पालघर जिल्ह्यासाठी आशादायक असे पॉलिटिकल करेक्शन करणारे निकाल

Sanjeev Joshi/Rajtantra Media: राज्याच्या सार्वत्रिक निवडणूकांचे पालघर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निकाल पहाता ते पॉलिटिकल करेक्शन करणारे, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे असे आहेत. या निकालांतून पालघर जिल्ह्यासाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्याला विरोधी पक्ष मिळाले आहेत.

खरे तर पुर्वाश्रमीच्या अखंड ठाणे जिल्ह्यातील सध्याच्या पालघर जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेल्या भागात भाजपच्या तुलनेने शिवसेनेचा अधिक दबदबा होता. भाजप अस्तित्त्वापुरतीच होती. भाजप राष्ट्रीय पक्ष असल्याने येथून तत्कालीन डहाणू मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवली जात असे व चिंतामण वणगा यांची उमेदवारी कायम असे.  दिवंगत खासदार वणगा यांनी अनेक जय पराजय पचवले. ते भाजपच नव्हे तर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. स्वाभाविकपणे शिवसेना त्यांच्या प्रचारात सर्व हेवेदावे बाजूला ठेवून मनापासून उतरत असे.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर येथील समीकरणे बदलली.:२००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूका पुनर्रचित मतदारसंघाप्रमाणे झाल्या. डहाणू मतदारसंघाऐवजी पालघर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. डहाणू मतदारसंघातून ठाणे जिल्ह्यातील भाग वगळण्यात आला व उत्तर मुंबई मतदारसंघातील पालघर व वसई तालुक्याचा भाग समाविष्ट करण्यात आला. विधानसभा मतदारसंघाची देखील पुनर्रचना करण्यात आली. ही पुनर्रचना करताना नेमके काय निकष लावले ते आजही समजून येत नाही. डहाणू तालुक्यातील धाकटी डहाणू व जंगलपट्टीचा भाग मधले बोईसर वगळून पालघर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला. पालघर वगळून सफाळे ते एडवण कोरे भागाशी जोडून वसई तालुक्यातल्या काही भागासह बोईसर मतदारसंघ करण्यात आला. वाडा तालुका तर ३ मतदारसंघात विभागला गेला. त्यामुळे वसई वगळता सर्व मतदारसंघातील गणिते बदलली. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत पालघर मतदारसंघातून चिंतामण वणगा यांचा पराभव झाला व मतदारसंघ बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्या ताब्यात गेला. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूकीमध्ये वसई तालुक्यातील नालासोपारा मतदारसंघ व बोईसर मतदारसंघ बविआने मिळवले. एकंदरीतच मतदारसंघ पुनर्रचना हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या दृष्टीने अनुकूल ठरली. जव्हार मतदारसंघ विभागला गेला. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला दुभागला गेला. जव्हारसह तयार झालेल्या विक्रमगड मतदारसंघावरील माकपची पकड सुटली मात्र त्यांनी डहाणू मतदारसंघ काबीज केला. विष्णू सवरा यांचा वाडा मतदारसंघ संपुष्टात आल्याने त्यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक जिंकली. पालघर तालुका विभाजीत झाल्याने पालघर मतदारसंघ सेनेच्या हातातून निसटून कॉंग्रेसच्या ताब्यात गेला. शिवसेनेला अनुकूल झालेल्या विक्रमगड मतदारसंघातून लोकसभेत पराभूत झालेल्या वणगा यांनी इच्छा दर्शविल्यानंतर त्यांचा मान राखून शिवसेनेने हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला व वणगांना निवडूनही आणले. वसई मतदारसंघातून शिवसेना पुरस्कृत अपक्ष विवेक पंडित निवडून आले. एकंदरीतच मतदारसंघ पुनर्रचनेनंतर सर्व गणिते बदलली.

२०१४ ची मोदी लाट :२०१४ च्या मोदी लाटेत पालघर जिल्ह्यातून भाजपला लॉटरी लागली. लोकसभा निवडणूकीत वणगा निवडून आले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत भिवंडी ग्रामीण मतदारसंघात उपरे ठरलेले विष्णू सवरा यांना विक्रमगड मतदारसंघ देण्यात आला. तेव्हापासूनच भाजपच्या स्थानिक इच्छुकांमध्ये असंतोष सुरु झाला असला तरी भाजपला अनुकूल वातावरणात ते निवडून आले. पालघर मतदारसंघ पुन्हा शिवसेनेने मिळवला. आणि माकपमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे अनपेक्षितपणे डहाणू मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला. मोदी लाटेत लोकसभा मतदारसंघ गमावणाऱ्या बविआने मात्र नालासोपारा व बोईसर कायम राखत वसई मतदारसंघ देखील ताब्यात घेतला.

राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपचा वारु उधळला: राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले. विष्णू सवरांना आदिवासी विकास मंत्री बनवून जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. लगेचच आलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत सत्तेच्या जाळ्यात अनेकांना ओढून भाजपने सर्वाधिक उमेदवार निवडून आणले. आणि बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना या दोघांच्या सहयोगातून सत्तासूत्रे हाती ठेवली. भाजपमध्ये अनेक आयाराम जमा होऊ लागले. भाजप जिल्ह्यातील एक मजबूत पक्ष बनला. कॉंग्रेसमधून आयात झालेल्या भरत राजपूत व इतर विविध पक्षांतील आयारामांना पक्षात घेऊन डहाणू नगरपरिषदेवर भाजपने झेंडा फडकावला. तलासरी, मोखाडा, विक्रमगड, वाडा या नगरपंचायती व जव्हार नगरपालिका निवडणूकांमध्ये मात्र भाजपने सपाटून मार खाल्ला. तरीही राज्याप्रमाणेच अनेक पक्षातील नेत्यांची भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा होऊ लागली. मग भाजपमध्ये अनेक गट तट देखील निर्माण झाले.

२०१८ ची लोकसभा पोट निवडणूक प्रतिष्ठेची:खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र श्रीनिवास वणगा हे इच्छूक होते. भाजपमध्ये उमेदवारीवरुन खल चालू असताना सेनेने वणगा यांच्यावर जाळे टाकून त्यांना उमेदवारी दिली. वणगांच्या सहानुभूतीचा लाभ होईल अशी सेनेची अटकळ होती. ही जागा राखण्यासाठी भाजपने कॉंग्रेसमधून राजेंद्र गावीत यांना आयात करुन उमेदवारी दिली. ताकद लावून ही निवडणूक जिंकली. सेनेने आगामी निवडणूकीसाठी पुन्हा श्रीनिवास यांची उमेदवारी जाहीर केली. पुढे शिवसेनेबरोबरच्या युतीच्या तहामध्ये ही जागा भाजपने सेनेला दिली. श्रीनिवासच्या नावाने ही जागा मागणाऱ्या शिवसेनेने पुढे, लोकसभा नको आधी आमदार व्हायचे व अनुभव घ्यायचा आहे असे श्रीनिवास यांच्याकडून वदवून घेतले. आणि भाजपमधून निवडून आलेल्या गावीत यांना सेनेत घेऊन उमेदवारी दिली. गावीत निवडूनही आले. देशात पुन्हा एकदा मोदी लाट अवतरली होती. लोकसभा निवडणूकीत भाजला देशभरात यश मिळाले. मात्र लाटांवर निवडणूक लढवायची भाजपला सवय लागली.

२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस व माकप यांच्यात समझोता झाला. या समझोत्यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण झाले. लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला दिल्यामुळे नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दगा दिला. त्यातून डहाणू व विक्रमगड मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली. त्यातून विरोधंकांचे मनोधैर्य वाढले. त्यातच भाजप अति आत्मविश्वासात राहिला. पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण वाढले. पक्षांतर्गत बंडाळी माजली. बंडखोर उमेदवार उभे राहिले. विरोधात वातावरण निर्मिती झाली. तरीही भाजप गाफील राहिले. त्यात भर म्हणून बोईसरमध्ये भाजपने बंडखोर उमेदवार उभा करुन सेनेचा उमेदवार पाडण्याची खेळी खेळली. त्याचे पडसाद डहाणू व विक्रमगड मतदारसंघात उमटले. आणि अखेर भाजपचे पानिपत झाले. आता जिल्ह्यात भाजप नव्याने उभारी घेऊ शकेल का, हे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२०१४ ते २०१९ जिल्ह्यात विरोधी पक्ष अस्तित्वात नव्हता. बहुजन विकास आघाडीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. शिवसेना सरकारमध्ये सामील होती. माकप आणि राष्ट्रावादी कॉंग्रेस यांचा प्रभाव मावळायला लागला होता. कॉंग्रेसचे अस्त्तित्व दुर्बिणीतून शोधण्याइतके नाममात्र झाले होते. जिल्हा परिषदेत देखील भाजप, शिवसेना आणि बविआ यांची संयुक्त सत्ता होती. विरोधी पक्ष अस्तित्वात नव्हता. अस्तित्वापुरत्या विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचा एक पाय भाजप किंवा सेनेत होता. आता परिस्थितीत बदल झाला आहे. विरोधी पक्षाला अस्तित्व आणि बळ मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व माकपचे प्रत्येकी एक असे सत्तेत सामील होण्याची शक्यता कमी असलेले आमदार जिल्ह्याला मिळाले आहेत. शिवसेना सत्तेत असली तरी विरोधी पक्षाच्या भूमिकेतच असते. आणि बहुजन विकास आघाडी पुर्वानुभव लक्षात घेता सहयोगी सदस्य बनेल असे वाटत नाही. भाजप आणि सेना या दोघानांही वाढण्यासाठी बविआच्या ताब्यातील ३ जागांवर भविष्यात डोळा ठेवावाच लागेल, हे वास्तव बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी ओळखलेच असेल.  यातून सामान्य माणसाला आश्वस्त करणारे चित्र उभे राहील. एकंदरीतच २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे निकाल पॉलिटिकल करेक्शन करणारे आहेत असे म्हणता येईल.

PDF स्वरूपात बातमी वाचण्यासाठी या LINK वर CLICK करा!

Print Friendly, PDF & Email

comments