बोईसर : सीसीटीव्हीमुळे चोरटा गजाआड

0
636

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 24 : येथील अवधनगर भागात घरफोडी करुन 38 हजारांचा ऐवज लंपास करणार्‍या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले असुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा चोरटा कैद झाल्याने काही तासातच या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले. मोहम्मद शेहबाज शरीफ खान (वय 27) असे सदर चोरट्याचे नाव आहे.

23 डिसेंबर रोजी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास बोईसर शहरातील अवधनगर येथील दुबे बिल्डींगमधील तिसर्‍या मजल्यावर राहणारे मोहम्मद नफीज खान यांच्या घराच्या एका खिडकीचे हुक वाकवून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून एकुण 38 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर बोईसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने घटनास्थळाची पाहणी करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात मोहम्मद खान हा घटनास्थळाजवळ संशयास्पदरित्या वावरताना आढळून आला. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याची कसुन चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, अटकेत असलेला मोहम्मद खान हा चोरटा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असुन त्याच्यावर यापुर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्याचे समजते.

Print Friendly, PDF & Email

comments