
राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 23 : पेटीएमच्या केवायसी प्रक्रियेच्या नावाखाली अज्ञात भामट्याने हायटेक चोरी करत डहाणू येथील 62 वर्षीय फिरोजा ताफ्ती यांच्या बँक खात्यातून 33 हजार 700 रुपयांची रक्कम लंपास केली आहे. ताफ्ती यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास करण्यात येत आहे.

पर्यावरण प्रेमी म्हणून ओळखल्या जाणार्या फिरोजा ताफ्ती यांना 19 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या पेटीएम या डिजीटल वॉलेट अॅपची केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्याच्या नावाखाली अज्ञात क्रमांकावरुन फोन आला होता. यावेळी समोरील इसमाने या प्रक्रियेच्या बहाण्याने स्क्रीन शेअरींगच्या माध्यमातून त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर ताबा मिळवला व त्यानंतर पहिले 25 हजार, नंतर 8 हजार व पुन्हा 700 रुपये अशा पेटीएम ट्रान्झेक्शनसाठी ओटीपी क्रमांक मिळवून अशाप्रकारे त्यांच्या पेटीएमशी लिंक असलेल्या आयसीआयसीआय बँक खात्यातून एकुण 33 हजार 700 रुपये लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ताफ्ती यांनी तत्काळ डहाणू पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दाखल केली असुन त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, मागील काही वर्षात ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढताना दिसत असुन केवायसी, लॉटरी तसेच बँकेचे एटीएम कार्ड अनब्लॉक करण्याच्या नावाखाली शेकडो लोकांची दररोज फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बँका, डिजीटल वॉलेट कंपन्या व इतर ऑनलाईन व्यवहाराशी संबंधित कंपन्या ग्राहकांना आपल्या खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती कुणालाही देऊ नये असे आवाहन करत असतात. मात्र तरीही अशा घटना थांबताना दिसत नाहीत.