पत्रकारिता जगण्यासाठी नव्हे, तर जगवण्यासाठी! -संजीव जोशी

0
16375

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 6 : पत्रकारिता जगण्यासाठी नसून जगवण्यासाठी आहे आणि ती कुठल्याही दडपणाशिवाय करता आली पाहिजे, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे अखिल भारतीय सरचिटणीस, तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथे बोलताना काढले. ते दर्पण दिनानिमित्त डहाणू व तलासरी तालुका पत्रकार परिषदेतर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी अच्युत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत शेख, उपाध्यक्ष नारायण पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मागील वर्षात दिवंगत झालेल्या सदस्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

पुढे बोलताना जोशी म्हणाले की, पत्रकारिता हा व्यवसाय नसून तो पेशा आहे. पेशामध्ये नेहमी नवनविन शिकण्याची तयारी ठेवायला पाहिजे. पत्रकारांनी नेहमीच रोजच्या रोज अद्ययावत होणारे तंत्रज्ञान जाणून घेतले पाहिजे. यासाठीच मराठी पत्रकार परिषदेतर्फे विविध विषयांवर सर्वच पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. माध्यमांनी म्हणजेच पर्यायाने पत्रकारांनी लोकांचे प्रबोधन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच पत्रकारांकडून समाजाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पण पत्रकारांच्या सामाजिक, आर्थिक अडचणी जाणून घेण्याचा किंवा सोडविण्याचा कोणीही प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आपल्या अडचणी सोडविण्यासाठी आपल्याला एकजूटीने प्रयत्न करावे लागतील, असे जोशी म्हणाले.

प्रभाकर पाटील यांनी, ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या इमारतीच्या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या विविध अडचणींचा उहापोह करुन पत्रकारांनी काम करताना कोणती व कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. अच्युत पाटील व शौकत शेख यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या प्रदीर्घ अनुभवाने उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच पत्रकारांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करु, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष नारायण पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन अध्यक्ष शौकत शेख यांनी केले.

Print Friendly, PDF & Email

comments