास्थळावरुन केवळ तीन डाव चालले होते म्हणून तींनच पत्त्यांचे कॅट मिळून 156 पत्ते जप्त केल्याचे दाखवले असले तरी या आधी खेळलेले जुने कॅट व कॅटचा अतिरिक्त साठा जप्त केल्याचे फिर्यादीत दाखविलेला नाही. पत्त्यांमधून बाजूला काढलेली जोकरची पाने देखील पोलिसांनी हस्तगत करु नये याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे. ज्या दोन वेटर्सना आरोपी बनविले आहे त्यांनी जुगारासाठी साहित्य पुरविल्याचा मोघम आरोप फिर्यादीत केला असला तरी अधिक तपशील दिलेला नाही. त्यांच्याकडून कुठलाही मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. मग त्यांनी आरोपींना नेमके काय सामान पुरवले? दारु? सिगरेट? कोल्ड्रिंक? चहा किंवा कॉफी? पत्ते? त्यांनी तसे काहीही पुरवल्याचे तपासात दाखविण्यात आलेले नाही. त्यांच्या अंगझडतीतून काहीही मिळालेले नाही. यावरुन दोन्ही वेटर्सना केवळ बळीचा बकरा बनविल्याचे उघड होत आहे.

काही आरोपींचा आरोप :-
प्रत्यक्षात जुगाराचे 2 डाव खेळले जात होते. मात्र छाप्याचा कोणीही स्वतंत्र साक्षीदार आरोपमुक्त सोडल्यास त्यांनी केलेल्या तक्रारींमुळे पोलिसांच्या अडचणीत वाढ होऊ नये याकरिता जुगारींच्या वाहन चालकांना जुगार खेळत असल्याचे दाखवून आरोपी बनविण्यात आले. व त्यांचा तिसरा डाव दाखविण्यात आला.

जुगारात साधन म्हणून कोणताही वापर न झालेली वाहने व मोबाईल जप्त केले असले तरी प्रत्यक्षात जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली विशिष्ट प्रकारची टेबल व खुर्च्या का जप्त केल्या नाहीत अशा साध्या प्रश्नाचे पोलिसांकडे उत्तर नाही. एकंदरीतच पोलिसांनी हा गुन्हा म्हणजे केवळ पोलिसांचा खोटा दबदबा निर्माण करण्यासाठी पोखरलेला डोंगर आहे.

दैनिक राजतंत्रचे “E- वाचक” बना! त्यासाठी रुपये 300 मात्र E Subscription भरुन रोज दैनिक राजतंत्रचा पीडीएफ स्वरुपातील अंक आणि महत्वाच्या बातम्या आपल्या WhatsApp वर मिळवा. आमचे ई वर्गणीदार बना! आम्हाला पाठबळ द्या! त्यासाठी पुढील Link ला भेट द्या!…… https://imjo.in/vq7QpV

Print Friendly, PDF & Email

comments