भाजप पालघर जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार पाटील

0
1538

प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : तालुक्यातील बिलावली येथील रहिवासी असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पाटील यांची भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवड केली आहे.

नंदकुमार पाटील हे सुरुवातीपासून भाजपमध्ये सक्रिय असून त्यांनी बिलावलीचे सरपंच ते भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका चिटणीस, तालुकाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष व भाजपचे वाडा तालुका सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस अशी विविध जबाबदारीची पदे सांभाळली आहेत. यासोबतच वाडा पंचायत समिती उपसभापती, प्रभारी सभापती, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशा प्रशासकीय पदांची यशस्वी कारकीर्द असलेल्या पाटील यांची पक्षाचेे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पक्षात ओळख आहे.

मितभाषी असणारे नंदकुमार पाटील हे उत्तम संघटक असून त्यांच्या नियुक्तीने पालघर जिल्ह्यात भाजप पुन्हा नव्याने उभारी घेईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. त्यांच्या निवडीनंतर वाडा येथील भाजप जिल्हा कार्यालयात पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले, तालुका अध्यक्ष संदिप पवार, सचिव मंगेश पाटील, महिला आघाडीच्या शुभांगी उत्तेकर, गटनेते मनिष देहेरकर, युवा मोर्चाचे कुणाल साळवी यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हात भाजपला पुन्हा एक नंबरचा पक्ष करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षातील सामान्य कार्यकर्त्याला सुध्दा न्याय देऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नंदकुमार पाटील यांनी यावेळी दिली.

Print Friendly, PDF & Email

comments