मोखाड्यातील शेकडो शेततळ्यांना आच्छादनाची प्रतिक्षा

0
1112
  • शेतकर्‍यांचे दुहेरी नुकसान,
  • शेतीही नाही; दुबार पिकही नाही

मोखाडा, दि. 5 : शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली होती. परंतू आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी ही योजना फलदृप ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरली असुन मोखाडा तालुक्यातील शेकडो एकर उपजाऊ शेतीचे उत्पादन घटल्याचे समोर आले आहे.

शासनाने राज्यातील दुर्गम भागातील आर्थिक जीवनमानाचा विचार न करता मागेल त्याला शेततळे योजनेची अंमलबजावणी केल्याने मोखाडा तालुक्यात शेकडो लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होण्याऐवजी फटका बसलेला आहे. या योजनेनुसार शासनाकडून लाभार्थी शेतकर्‍याला 50 हजार रुपये अनुदान मिळणार. तर संबंधित शेतकर्‍याला शेततळ्यात प्लास्टिक आच्छादनासाठी स्वत: पदरमोड करुन प्लास्टिक विकत घ्यायचे आहे, असे या योजनेचे स्वरुप आहे. परंतू प्लास्टिक खरेदीसाठी सुमारे दिड लाख रुपये खर्च असल्याने व तेवढ्या खर्चाची ऐपत नसल्याने तालुक्यातील 90 टक्के शेततळे बेवारस पडून आहेत.

मोखाडा तालुक्यात मागेल त्याला शेततळे या संकल्पनेतून बहूतांश गावांमधून शेतकर्‍यांना फळबाग लागवडीसाठी उद्युक्त करण्यात येत आहे. तथापी ही योजना केवळ 50 हजार रूपयात राबवायची असल्याने शेतकर्‍यांमधुन मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही योजना शेतकर्‍यांसाठी सध्यातरी अडचणीची व खोळंबा ठरलेली आहे.

मोखाडा तालुक्यातील शेतकर्‍यांनी जलयुक्त शिवार, सामुहिक शेततळे आदी योजनांच्या माध्यमातुन फळबाग लागवडीकडे वाटचाल सुरू केली आहे व तालुक्यातील आणखीही शेतकरी भाजीपाला लागवडीसाठी प्रवृत्त होत आहेत. परंतू योजनेतील त्रुटींमुळे शेतकर्‍यांचा हिरमोड होत असल्याची लोकभावना आहे.

मोखाडा तालुक्यात आजपर्यंत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या अंतर्गत शेकडो शेततळी साकारण्यात आलेली आहेत. मात्र मुरमाड जमिनी व प्लास्टिक अभावी या शेततळ्यांचा काहीच उपयोग झालेला नाही. हीच परिस्थिती मागील 28 शेततळ्यांच्या बाबतीत झालेली आहे. शेततळ्यांचे निर्माण तर झाले. परंतु त्यामध्ये प्लास्टिकचे आच्छादन नसल्याने पाण्याचा साठा होत नाही. पर्यायाने शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेता येत नाही व हंगामी शेतीची लागवड करणेही दुरापास्त होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments