बिपिन लोहार यांना दिलासा; विनयभंगाचे आरोप खोटे ठरले; पोलिस निरीक्षकावर कारवाईचे निर्देश

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 17 : खोट्या गुन्ह्यात निरपराध उद्योजक बिपिन लोहार यांना अडकवणे डहाणूचे भूतपूर्व पोलीस अधिकारी सुदाम शिंदे यांना चांगलेच महाग पडले आहे. डहाणूचे तत्कालीन पोलीस उप अधिक्षक सचिन पांडकर देखील अडचणीत आले आहेत. लोहार यांनी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे केलेल्या तक्रारीवर प्राधिकरणाने निकाल दिला असून पोलीस निरीक्षक शिंदे व उप अधिक्षक पांडकर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. प्राधिकरणाने शिंदे यांच्यावर कठोर कारवाईची प्रक्रीया सुरु करावी व पांडकर यांना नापसंतीचे पत्र देण्यात यावे, असे निर्देश गृह विभागाला दिले आहेत. तत्कालीन पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंघे यांना मात्र प्राधिकरणाने क्लिन चिट दिली आहे. लोहार यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हेमंत देशपांडे यांनी बाजू मांडली.

बिपिन लोहार हे डहाणूतील प्रतिथयश लघुउद्योजक असून 28 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्यावर विनयभंग केल्या प्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी लोहार यांना तातडीने अटक करुन पोलीस कोठडीत रवानगी केली व 1 ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका झाली.

संबंधित बातमी : बिपीन लोहार यांच्यावर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

28 सप्टेंबर रोजी तक्रारदार महिला तिच्या पती सोबत डहाणू पोलीस स्टेशनला आली व बिपिन लोहार यांनी त्यांच्या फॅक्टरीत गेली असताना ब्लाऊज फाडून विनयभंग केल्याची तक्रार केली. पाठोपाठ लोहार पोलीस स्टेशनला पोहोचले व तक्रारीचे स्वरुप पाहून स्वतःच्या फॅक्टरीतील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना सादर केले. फूटेजमध्ये तक्रारदार महिला स्वतःचा ब्लाऊज स्वतःच फाडत असल्याचे व तिचा पती ब्लाऊज फाडायला मदत करत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र पोलीस निरीक्षक शिंदे यांनी महिलेची तक्रार दाखल करुन घेतली व त्वरीत लोहार यांना अटक देखील करण्यात आली.

28 तारखेला अटक करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात 29 तारखेला दुपारी अटक केल्याचे दाखवण्यात आले. 28 सप्टेंबर 2017 रोजी तक्रार दाखल करताना पोलीस उप अधिक्षक सचिन पांडकर हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर असल्याचा दावा सुदाम शिंदे यांनी केला. त्यामुळे पांडकर हे शिंदे यांचे वरिष्ठ अधिकारी असताना त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष व डोळेझाक केली असा ठपका पांडकर यांच्यावर ठेवण्यात आला.

अटक व सुटका झाल्यानंतर बिपिन लोहार यांनी खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि पोलिसांचे पितळ उघडे पडले. त्यानंतर डहाणू पोलिसांनी सपशेल शरणागती पत्कारत तक्रार रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे अहवाल सादर केला आहे. या केसमधून आता बिपिन लोहार यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments