वाडा : ट्रेलर अपहरण व चोरी प्रकरणी 6 आरोपी जेरबंद

0
2784
  • वाडा पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
  • अवघ्या दहा दिवसात आरोपी गजाआड

प्रतिनिधी/वाडा, दि. 20 : तालुक्यातील अबिटघर येथून मुंबईकडे लोखंड घेऊन चाललेल्या एका ट्रेलरचे चालक व वाहकाला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अपहरण करून त्यामधील 16 टन लोखंडाची चोरी करणार्‍या आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असुन वाडा पोलीस व पालघर दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई करत अवघ्या 10 दिवसात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अबिटघर येथे सुर्या स्टील या लोखंडाचे उत्पादन घेणार्‍या कंपनीतुन सोमवार, 10 फेब्रुवारी रोजी 26 टन लोखंडी सळ्या घेऊन मुंबईकडे निघालेल्या ट्रेलरला वाडा – भिवंडी महामार्गावर खुपरी नजीक कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी थांबवले होते. तोंड झाकलेल्या सदर अज्ञात व्यक्तींनी चालक दिपक शिवप्रसाद व वाहक अभिषेक सिंग यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांनी आणलेल्या काळ्या रंगाच्या व्हेरना गाडीत डांबून ठेवत ट्रेलर घेऊन पोबारा केला होता. यानंतर रात्री उशिरा दोघांना मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिल्हार फाटा येथे सोडत ट्रेलरमधील 7 लाखांच्या 16 टन लोखंडी सळ्या लंपास करून ट्रेलर कंचाड भागात सोडून दिला होता.

ही खळबळजनक घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी आपला तपास सुरु केला असता गुन्ह्यात वापरलेल्या काळ्या व्हेरना गाडीचे सीसीटीव्ही फुटेज मनोर येथून पोलिसांनी प्राप्त केले होते. तसेच ट्रेलरचेही काही फुटेज पोलिसांना मिळाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलेल्या संशयास्पद कारबाबत पालघर दहशतवादी विरोधी पथकाच्या हाती काही धागेदोरे लागल्यानंतर त्या आधारे यातील 6 आरोपींना बुधवारी (दि. 19) रात्री अटक करण्यात यश आले. विशेष म्हणजे यातील सर्व आरोपी हे स्थानिक व उच्चभ्रू घरातील असून काहींचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग तर काही स्टील खरेदी करणारे ग्राहक असल्याची माहिती आहे.

प्रथमेश पाटील (रा.बोरांडे), अमर शिर्के (रा.मेट), केदार सावंत (रा.अंबिस्ते), नीरज सावंत (रा.अंबिस्ते), प्रशांत पाटील (रा.भावेघर) व प्रशांत पाटील (रा. शिरसाड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असुन या सर्वांना आज, गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या कारवाईत पालघर दहशतवादी विरोधी पथकाचे मानसिंग पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी महत्वाची भूमिका बजावली असून वाडा पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे, उप निरीक्षक प्रमोद दोरकर, हरेश धनगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. बी. भडांगे, पो. कॉ. नागेश निल, सुशील बांगर, सतीश शेलवले यांचा या कारवाई दरम्यान संयुक्त सहभाग होता. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments