बोर्डीच्या सु.पे.ह. हायस्कूलचा शतक महोत्सव पूर्तता सोहळा दिमाखात संपन्न!

0
5788

प्रतिनिधी/डहाणू, दि. 12 : पालघर जिल्ह्यात शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बोर्डीच्या सु. पे. ह. हायस्कूलचा शतक महोत्सव पूर्तता सोहळा काल, 11 जानेवारी रोजी शाळेतल्या भव्य पटांगणावर दिमाखात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पूणे येथील श्रृतीसागर आश्रमाचे अध्यक्ष प. पू. स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज, सन्माननीय अतिथी म्हणून नाशिक येथील मृणालिनीज् हर्बास्यूटीकल्स्चे संचालक डॉ. राहुल फाटे, विशेष अतिथी म्हणून आमदार सौ. मनिषा चौधरी, सुप्रसिध्द उद्योजक अशोक पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव व महासंचालक डॉ. मो. स. गोसावी तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व चेअरमन एस. बी. पंडित, व्हाईस चेअरमन सुहासिनी संत, विभागीय सचिव प्रभाकर राऊत, उद्योजक नितीन मेहता, एन. के. पाटील, नरेश राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यानिमित्ताने सकाळी 11.30 वाजता नियोजित मेरीटाईम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

प्रभाकर राऊत यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या 1920 पासुनच्या वाटचालीचा आढावा घेताना वेळोवेळी समाजातील दानशूर व्यक्ती व माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी शाळेतील माजी मुख्याध्यापक व शिक्षकांचा तसेच अथक परिश्रमाने संस्थेच्या उभारणीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हातभार लावणार्‍या व्यक्तींचा व अशांपैकी हयात नसणार्‍या व्यक्तींच्या नातेवाईकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष बाब म्हणजे यामध्ये चित्रे गुरुजींची नात हेमा चित्रे, आपल्या दहा रूपये पगारातील दोन रुपये दरमहा संस्थेसाठी मदत म्हणून देणारे संस्थेत गडी म्हणून काम करणारे दामू राऊत यांचे नातू जयंत राऊत, गोविंदराव चुरींचा नातू यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना मूळ बोर्डीचे असणारे, शाळेचे माजी विद्यार्थी व यशस्वी उद्योजक अशोक पाटील यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना सांगितले की, आपल्याला मिळालेल्या सागरी किनार्‍याचा आपण चांगला उपयोग करून घेतला नाही. त्यामुळे मेरी टाइममध्ये आपली म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. त्यांनी यावेळी आपल्या जहाज बांधणी व दुरुस्तीच्या व्यवसायाची सविस्तर माहिती देऊन बोर्डी येथे या संबंधित शिक्षणाची सोय झाल्यास या क्षेत्रात व्यवसायाला नविन चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. आज या क्षेत्रात काम करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने परदेशी तज्ञांवर अवलंबून रहावे लागते. एवढा मोठा सागरी किनारा उपलब्ध असूनही मेरीटाईम शिक्षणाची व्यवस्था नाही. त्यामुळे आपल्या संस्थेच्या सहकार्याने मेरीटाईम शिक्षणासाठी विद्यालय सुरु करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे व पुढील सर्व कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. थिअरीचे शिक्षण बोर्डी येथे दिले जाणार असून प्रात्यक्षिक आमच्या दातिवरे येथील जहाज बांधणीच्या कंपनीत दिले जाईल. यासाठी परदेशी शिक्षण संस्थांशी संपर्क साधून आपल्या विद्यालयाचा अभ्यासक्रम ठरवून पुढील वाटचाल करण्याचा विचार करत आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली. शेवटी परिसरातील जेष्ठ नागरिक व माजी विद्यार्थ्यांना याकामी सहकार्याचे आवाहन त्यांनी केले. वाढवण बंदराचाही त्यांनी यावेळी उल्लेख करुन या क्षेत्रात वाढवण बंदराची मोठी आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

आमदार मनिषा चौधरी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील काही आठवणी न विसरता येण्यासारख्या आहेत असे सांगून आज या पदापर्यंत पोहोचण्याचे सर्व श्रेय शाळेला दिले. शाळेतील गुरु दक्षिणा मंदिराच्या नुतनीकरणाचे काम करुन घेण्याची जबाबदारी स्विकरतानाच त्यांनी आज भूमिपूजन झालेल्या मेरीटाईम शिक्षण उपक्रमाच्या उभारणीत शासन दरबारी काहीही अडचण असल्यास मी मदतीला सदैव तयार असल्याचे आश्‍वासन दिले. आज माझा झालेला सत्कार म्हणजेच माझ्या माहेरचा सत्कार असल्याचे सांगताना त्या थोड्या भावूक झाल्या व शेवटी त्यांनी संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. राहूल फाटे यांनी याप्रसंगी बोलताना या शिक्षण संस्थेच्या दर्जाचे विशेष कौतुक करुन त्यासाठी संस्था चालकांना धन्यवाद दिले. इथे शिक्षक व विद्यार्थ्यांना संस्थेविषयी प्रचंड आत्मियता असल्याचेही ते म्हणाले. या परिसरात ब्युटीशियनची डिग्री देणारे एकही महाविद्यालय नसल्याचे सांगून त्यांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन संस्थेला केले. तर स्वामी स्वरुपानंद यांनी उपस्थितांना संबोधित करताना समाज कसा असावा, कसा घडवावा याबाबत आध्यात्मिकदृष्ट्या सुंदर विवेचन केले. आपण जेव्हा समाजाचा, संपूर्ण मानव जातीचा विचार करतो त्यावेळी विकासाचा केंद्रबिंदू माणूस आहे असे सांगतानाच जरी निसर्गामध्ये विविध सजीव प्राणी पक्षी असले तरी विचार, चिंतन, मनन करण्याची अद्भूत शक्ती निसर्गाने केवळ मानवाला दिलेली आहे. या शक्तीच्या सहाय्याने मनुष्य काहीही करु शकतो. आज आपण आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास झाला असे म्हणतो; पण खरोखरच विकास झालाय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे असे सांगताना आध्यात्मिक व धार्मिक ग्रंथातील अनेक श्लोकांचा त्यांनी आधार घेतला. संस्थेने विद्यार्थी यशस्वी होताना तो चारित्र्यवान होईल याकडेही विशेष लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. गोसावी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संस्थेचा हा वटवृक्ष 100 वर्ष ताठ मानेने उभा राहण्यामध्ये व संस्था नावारूपाला येण्यामागे मागील 100 वर्षातील माजी मुख्याध्यापक, प्रिन्सिपल व शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. स्वामींचे मार्गदर्शन म्हणजे आपल्याला एक आशिर्वाद आहे, असे सांगून शेवटी त्यांनी संस्थेच्या विकासात केलेल्या सहकार्याबद्दल माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले.

कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक, देश व विदेशातील माजी विद्यार्थी, परिसरातील नागरिक, जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व स्वायत्त संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्ताने शाळेच्या आवारामध्ये शालेय मित्र आनंदाने एकमेकांना आलिंगन देऊन भेटताना व आपल्या त्यावेळच्या शिक्षकांच्या पाया पडून आशिर्वाद घेतानाचे चित्र दिसत होते. तर कित्येक जेष्ठ माजी विद्यार्थ्यांनी आजचा दिवस आमच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असून आज आम्हाला एक प्रकारची उर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केली. आभार प्रदर्शन सौ. विणा माच्छी यांनी केले.

Print Friendly, PDF & Email

comments