प्राचार्य संतोष लुले यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

0
787

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 3 : तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संतोष लुले हे नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने 31 डिसेंबर रोजी त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. राजतंत्रचे संपादन संजीव जोशी यांनी अध्यक्ष स्थान भुषविले.

संतोष लूले हे 15 जून 1984 पासून संस्थेत अध्यापक म्हणून रुजू झाले. दरम्यान ऑक्टोबर 2014 मध्ये त्यांना प्राचार्य म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी सन 2003 ते 2014 या कालावधीत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांनी लिहिलेली डी.टी.एड प्रथम वर्ष गणित विषय आणि द्वितीय वर्ष विज्ञान विषयांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी उपक्रमांबद्दल त्यांना विविध पारितोषिके मिळाली असून राज्य व जिल्हा स्तरावर अध्यापक व विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरांमध्ये त्यांनी नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशी यांनी उपस्थितांना संबोधित करताना लुले यांनी संस्थेमध्ये भावी शिक्षक घडवताना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करुन त्यांच्या अंगभूत कलागुणांची ओळख करुन दिली. तसेच यापुढेही संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्सव मुर्ती लूले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्था, संस्थेचे विश्वस्त, सहकारी अध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळाल्याने संस्थेतील माझा सर्व कार्यकाळ फारच आनंदी होता, असे सांगून सगळ्यांचे आभार मानले. तसेच यापुढेही याच शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी संस्थेचे खजिनदार सुधीर कामत यांच्या हस्ते लुले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीनेही शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी त्याचबरोबर लुले यांचे आप्तेष्ट व कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments