सुदैवान जीवितहानी नाही

पालघर, दि. 10 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गवरील पालघर तालुक्याच्या हद्दीत येणार्या मेंढवण येथील कौटुंबी नदीत काल, शनिवारी (दि. 9) रसायन वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, अपघातग्रस्त टँकरमधील रसायन नदीत पसरल्याने संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाले असुन या अज्ञात रसायनामुळे फेसाचे मोठे झब्बे तयार झालेले दिसले.

या नदीतून पालघर नगर परिषद हद्दीत मोडणार्या पालघर, टेंभोडे, वेवूर, नवली, आल्याळी, घोलवीरा, लोकमान्य नगर, डुंगी पाडा, गोठणपूर तसेच बोईसर औद्योगिक वसाहत व परिसरातील 25 गावांसह वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील भागात पाईपलाईनद्वारे पाणी पुरविले जाते. त्यामुळे नदीच्या प्रदूषित पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ही घटना घडून 24 तास उलटल्यानंतरही पाणी पुरवठा विभाग तसेच एमआयडीसीचे अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा महसूल विभागाने देखील कोणतीही दखल न घेतल्याने या परिसरातील नागरिकांना हेच प्रदूषित पाणी पुरवठा होत असल्याचे समजते.
दरम्यान, पाण्यात रसायन मिसळल्याने नदीतील अनेक मासे मृत पावल्याचे वृत्त असुन यावरुन हे रसायन मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.