मोखाडा पंचायत समितीच्या सभापती पदी सारिका निकम; तर उपसभापती लक्ष्मीबाई भुसारा

0
1044

दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 16 : निवडणुकीच्या जवळपास महिनाभराच्या कालावधीनंतर पार पडलेल्या मोखाडा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीत सभापती पदी शिवसेनेच्या सारिका निकम तर उपसभापती राष्ट्रवादीच्या लक्ष्मीबाई भुसारा यांची निवड करण्यात आली आहे.

तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती गण असलेल्या मोखाडा पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणुक 7 जानेवारी रोजी पार पडली होती. त्यानंतर जवळपास महिनाभराच्या कालावधीनंतर काल, शनिवारी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांची निवड प्रक्रिया पार पडली. मोखाडा पंचायत समितीच्या निवडणुकीत सहा पैकी पाच सदस्य शिवसेनेचे तर एका जागी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आला आहे. शिवसेनेला स्पष्ट बहुमत असतानाही राज्यातील महाविकास आघाडीचा फार्मुला येथे देखील पहावयास मिळाला. त्यानुसार शनिवारी पार पडलेल्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडीमध्ये सभापती पदी शिवसेनेच्या सारिका प्रकाश निकम यांची तर उपसभापती पदी राष्ट्रवादीच्या लक्ष्मीबाई भुसारा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावेळी विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सेनेचे तालुका अध्यक्ष अमोल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य हबीबभाई शेख, दयानंद भुसारा तसेच पंचायत समिती सदस्य व मोठ्या संख्येने सेना-राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. या दोन्हीही उमेदवारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून निकटवर्तीयांमधून आनंदाचे वातावरण आहे.

Print Friendly, PDF & Email

comments