पालघर जिल्हा परिषद निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

0
1212

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका संपत नाही तोच पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत आठ पंचायत समित्यांचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी 2020 मध्ये संपत असल्याने आता जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकींकरिता प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असुन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 57 तर आठही पंचायत समित्यांची एकूण सदस्यसंख्या 114 असणार आहे.

पालघर जिल्हा परिषदेची मुदत पुढील वर्षी 17 फेब्रुवारीला आणि त्या अंतर्गत येणार्‍या तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या पंचायत समित्यांची मुदत 15 फेब्रुवारीला संपणार असून त्यापूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे बंधनकारक आहे. याकरिता पालघर जिल्हाधिकार्‍यांकडून देण्यात आलेल्या 2011 च्या जनगणनेवर आधारित जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2019 च्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सदस्य संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार एकूण सदस्य संख्येची पंचायत समिती क्षेत्रनिहाय विभागणी, आरक्षण ठरविणे, पंचायत समितीस देय असलेल्या जागा आणि त्यांचे आरक्षण निश्चितीचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव 30 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे. या प्रस्तावास 5 नोव्हेंबरपर्यंत विभागीय आयुक्तांकडून मान्यता देणे अपेक्षित आहे. 8 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची सूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेकरिता जिल्हाधिकारी आणि 13 नोव्हेंबर रोजी त्या – त्या पंचायत समितीसाठी तहसीलदार काढतील. 13 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करतील.

Print Friendly, PDF & Email

comments