डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजपाने कसा गमावला?

Sanjeev Joshi/Rajtantra Media: डहाणूचे पराभूत आमदार पास्कल धनारे हे लाल बावट्यातून भाजपमध्ये आले आणि चिंतामण वणगांचे विश्वासू कार्यकर्ते बनले. रेशनिंग दुकानदार आणि दारुच्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेले होते. भाजपमधील तलासरी तालुक्यातील एक हुकमी कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांना मोदी लाटेत विधानसभा उमेदवारी मिळाली आणि निवडूनही आले.

परंतु त्यांचे तलासरी तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत वनवासी कल्याण केंद्र चालवून वणगा, सवरांसारख्या ३/४ पिढ्या निर्माण करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी फारसे जमले नाही. मला सर्व कळते हा अविर्भाव आणि अहंकारी वृत्तीने ते लवकरच अप्रिय होऊ लागले. त्यांच्याकडे संघटन कौशल्य नसताना भाजपने त्यांना जिल्हाध्यक्ष केले. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दारुच्या बाटल्यांची खंडणी गोळा करण्याच्या प्रयत्नातून व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे ते बदनाम झाले. या प्रकरणाच्या चौकशीत काय तथ्य निघाले ते भाजपने शेवटपर्यंत दडवले.

धनारे यांनी डहाणू नगरपरिषदेवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले. या आरोपांच्या चौकशीत कुठलेही तथ्य उघड करण्यात त्यांना व भाजपला अपयश आले. उलट तडजोडी केल्या. ज्या मुख्याधिकारी यांच्यावर आरोप केले त्या मुख्याधिकारी यांनाच शिफारसपत्र दिले. ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगराध्यक्षावर आरोप केले त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी लाल गालिचे अंथरले. पुढे नगरपरिषदेत भाजपची सत्ता आल्यानंतर ज्या प्रकरणात भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्याच प्रकरणात भाजपने स्वतःचे हात काळे केले. फोडाफोडी करुन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यातून भाजपमध्ये अनेक गट आणि तट तयार झाले. एक ओरीजनल भाजपच्या कार्यकर्त्यांचा, भाजपमध्ये आयात होऊन वरचढ झालेले, आणि अलीकडे आयात झालेले असे विविध गट आणि उपगट तयार झाले. भाजप वाढत गेली पण ती सूज असल्याचे धनारेंच्या पराभवानंतरच लक्षात आले. डहाणूत भाजपचा चेहरा हायजॅक झालेला आहे. अंतर्गत गटबाजीतून भाजपमध्ये कॉंग्रेस संस्कृती कशी रुळली ते कोणाला कळलेच नाही. त्यात पुन्हा विकासकामांच्या जोरावर मते न मागता राष्ट्रीय मुद्द्यांवर, ३७० कलम, मोदी व शहा यांच्या नावाने मते मागण्यात आली.


विश्व हिंदू परिषदेशी नाळ आणि योगदान असणारे रमेश मलावकर यांची बंडखोरी भाजप आणि धनारेंनी गांभीर्याने घेतली नाही. नंतर मलावकर यांची बंडखोरी कायम राहून चिन्ह मिळाल्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आली. परंतु तो पर्यंत नाराजी बऱ्यापैकी वाढली होती. मलावकर यांची वेगवेगळ्या गटांतर्फे समजूत काढून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला. एक गट समजूत काढेल तर दुसरा गट फितवण्याचा प्रयत्न करित होता. शिवसेनेशी अपमानास्पद वर्तन करण्यात आले. भाजपच्या बूथ लेव्हल मॅनेजमेन्टचे सूत्र गुंडाळून ठेवण्यात आले आणि व्यक्तीकेंद्रीत मॅनेजमेन्ट करण्यात आली. आर्थिक रसद पुरविण्यात कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव करण्यात आला. प्रतिस्पर्धी गटाच्या बूथवर भाजपला कमी मतदान व्हावे व त्या कारणाने त्या गटाचा काटा काढण्याचे डावपेच लढविण्यात आले. भाजपला अनुकूल असलेल्या क्षेत्रात मतदानाचा टक्का घसरला. या सर्व अंतर्गत कलहातून या मतदारसंघात भाजपनेच भाजपला हरवले असे म्हणता येईल.

PDF स्वरूपात बातमी वाचण्यासाठी या LINK वर CLICK करा!

Print Friendly, PDF & Email

comments