नरपडच्या ग्रामसभेला ग्रामसेवक गैरहजर; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

0
1640

संजीव जोशी/डहाणू, दि. २८ : सर्व ग्रामपंचायतींना २६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेणे बंधनकारक असताना मनोज सारंगधर इंगळे या प्रशासनाच्या लाडक्या ग्रामसेवकाकडे ३ ग्रामपंचायतींचा पदभार असल्यामुळे पर्यायी व्यवस्था न करता डहाणू तालुक्यातील नरपड ग्रामपंचायतीची सभा २६ जानेवारी रोजी न ठेवता ती २७ जानेवारी रोजी ठेवण्यात आली. दुपारी ३ वाजता मांगेला समाज सभागृहात सभा असल्याने लोक जमा झाले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मात्र ग्रामसेवक इंगळे ग्रामसभेला फिरकलेच नाहीत. ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो स्वीच ऑफ येत होता. ग्रामस्थांनी मग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरक्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना देखील इंगळे कुठे आहेत, आणि येणार आहेत किंवा नाही ते सांगता आले नाही. अखेर २ तास वाट बघून लोक आपापल्या घरी निघून गेले. या बेजबाबदारपणामुळे लोक संतप्त झाले असून त्यांनी ग्रामसेवक इंगळेवर कारवाईची मागणी केली आहे.

२८ जानेवारी रोजी आशागड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला देखील गैरहजर: ग्रामसेवक इंगळे २८ जानेवारी रोजी आशागड येथील ग्रामसभेला देखील न सांगता गैरहजर राहिले.

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यास ग्रामसेवक संघटनांचा विरोध?
२६ जानेवारी रोजी चिखले ग्रामपंचायतीच्या झेंडावंदनाला हजर होते. मात्र तिथे ग्रामसभा घेतली नाही. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यास ग्रामसेवक संघटनांचा विरोध असल्याने अशा दोन्ही राष्ट्रीय दिनी इंगळे हे ग्रामसभा घेत नाहीत. इंगळेने या आधी पेसा कायद्याचा चुकीचा अर्थ लावून चिखले ग्रामपंचायतीच्या हद्दीवर, ” सावधान येथे ग्रामसभा देशाच्या संसदेपेक्षा मोठी असून इथे अन्य कुठलेही कायदे चालत नाहीत. गावाबाहेरच्या कोणालाही येथे व्यापार करता येणार नाही किंवा मालमत्ता खरेदी करता येणार नाही! ” असे वादग्रस्त फलक लावून अप्रत्यक्षपणे ३७० कलम लागू केले होते.

याबाबत डहाणू पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी. एच. भरक्षे यांना विचारले असता त्यांनी ग्रामसेवक इंगळे यांनी कुठलाही रजेचा अर्ज दिलेला नाही असे सांगितले. ते मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याची कबुली देवून मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसलेल्या ग्रामसेवकांची यादी केली असून लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. मनोज इंगळे हे तुमचे भाचे आहेत व त्यामुळे त्यांच्या मनमानीला अभय दिले जाते हे खरे आहे का? असे विचारल्यावर येथे मामा भाचे असा प्रश्न उद्भवत नसून इंगळे यांनी नियमात काम केले पाहिजे अशी भूमिका मांडली.

  • ग्रामसेवक मनोज सारंगधर इंगळे कोणाचा भाचा? कोणाचा जावई?
    डहाणू तालुक्यातील चिखले, नरपड आणि आशागड अशा ३ ग्रामपंचायतींचा पदभार ज्यांच्याकडे असे वजनदार व्यक्तिमत्त्व म्हणजे मनोज सारंगधर इंगळे! एकाही ग्रामपंचायतीच्या मुख्यालयात रहात नाही. जेव्हा जमेल तेव्हा एम एच ४८ ए डब्ल्यू २०५९ क्रमांकाची मारुती अर्टिगा कार घेऊन येतो. खाजगी चालक ठेवलेला आहे. हा चालक वाहनही चालवतो आणि त्याच्या नावावर खोटी बिले देखील फाडता येतात. गाडीच्या दर्शनी भागात महाराष्ट्र शासन अशी पाटी लावलेली असते. त्यामुळे टोल वाचवण्यास मदत होते. वेळ प्रसंगी गाडीत शिट्टीचा झेंडा लावून फिरतो. मी बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता असल्याची बतावणी करतो. त्याच्याकडे रिव्हॉल्वर असल्याचे देखील काही लोकांचे म्हणणे आहे. डहाणूचे गटविकास अधिकारी भराक्षे हे त्याचे मामा असल्याचा त्याचा दावा आहे. त्यामुळे तालुक्यातील हा दादा ग्रामसेवक आहे. नरपड ग्रामपंचायतीमध्ये भोये नावाच्या ग्रामसेवकाची बदली झालेली असताना त्याना पदभार न देता इंगळेला अतिरिक्त पदभारामध्ये ठेवून भोयेना रायपूर ग्रामपंचायतीचा पदभार देण्यामागे मनोज इंगळेचा नक्कीच कोणीतरी गॉडफादर प्रशासनात असणार आहे किंवा इंगळे नक्कीच संबंधितांना काहीतरी मलिदा देत असणार. कोणाच्या वरदहस्ताने मनोज सारंगधर इंगळे हा मनमानी करतो हे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी शोधणे गरजेचे आहे.
सोबतच्या छायाचित्रात इंगळेच्या गाडीला बहुजन विकास आघाडीचा झेंडा दिसतो आहे.

पालघर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आवश्यकता नसताना भ्रष्ट्राचारासाठी प्रोटीन पावडर खरेदी करुन लाखो रुपयांचा गैरप्रकार केला होता. डहाणूचे गटविकास अधिकारी भरक्षे यांनी तर पंचायत समितीच्या तत्कालीन सदस्या व माजी सभापती चंद्रिका आंबात यांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रोटीन पावडरच्या खरेदीची बिले अदा करु नयेत असे आदेश काढले होते. यावरून प्रोटीन खरेदीचे लाभार्थी स्वतः भराक्षे असल्याचे समोर आले होते. याबाबत तत्कालीन राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी माहिती मागितली असता डहाणू तालुक्यातून १९ लाख ३४ हजार रुपयांची प्रोटीन खरेदी झाल्याचे उघड झाले. मात्र यादीमध्ये चिखले आणि नरपड ग्रामपंचायतीने प्रोटीन खरेदी केली नसल्याचे दाखवले. प्रत्यक्षात इंगळे यांनी दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये वारेमाप प्रोटीन खरेदी केली असून विवेक पंडीत यांच्याकडे सादर केलेल्या माहितीत इंगळेचा बचाव करण्यासाठीच मामा बराक्षेंनी विवेक पंडीत यांना खोटी माहिती सादर केल्याचे उघड होत आहे.

संबंधित बातमी : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सच्या प्रकल्प विस्ताराला आशागड ग्रामपंचायतीचा रेड सिग्नल

  • ग्रामसेवक ऑन स्पेशल ड्युटी फॉर फ्रॉड:
    आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एसीजी कॅप्सुल या कंपनीकडून जलप्रदूषण केले जात असल्याच्या कारणाने ग्रामसभेने कंपनीच्या विस्तारीकरणासाठी ना हरकत पत्र नाकारले होते. परवानगी नसताना बांधकाम केल्याबद्दल ग्रामपंचायतीने पोलीसांकडे गुन्हा नोंदविण्यासाठी पत्रव्यवहार देखील केला होता. कंपनीने अखेर गटविकास अधिकारी यांच्याशी संधान बांधले आणि इंगळेला आशागड ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार सोपवला. लगेच इंगळेने ग्रामसभेने असा कुठलाही ठराव केलेला नसताना ठराव झाल्याची खोटी नोंद घेऊन एसीजी कॅप्सुलला ना हरकत पत्र दिले. याबाबत ग्रामस्थांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रारी करुन देखील अजूनही कोणी दखल घेतलेली नाही.

संबंधित बातमी : भांडवलशाही विरुद्ध लोकशाही : एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स प्रा. लि. व्यवस्थापनाचे स्थानिक ग्रामपंचायतीच्या अधिकारांना आव्हान

कचरा डेपोची जागा

संबंधित बातमी : पेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार

बिल्डरला नको असलेला कचरा डेपो हटविण्यासाठी लाखोंचा मलिदा कमावला!
आशागड ग्रामपंचायतीच्या हद्दीत एसटी स्टॅंड जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाची खाण जमीन आहे. त्या जागेत आशागड ग्रामपंचायत गेल्या अनेक वर्षांपासून कचरा विल्हेवाट लावत आहे. या जागेतून कचराडेपो हलविण्यासाठी इंगळे याने संबंधित बिल्डरकडून १२ लाख रुपये देणगी घेतली. दर्शनी भागातून कचरा डेपो इतरत्र हलवावा यासाठी ग्रामस्थांची अनुकूलता होती. मात्र इंगळेने ही जागा बिल्डरच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केल्यानंतर ग्रामस्थांकडून विरोध झाला. यातून इंगळेने पोलीसांकडे शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवून खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या प्रकरणात देणगी म्हणून मिळालेले १२ लाख रुपये इंगळेने बॅंकेतून कॅश विथड्रॉवलने काढले आणि त्याची विल्हेवाट लावली. हे पैसे त्याने स्वतःच्या ड्रायव्हरमार्फत काढले आहेत. डिजिटल इंडियाच्या युगात इंगळेने इतकी मोठी रक्कम बॅंकेतून रोखीने का काढली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातमी : शक्तिप्रदर्शन करुन ना हरकत मिळवण्याचा एसीजी कॅप्सुलचा प्रयत्न फसला

Print Friendly, PDF & Email

comments