बोर्डी: सोमवंशी क्षत्रिय समाजाचा क्रिडा महोत्सव संपन्न

0
1374

प्रदीप राऊत /डहाणू, दि. 21 : सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या शतक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बोर्डी, झाई, बोरीगाव व देहरी शाखेच्या वतीने बोर्डी येथे संघाचा 42 वा वार्षिक क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन माजी एन.सी.सी. कमांडो मोरेश्वर सावे व आर्यन मॅन हार्दिक पाटील यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलीत करून करण्यात आले. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष अजय ठाकूर, उपाध्यक्ष स्वाती चौधरी, स्वागताध्यक्ष प्रभाकर राऊत यांच्यासह कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून खासदार राजेंद्र गावित उपस्थित होते.

यावेळी बोलताना हार्दिक पाटील म्हणाले की, अंगाशी जिद्द व चिकाटी बाळगल्यास प्रत्येक खेळाडू हा जिवनात यशस्वी होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षापासून या क्रिडा महोत्सवी व्यासपिठाशी माझा संबंध आल्यामुळेच आर्यन मॅन म्हणून मी आज देशाचे प्रतिनिधीत्व करित असल्याचे त्यांनी सांगितले. तर सोमवंशी क्षत्रिय समाज हा चांगलं काय आणी वाईट काय याचे आकलन होणारा समाज असल्याचे सांगून गेली 42 वर्षे राबवित असलेल्या क्रिडा महोत्सव उपक्रमाचा गौरव खासदार गावित यांनी केला.

या दोन दिवसीय क्रिडा महोत्सवास मुंबई ते देहरीपर्यंतच्या 40 शाखेतून हजारो खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. यात कबड्डी, हॉलीबॉल, खोखो, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ, रायफल शुटींग, भालाफेक, गोळाफेक, धावणे, लांबउडी आदी वैयक्तीक व सांघिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेत बोर्डी संघ अंतिम विजेता ठरला तर खुंतोडी संघाने हॉलिबॉल स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले.

यावेळी उद्योजक अशोक पाटील ऑलंपिअन आनंद मिनेजेस व आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. बोर्डी येथे लवकरच मेरीटाईम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट अ‍ॅक्टिविटी सुरू करण्याचा मानस उद्योजक पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. खेळ खुप काही शिकवितो, परंतू हरणे हा अंत नाही तर आपण पुन्हा जिंकतो. देशात खेळाला खुप मान आहे. खेळ हा स्वप्न दाखवतो; तेव्हा शारिरीक व मानसिक विकासासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यास खेळण्यास प्रोत्साहन देण्याचे आव्हान ऑलंपिअन मॅनेजेस यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष प्रभाकर राऊत तर सुत्रसंचलन पुनम राऊत यांनी केले. या क्रिडा महोत्सवात सुमारे दहा हजार क्रिडा रसिक सहभागी झाले होते. क्रिडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी बोर्डी, झाई व बोरिगाव शाखेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मैदानी खेळात आपल्या अंगभूत गुणांनी स्वत:च्या नावाचा वैशिष्ट्यपुर्ण ठसा उमटवणारे हर्षद सावे उर्फ गोटू यांनी आपली निवृत्ती जाहिर केल्याने त्यांचा उद्योजक अशोक पाटील व संघाचे अध्यक्ष अजय ठाकूर यांच्या हस्ते बोर्डी शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

हर्षद सावे हे गेली 30 वर्षे बोर्डी शाखेतून खेळत आहेत. यापैकी त्यांनी 17 वर्षे बोर्डी व देहरी संघास कबड्डी स्पर्धेस विजेते पद मिळवून दिले आहे. याशिवाय 7 आंतरराष्ट्रीय व 64 वेळा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला होता. गोळाफेक, कुस्ती, बॉक्सिंग, हँडबॉल, पॉवर लिफ्टींग अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी अनेक पदके संपादित केली आहेत. या संघाच्या शताब्दी वर्षात त्यांनी स्पर्धेमधील कबड्डी खेळाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून आपण निवृत्त होत आहात हा एक ह्रद्य व अपूर्व असा योग आहे, अशी प्रतिक्रिया बोर्डी शाखेच्या वतीने व्यक्त केली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments