पालघरमधील वाहतूक कोंडी फुटणार

0
581
  • खासदार राजेंद्र गावित यांनी घेतला पुढाकार
  • जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

प्रतिनिधी/पालघर, दि. 26 : शहरातील मोठी समस्या बनलेला वाहतुक कोंडीचा प्रश्‍न लवकरच सुटणार असल्याचे चिन्हं आहेत. खासदार राजेंद्र गावित यांनी याकामी पुढकार घेतला असुन त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पालघर नगरपरिषद, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आरटीओ, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

माहीम रोडवरील पालघर रेल्वे स्टेशन ते प्रकाश टॉकीज व मनोर रोडवरील पालघर रेल्वे स्टेशन ते चार रस्ता या मार्गावरील वाहतुक कोंडी कशी कमी करता येईल, तसेच सेंटजॉन कॉलेज, आनंदाश्रम शाळा, ट्विंकल स्टार शाळा येथे होणार्‍या वाहतूक कोंडीबाबत बैठकीत चर्चा झाली. पालघर स्टेशनजवळ वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 100 मीटर परिसरात रिक्षा, बस, फेरीवाले तसेच दोन चाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंगवर प्रतिबंध करावा व यासाठी पोलीस, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर नगरपरिषद व एसटी महामंडळाने मिळून दहा दिवसांत योजना तयार करावी अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी केल्या.

तसेच पालघर रेल्वे स्टेशनजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा आहे, त्यावर एसटी किंवा पार्किंगसाठी तरतुद करावी व तसा प्रस्ताव तयार करावा, हुतात्मा स्तंभ, चार रस्ता, स्टेट बँक व पालघर स्टेशन येथे सिग्नल बसवावे, असे बैठकीत ठरले. त्याचबरोबर मनोर रोड व माहीम रस्ता डिपी प्लॅनमध्ये 20 मिटर पेक्षा जास्त आहे, मात्र प्रत्यक्षात तो केवळ 10 ते 12 मीटर आहे, याबाबतही चर्चा झाली.

बैठकीस पालघर नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी, शिवसेनेचे पालघर लोकसभा सह समन्वयक केदार काळे, बांधकाम सभापती सुभाष पाटील, नगरसेवक तुशार भानुशाली व अलका राजपूत हजर होते.

Print Friendly, PDF & Email

comments