नाजेरियन भाडेकरुंची माहिती लपवली; 5 घरमालकांवर गुन्हे दाखल

0
830

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 21 : नायजेरियन भाडेकरुंची पोलीस स्टेशनमध्ये माहिती न दिल्याने नालासोपारा पुर्वेतील प्रगतीनगर येथील 5 घरमालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार, प्रगतीनगरमध्ये राहणार्‍या बाबा गुप्ता, विशाल कराळे, शबाना फैजल बेग, वसिम नजीम फहीम खान व राजु केशव मोर्या या पाच घरमालकांनी एकुण 6 नायजेरियन नागरीकांना आपले घर भाड्याने दिले होते. नायजेरियन नागरीकांकडून होणारी अमली पदार्थांची तस्करी व विक्री तसेच बांगलादेशी नागरीकांकडून देशविरोधी कृत्य घडवून आणण्याच्या संभावनेतून पालघर जिल्हा पोलीस दलातर्फे मागील काही दिवसांपासुन अशा परदेशी नागरीकांना घर भाड्याने दिल्यास त्याबाबतची माहिती संबंधित पोलीस स्टेशनमध्ये देण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. तसेच माहिती न देणार्‍या घरमालकांवर कारवाईचा इशारा दिला होता. मात्र तरी देखील प्रगतीनगरमध्ये राहणार्‍या सदर घरमालकांनी नायजेरियन नागरीकांना घरे भाड्याने देऊन त्यांची माहिती लपवल्याचे समोर आल्यानंतर या पाचही घरमालकांविरोधात तुळींज पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मागील 10 महिन्यांपासुन सदर नायजेरियन नागरीक वरील घरमालकांच्या घरात भाड्याने राहात असल्याची महिती समोर आली.

तुळींज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, आपल्या मालकीच्या घरात विदेशी नागरीक भाडेकरु म्हणुन राहत असल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला अवगत करावे. तसेच अशा प्रकारची कारवाई आपल्यावर होऊ नये म्हणून घरमालकांनी परदेशी भाडेकरुंबाबत माहिती दिली नसेल तर तात्काळ आपल्या नजिकच्या पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन पुन्हा एकदा पोलिसांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments