वाडा : मांडूळ तस्करी करणारे चार आरोपी जेरबंद

0
985
  • वाडा वनविभागाची धडक करवाई
  • 30 लाखांचा मांडूळ साप जप्त

दिनेश यादव/वाडा, दि. 17 : मांडूळ या दुर्मिळ प्रजातीच्या सर्पाची तस्करी करणार्‍या चौकडीला वाडा वनपरिक्षेत्रा (पश्चिम) च्या अधिकार्‍यांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने अटक करण्यात यश मिळवले असून या चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाडा वनपरिक्षेत्र पश्चिम विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांना गोपनीय सुत्रांकडून, या भागामध्ये मांडूळ सापाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाली होती. या माहितीच्या अधारे चौरे यांनी स्वतः ग्राहक बनून या तस्करांशी संपर्क साधला. बोलणी अंती मांडूळ सापाची किंमत 30 लाखावर निश्चित झाली व व्यवहार ठरला. त्यानुसार चौरे यांनी आरोपी हरीशचंद्र पयर (वय 36, रा.भाईंदर), संजय भंडारी (वय 38, रा. मलवाडा, ता. विक्रमगड), तुकाराम हरवटे (वय 45, रा. कर्‍हे, ता. विक्रमगड) व त्रिंबक लिलका (वय 66, रा. कुंज, ता. विक्रमगड) यांना मनोर येथील मस्तान नाका येथे भेटण्यास बोलावले व प्रत्यक्ष मांडूळ पाहायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार आरोपी ठरलेल्या ठिकाणी मांडूळ घेऊन आल्यानंतर चौघांनाही अटक करण्यात आली व त्यांच्याकडून मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला.

मांडूळ प्रजातीचा सर्प औषधी तसेच जादूटोणा (काळी जादू) करण्यासाठी वापरला जात असल्याने याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. तसेच तस्करांकडून लाखो-कोट्यावधींच्या किंमतीत हा साप विक्री केला जातो. दरम्यान, याप्रकरणी आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 44, 50, 51 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास संदीप चौरे करत आहेत.

या कारवाईमध्ये अविनाश कचरे, दशरथ कदम, सुरेंद्र ठाकरे, धम्मपाल म्हस्के, जावेद खान, आनंद जाधव, एल.एन. केंद्रे, सी.टी. बागकर, के. एस. सोनवणे, ज्ञानेश्वर आकरे, वाय. एन. सपकाळ आदी वन कर्मचारी सहभागी होते.

Print Friendly, PDF & Email

comments