भेसळयुक्त पनीर : वाड्यातील श्रीकृष्ण फार्म कंपनीवर छापा

0
1070

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : पुण्यात आढळलेल्या भेसळयुक्त पनीरच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील निचोळे येथील ’श्रीकृष्ण फार्म’ या पनीर बनविणार्‍या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला असून कंपनीतील दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. पुण्यात आढळलेले भेसळयुक्त पनीर याच कंपनीत बनविले असल्याच्या संशयावरून हा छापा टाकण्यात आला आहे.

श्रीकृष्ण फार्म कंपनीत पनीर, चीज व योगर्ट आदी दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. गुरुवारी (दि. 30) अन्न व औषध प्रशासनाने पुणे येथील एका दुकानात टाकलेल्या छाप्यात दिड हजार किलो भेसळयुक्त पनीर आढळुन आले होते. यावेळी दुकानदाराच्या चौकशीत सदर पनीर निचोळेतील श्रीकृष्णा फार्म या कंपनीतून पुरवण्यात आल्याचे समोर आल्यानंतर हा छापा टाकण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन पालघर विभागाचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सोंगरवाड व जी. व्ही. जगताप यांनी गुरुवारी या कंपनीतील दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेतले असुन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, पुणे येथील दुकानदाराकडे सापडलेले भेसळयुक्त पनीर हे निचोळे येथील श्रीकृष्णा फार्म या कंपनीतीलच असल्याचे संबंधित दुकानदाराने सांगितल्याने त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त पी. आर. सोंगरवाड पुढील तपास करीत आहेत.

कंपनीतील दुग्धजन्य पदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
-पी.आर. सोंगरवाड, सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशान पालघर जिल्हा

पुणे येथील एका दुकानात भेसळयुक्त पनीर आढळल्याने आमच्या कंपनीची तपासणी करण्यात आली असून उत्पादनाचे नमुनेही संबंधित अधिकार्‍यांनी नेले आहेत. त्यामुळे तपासणीअंती आलेल्या अहवालानंतरच यावर अधिक सांगता येईल. आमच्या कंपनीकडील सर्व अधिकृत परवान्यांच्या प्रती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
-सुरेश पष्टे, व्यवस्थापक, श्रीकृष्णा फार्म, निचोळे.

Print Friendly, PDF & Email

comments