अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ला! डहाणू तालुक्यातील 2 महिला ठार

0
748

राजतंत्र मिडीया नेटवर्क
डहाणू, दि. 11 : जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवारी रात्री अमरनाथ दर्शन करुन परतणार्‍या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 7 जण ठार झाले असुन यात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दोन महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या 14 जणांपैकी 7 जण डहाणूतील रहिवासी आहेत. उषा मोहन सोनकर (डहाणू शहर) व निर्मला भारत ठाकूर (आशागड) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. याशिवाय यशवंत डोंगरे, योगिता डोंगरे, प्रकाश वजानी, भाग्यमंती ठाकूर, पुष्पा गोसावी, उर्जिला डोंगरे आणि विश्वनाथ डोंगरे अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हे सर्व प्रवासी DAHANU-DAHASHATWADI HALLA Main-Thakreमहाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील उंबरगांव येथून ओम ट्रॅव्हल्स या टूर ऑपरेटरमार्फत जी.जे. 09 झेड 9976 क्रमांकाच्या बसने जम्मू काश्मीरसह अमरनाथ यात्रेला गेले होते. तेथून परतत असताना काल रात्री 8.20 वाजेदरम्यान दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीनगरहून कटरा येथे परतत असताना यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली आणि हीच संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे.
लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी संयुक्तपणे हा हल्ला केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिली आहे. दहशतवाद्यांना स्थानिक हिजबुलच्या दहशतवाद्यांनी वाहतुकीसाठी मदत केली. बसवर गोळीबार करुन ती बस ताब्यात घेण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. मात्र बसचा चालक सलीम यांनी प्रसंगावधान दाखवत त्या परिस्थितीतही बस मिलिट्री कॅम्पपर्यंत आणल्याने बसमधील इतर प्रवाशांचे प्राण वाचले.
अमरनाथचे दर्शन घेतल्यानंतर सोनमर्गमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. वास्तविक रात्री सात वाजेनंतर या भागातील महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्यास मनाई असताना नियमांचे उल्लंघन करणे जीवावर बेतल्याचा स्थानिक पोलिसांचा दावा आहे.
रात्री या हल्ल्यात डहाणूतील यात्रेकरु जखमी झाल्याचे वृत्त समजल्यानंतर लोकांच्या मनात अस्वस्थता पसरली. थोड्याच वेळात मृतांची नावेही कळली. ही बातमी खोटी ठरावी या आशेने लोक प्रार्थना करु लागले. पण ही अप्रिय बातमी अखेर खरी ठरली. योगायोगाने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या डहाणूत मुक्कामास होत्या. त्यांनी केंद्रीय पातळीवर सर्व उपलब्ध मदत मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सुरू केले. या मृतदेहांना हवाई मार्गे प्रथम सुरत येथे आणण्यात आले व तेथून डहाणूतील मृतांना हेलीकॉप्टरने आणण्याची व्यवस्था करण्यात आली. मृतदेह प्रथम अंत्यदर्शनासाठी अग्यारी हॉल येथे ठेवण्यात आले होते. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्यासह आमदार पास्कल धनारे, अमित घोडा, मनीषा चौधरी यांसह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वतः स्मृती इराणी यांनी सुरत येथे जाऊन याबाबत महत्वाची भूमिका पार पाडली. डहाणू शहरात कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान डहाणूतील व्यक्ती बळी ठरल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये या करीता डहाणू तालुक्यासह पालघर जिल्ह्यात पोलीसांनी अतिरिक्त कुमक मागवून बंदोबस्तात वाढ केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कठोर शब्दात या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री स्वतः मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी डहाणूत येत असल्याची भाजपाच्या गोटात चर्चा आहे.

आज पालघर – बोईसर बंद

अमरनाथ यात्रेकरूंवरील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज बजरंग दलातर्फे पालघर – बोईसर बंद जाहीर करण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments