बोर्डी येथे चिकू फेस्टिवल जल्लोषात संपन्न!

0
1837

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 2 : सालाबादप्रमाणे या वर्षीही 1 व 2 फेब्रुवारी रोजी बोर्डी येथे चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी व उद्घाटक म्हणून भारत पर्यटनचे पश्चिम विभागीय प्रादेशिक संचालक वेंकटेशन दत्तात्रेयन, तर अतिथी म्हणून पालघरचे खासदार राजेंद्र गावीत, वीणा वर्ल्डच्या संस्थापक व संचालिका वीणा पाटील, ट्रिट बीच रिसॉर्ट अ‍ॅन्ड स्पाचे संस्थापक व संचालक आलोक मुंद्रा, माधवबागचे विपणन मुख्य योगेश वालावलकर, हिलझील वाइनरि रिझोर्टच्या संस्थापिका व संचालिका सौ. रजनी सावे व चिकू महोत्सवाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गणेश वंदन व सर्वांगीण नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

जव्हारचे दिव्यांग भगवान कडू

या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार गावीत यांनी सांगितले की, पर्यटनाच्या क्षेत्रात गोव्यानंतर बोर्डीचे स्थान आहे असे मला वाटते. राज्यमंत्री असताना या भागातील केळी व चिकू या फळांसाठी आपण विमा योजना लागू करुन घेतली. त्याचा फायदा या भागातील शेतकर्‍यांना मिळू लागला आहे. दापचरी भागात 300 एकर क्षेत्रावर कृषी विद्यापीठ सुरू करण्यात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील सहा महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. या चिकू महोत्सवाच्या आयोजनात काही स्थानिक नागरिक नाराज असल्याचे मला कळाले आहे. तरी हा वाद आयोजकांनी सामंजस्याने सोडवून सगळ्यांना सोबत घ्यावे, अशी सूचना त्यांनी शेवटी आयोजकांना केली.

यावेळी बोलताना वेंकटेशन दत्तात्रेयन यांनी सांगितले की, आपल्या देशातील विविधतेतील एकता मला इथे पहायला मिळाली. या चिकू महोत्सवाबद्दल प्रसिद्धीद्वारे जनजागृती होणे आवश्यक असून त्यासाठी स्थानिक पत्रकार व माध्यमांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून या महोत्सवाच्या कक्षा रुंदावतील. थोडा प्रयत्न झाला तर या महोत्सवाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता येऊ शकते कारण त्यासाठी आवश्यक बाबींची उपलब्धता येथे आहे. पुढील वर्षी या महोत्सवाला अजून भव्य स्वरुप देण्यासाठी आम्ही सर्व सहकार्य करु अशी त्यांनी ग्वाही दिली. तर माझे वडील व पती या महोत्सवाला येत असतात; पण मी पहिल्यांदाच आले व इथे झालेले बदल, उत्सवाचे भव्य स्वरुप व कार्यकर्त्यांचा उत्साह बघून आश्चर्याचा सुखद धक्का बसला, असे मनोगत विणा पाटील यांनी बोलून दाखवले. शेवटी त्यांनी आयोजकांचे अभिनंदन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. आलोक मुंद्रा यांनीही त्यांच्या संस्थेकडून यापुढेही सहकार्य मिळेल, असे सांगून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

दिपक इंगवले व कुटूंबीय मेरेथॉन स्पर्धक

या महोत्सवात दोन्ही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन स्थानिक कलाकारांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न करण्यात आला.

या चिकू महोत्सवात, जव्हार येथील दिव्यांग भगवान कडू यांचा कागदाच्या लगद्यापासून विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, चेहरे बनवण्याचा स्टॉल विशेष आकर्षणाचा बिंदू ठरला. त्यांच्याकडील तयार वस्तुंच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली असून त्यामुळे नैराश्य दूर होऊन अजून मेहनत करण्याची उर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महोत्सवामध्ये प्रथमच चिकू दौड (मॅरेथॉनचे) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यातून व शेजारील गुजरात राज्यातील विविध भागातील 600 स्पर्धकांनी भाग घेतला. भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार, अर्जुन पुरस्कार प्राप्त धनराज पिल्ले यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला. वयोगटानुसार प्रथम तिन क्रमांकाने विजयी झालेल्या स्पर्धकांना धनराज पिल्ले यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विशेष बाब म्हणजे ठाण्याहून आलेल्या एकाच कुटुंबातील दिपक इंगवले (वय 67), वैजयंती इंगवले (वय 62) व अमेय इंगवले यांनी 21 किमी तर स्वाती आठवले (वय 58) यांनी 10 किमीची स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. दमछाक झाली असताना देखील स्पर्धा अपेक्षित वेळात पूर्ण केल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता.

रक्तदान शिबिरातील रक्तदान

तसेच यावेळी पहिल्यांदाच दोन दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 30 नागरिकांनी यावेळी रक्तदान केले. अशा महोत्सवांमध्ये लोक मौजमजा करण्यासाठी येतात, कोणी रक्तदान करेलच असे नाही. त्यामुळे रक्तदानाविषयी केवळ जनजागृती करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या महोत्सवात सहभागी झालो व त्यानुसार 30 बाटल्या रक्त गोळा झाल्याने आमचा हेतू सफल झाल्याचे समाधान आहे, असे श्रीमती देवकाबाई कल्याणजी छेडा रक्तपेढीचे संचालक नंदादीप कोकणे म्हणाले.

चिकू सफारीला सुध्दा शनिवारी फक्त 6 जणांची नोंद झाली. मात्र रविवारी 43 पर्यटकांनी सफारीचा आनंद घेतला.

या चिकू महोत्सवातील काही स्टॉल धारकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काहींनी मागील वर्षापेक्षा या वर्षी पर्यटकांचा प्रतिसाद कमी असल्याचे तर काहींनी त्यांना चांगला प्रतिसाद लाभल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच तारापूरचे सुनील सावे, बोईसर येथील महेश नाईक, बोरीवलीचे संतोष पोतदार तर पुण्याचे अजय अढिया यांच्या व इतर बर्‍याच पर्यटकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काहींनी आनंद व्यक्त करुन आयोजन फारच सुंदर असल्याचे सांगितले. तर काहींनी चिकू फेस्टिवल असूनही चिकू सोडून इतर सर्व काही असल्याने मोठा हिरमोड झाल्याचे सांगून जास्त वेळ थांबण्याची अजिबात इच्छा नसल्याचे सांगितले.

स्पेनचे परदेशी पर्यटक

विशेष बाब म्हणजे स्पेन देशाचे परदेशी पर्यटक डॉमिंगो, जेझस, जोरेबा, इकेर, एड्रीयानो, झरगम हे ढोल ताशा पथकाच्या सादरीकरणाचा आनंद घेताना दिसले. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना हे सगळे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. ढोलताशांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तर महोत्सवातील कोणताच खाद्यपदार्थ खाणार नसून ठरलेल्या ठिकाणी जाऊन जेवण घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोर्डी व घोलवड येथील मुकेश धोडी व हेमंत मलवकर या प्रवासी रिक्षा व्यावसायिकांनी संवाद साधला असता, मागच्या वर्षांपेक्षा यावेळी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. या महोत्सवात आमचा विशेष असा फायदा होत नाही. रोजच्या पेक्षा केवळ 200 ते 300 रुपयांचा फायदा वाढतो. कारण नेहमी येणारे पर्यटक घोलवड स्टेशनपासून चालत येतात तर बरेच पर्यटक आपल्या दूचाकी व चारचाकी वाहनाने येतात.

एकुणच शनिवारी कामाचा दिवस असल्याने तसेच बर्‍याच लोकांच्या हातात महिन्याच्या 5 तारखेनंतर पैसे येत असल्याने, त्यातच स्टॉलची वाटणी करताना एकाच प्रकारच्या स्टॉलचे वाटप झाल्याने यावर्षी म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याची चर्चा स्टॉलधारकांमध्ये होत असल्याचे दिसून आले.

दरम्यान चिकू फेस्टिवलला कुठल्याही तर्‍हेचे अनुदान देताना चिकू बागायतदारांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी स्थानिक बागायतदार अजय पाटील व अन्य काही बागयतदारांनी केली होती. तर महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी यांनी चिकू महोत्सवात संघाला विश्वासात घेतले जावे, अशी मागणी केली होती. आयोजकांनी अजय पाटील व विनायक बारी यांचे सर्व आरोप फेटाळले असून गैरसमजातून आरोप केल्याचे म्हटले आहे. चिकू महोत्सवाला कुठल्याही पद्धतीचे अनुदान मिळालेले नसुन सर्वांना बरोबर घेऊन चालणारा हा महोत्सव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments