सीएए व एनआरसी विरोधात बहुजन समाजाचा मूक मोर्चा

0
1553
हजारोंच्या संख्येने मोर्चेकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

वार्ताहर/बोईसर, दि. 24 : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात पालघर जिल्हा बहुजन समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चेकर्‍यांच्या उपस्थितीने जिल्ह्यातील यापूर्वीच्या सर्व मोर्चांचे विक्रम मोडीत काढल्याचे दिसुन आले.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी व सुधारित नागरिकत्व कायदा हा अन्यायकारक व संविधान विरोधी असल्याचे नमूद करून भाजपा वगळता इतर सर्व प्रमुख राजकीय पक्षाने एकत्रितपणे या मूक मोर्चाचे आयोजन केले होते. पालघरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यामध्ये बोईसरचे आमदार राजेश पाटील, भूमीसेनेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, मोर्चाचे संयोजक हाजी साजिद शेख आदींसह विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व हजारो नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा शांततेत पार पडला. तर मोर्च्याच्या अनुषंगाने पालघर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच काही रस्ते मोर्चा संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, मोर्च्याच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव यांना यासंदर्भातील निवेदन दिले.

Print Friendly, PDF & Email

comments