रेती माफियांचा धुमाकूळ; पोलीस अधीक्षकांच्या अंगरक्षकावर ट्रक चढवण्याचा प्रयत्न!

0
561

पोलिसांच्या कारवाईत सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

विरार, दि. 19 : येथील खार्डी रेती बंदरावर अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्वत: पोलीस अधीक्षकांनी या बंदरावर धाड टाकली असता पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ट्रक चालकाने पोलीस अधीक्षकांच्या अंगरक्षकावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर विरार पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्यानंतर 15 जेसीबी, 2 ट्रक व 3 ब्रास रेती असा एकुण 2 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग हे आपले अंगरक्षक पोलीस शिपाई दिनेश महादु पाटील व चालक पोलीस शिपाई राहुल दळवी यांच्यासह रविवारी (दि. 17 नोव्हेंबर) रात्री 9.30 च्या सुमारास विरारहून मिरारोडच्या दिशेने जात असताना खार्डी रेती बंदरावर अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे याबाबत खात्री करण्यासाठी पोलीस अधीक्षक सिंग हे आपल्या अंगरक्षक व चालकासहच घटनास्थळी पोहोचले असता येथे मोठ्या प्रमाणावर रेती उत्खनन व त्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. दरम्यान, पोलिसांची धाड पडल्याचे रेतीमाफियांच्या लक्षात आल्यानंतर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एम.एच.04/एफ.जे.3221 व एम.एच.48/टी.2990 या क्रमांकाच्या ट्रकपैकी एम.एच.04/एफ.जे.3221 या क्रमांकाच्या ट्रकचालकाने पोलीस अधीक्षकांचे अंगरक्षक दिनेश पाटील यांच्यावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ते यातून थोडक्यात बचावले. यानंतर विरार पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आल्यानंतर या बंदरावरुन 15 जेसीबी, दोन ट्रक व 3 ब्रास रेती असा 2 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असुन एम.एच.04/एफ.जे.3221 व एम.एच.48/टी.2990 या क्रमांकांचे ट्रकचालक ट्रकसह फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. तर निरज लाला यादव (वय 29), अनिल तुकाराम चव्हाण (वय 26) व सुनिल इंद्रजीत चव्हाण (वय 20) अशा तीन रेतीमाफियांना अटक करण्यात आली.

अटक तिन्ही आरोपींसह संबंधितांविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 307, 379, 353, 413, 431, 34 सह पर्यावरण अधिनियम कलम 14, 15, 19 व जमीन महसुल अधिनियम कलम 48 (7)(8) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, या बंदरावर दररोज अवैधरित्या शेकडो ब्रास रेतीचा उपसा होत असल्याच्या माहितीवरुन 15 दिवसापूर्वीच महसूल विभागाने येथे छापा मारला होता. मात्र त्यानंतरही रेती माफियांकडून रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरुच होती.

Print Friendly, PDF & Email

comments