बंडखोरांची केली हकालपट्टी

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 30 : तालुक्यातील सायवन व मोडगाव जिल्हा परिषद गट तसेच सायवन व हळदपाडा पंचायत समिती गण न लढवता या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे व पालघर जिल्हा कमिटीने एकमताने घेतला होता.

त्यानुसार सायवन आणि हळदपाडा या पंचायत समिती गणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपले उमेदवार उभे केले नव्हते. मात्र पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात सायवन जिल्हा परिषद गटात जगदीश लहू सापटा आणि मोडगाव जिल्हा परिषद गटात मेरी रघ्या रावत्या यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरुन माघार घेण्यास नकार दिला. यातून मित्रपक्षांबरोबरची विश्वासार्हता जपण्यासाठी पक्ष शिस्तीचा बडगा उगारत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जगदीश सापटा आणि मेरी रावत्या यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघाच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राजेश पारेख आणि काशिनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉ. विनोद निकोले यांना विजयी करण्यासाठी केलेले मोलाचे सहकार्य लक्षात घेऊन माकपाने ही भूमिका घेतल्याचे जाहीर केले आहे.
डहाणू मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आणि लाल बावट्याला मानणारे सर्व कार्यकर्ते तसेच येथील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार करून आणि भरघोस मतदान करून त्यांना विजयी करतील, असा विश्वास माकपचे जिल्हा सचिव आणि राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. बारक्या मांगात व राज्य कमिटी सदस्य आमदार कॉ. विनोद निकोले यांनी व्यक्त केला आहे.
माकपने पाठिंबा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
* सायवन गट – काशीनाथ गोविंद चौधरी,
* सायवन गण – पिंटी रमेश बोरसा,
* मोडगाव गट – मंदा काशीराम घरत,
* हळदपाडा गण – राजेश महादू सुतार.