पालघर जिल्ह्यात शिट्टीचाच आवाज

0
1159
 • बहुजन विकास आघाडीकडे 3 जागा
 • शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपला प्रत्येकी 1 जागा
 • भाजपने दोन्ही जागा गमावल्या
बोईसर येथील मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करताना बविआचे कार्यकर्ते

सुशिल बागुल/बोईसर, दि. 24 : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये पालघर जिल्ह्यातील 6 जागांपैकी 3 जागा स्वतःकडे राखण्यात बहुजन विकास आघाडीला यश आले आहे. वसई मतदारसंघातून स्वतः हितेंद्र ठाकूर, नालासोपारा मतदारसंघातून क्षितिज ठाकूर यांनी विजय मिळवला. तर बोईसर मतदारसंघातून राजेश पाटील बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत गेलेले विलास तरे यांना पराभूत करुन मतदारसंघ बविआकडेच राखला. पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीनिवास वणगा विजयी झाल्यामुळे हा सेनेचा बालेकिल्ला सेनेकडे राहिला आहे. भाजपच्या ताब्यातील विक्रमगड व डहाणू हे दोन्ही मतदारसंघ भाजपने गमावले आहेत. विक्रमगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा यांनी डॉ. हेमंत विष्णू सवरा यांचा एकतर्फी पराभव केला. डहाणू मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांनी भाजपच्या पास्कल धनारे यांना घरी बसवले आहे.

राज्यभरात सोमवारी (दि.21) विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या होत्या. यावेळी पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकुण 59.5 टक्के मतदान झाले होते. तर 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज, गुरुवारी (दि. 24) या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. डहाणू विधानसभा मतदार संघात 24 मतमोजणी फेर्‍या, विक्रमगड 25 फेर्‍या, पालघर 23 फेर्‍या, बोईसर 20 फेर्‍या, नालासोपारा 25 फेर्‍या व वसई मतदार संघात 17 फेर्‍यानंतर अंतिम निकाल हाती आले.

बोईसरमध्ये बविआचे राजेश पाटील विजयी

बोईसर मतदार संघ खात्रीने काबीज करता यावा या उद्देशाने शिवसेनेने येथील बविआचे विद्यमान आमदार विलास तरे यांना पक्षात घेत त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र येथून निवडणूक लढण्यास इच्छूक असलेले भाजपाचे संतोष जनाठे यांनी बंडखोरी करुन तरेंच्या विजयात अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे येथे विलास तरे, संतोष जनाठे व बविआचे राजेश पाटील अशी तिरंगी लढत होणार हे निश्‍चित होते. आज सकाळी निकाल येण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासुन 12 व्या फेरीपर्यंत राजेश पाटील यांच्यापेक्षा सुमारे 10 हजाराच्या मताधिक्याने विलास तरे आघाडीवर होते. यावेळी आपला विजय निश्‍चित झाल्याच्या भावनेतून शिवसैनिकांनी जल्लोष देखील सुरु केला होता. मात्र शेवटच्या 3-4 फेर्‍यांमध्ये चित्र पालटले व राजेश पाटील यांनी 2752 मतांची निर्णायक आघाडी घेत तरेंचा पराभव केला. राजेश पाटील यांना 78 हजार 703 तर तरे यांना 75 हजार 951 मते मिळाली. तरेंच्या पराभवामागे संतोष जनाठे यांची बंडखोरी महत्वाचे कारण ठरले असुन तिसर्‍या क्रमांकाची 30 हजार 952 मते जनाठेंना मिळाली. मनसेचे दिनकर वाढाण 14 हजार 780 मते मिळवत चौथ्या स्थानी राहिले.

लढाई भाजप विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध शिवसेना व भाजप विरुद्ध शिवसेना लढायांचा विरोधी पक्षांना फायदा
भाजप व सेनेने आयाराम उमेदवारांना प्राधान्यक्रम दिल्याने त्यातून कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. अंतर्गत खदखद निर्माण झाली होती. त्यातच भाजप व सेनेच्या छुप्या युद्धामध्ये दोन्ही पक्ष घायाळ झाले. भाजपने बोईसर मतदारसंघात संतोष जनाठे हा संघ परिवाराची पार्श्वभूमी असलेला बंडखोर उमेदवार उभा करुन त्याला रसद पुरवली. संपूर्ण भाजप त्याच्या पाठीशी उभी केली. शिवसेनेला पराभूत करण्यात भाजपला यश आले मात्र डहाणू व विक्रमगड मतदारसंघात शिवसैनिकांची नाराजी ओढवून घेतली. अंतर्गत गटबाजीने त्यात मोठी भर घातली आणि दोन्ही मतदारसंघातून भाजप हद्दपार झाली. त्याचवेळी बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपने एकदिलाने काम करुन जिल्ह्यात आघाडीचे एकतर्फी वर्चस्व निर्माण केले आहे.

डहाणूत चुरशीच्या लढतीत माकपचे विनोद निकोले विजयी

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 24 : डहाणू मतदार संघातील मत मोजणी सेंट मेरीज हायस्कूलच्या आवारात कडेकोट बंदोबस्तात करण्यात आली. प्रत्येक फेरीनंतर उत्कंठा शिगेला पोहोचवणारी अशी चुरशीची लढत झाली. सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीतील पहिल्या फेरीच्या निकालात महायुतीचे उमेदवार पास्कल धनारे यांनी 940 मतांची आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत हीच आघाडी कमी होऊन 602 वर आली. तिसर्‍या फेरीत महा आघाडीचे उमेदवार विनोद निकोले यांनी पिछाडी भरून काढली व 1629 मतांची आघाडी घेतली. हीच आघाडी सहाव्या फेरीपर्यंत टिकून रहिली. त्यानंतर सातव्या, नवव्या व सोळाव्या फेरीत पिछाडी भरून काढून धनारे यांनी अनुक्रमे 12,106 व 275 मतांची नाममात्र आघाडी घेतली. परंतु एकंदरीत मतमोजणीत निकोले यांनी कमी अधिक प्रमाणात आपले मताधिक्य कायम राखले. 22 व्या फेरीनंतर विनोद निकोले यांची आघाडी कायम राहिल्याने महायुतीच्या प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.

रेशन दुकानदार विरुद्ध काळाबाजार विरोधी
डहाणूचे पराभूत आमदार हे रेशन दुकानदार व परमिटरुमच्या व्यवसायात आहेत व कोट्याधीश आहेत. तर विनोद निकोले हे डहाणू तालुक्यातील रेशन दुकान व केरोसीनच्या काळाबाजार रोखण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले. त्यासाठी सतत संघर्ष करित राहिले. ते सामान्य कार्यकर्ते असून त्यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्याकडे साधे पॅन कार्ड देखील नाही. माकपने उमेदवाराची सांपत्तिक स्थिती न बघता एका कार्यकर्त्याला आमदार बनण्याची संधी दिली आहे.

डहाणू मतदार संघातील एकूण मतमोजणीच 24 फेर्‍यात होणार होती. परंतु मतमोजणीच्या वेळी तीन यंत्रांत बिघाड झाल्याने त्यातील मतमोजणी 25 व्या फेरीत जाहीर करण्यात आली. त्यामुळे 25 व्या अंतिम फेरीअखेर मार्कस्वादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विनोद निकोले यांना 72 हजार 68 व महायुतीचे उमेदवार पास्कल धनारे यांना 67 हजार 326 मते मिळाली. माकपचे विनोद निकोले 4 हजार 286 मतांनी विजयी झाले. मनसेचे उमेदवार सुनील लहान्या इभाड यांनी 6 हजार 319 मते मिळवून धनारे यांच्या विजयात अडचण आणल्याचे पाहायला मिळाले. विद्यार्थी परिषद व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते रमेश मलावकर यांनी प्रारंभी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करुन मुदतीनंतर माघार घेतली. त्यामुळे त्यांनाही 2 हजार 235 मते मिळाली. एकंदरीत निवडणुकीत विविध पक्षांचे 10 उमेदवार होते परंतु खरी लढत अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार पास्कल धनारे आणि महाआघाडीचे उमेदवार विनोद निकोले यांच्यातच झाली.

एकंदरीतच निवडणुकीत मतदारांना गृहीत धरणे किती महागात पडू शकतं हे दिसून आले. अपेक्षितच निकाल लागल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

पालघरमध्ये पुन्हा भगवा फडकला

वैदेही वाढाण/पालघर, दि. 24 : पालघर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा विजय झाला असून महायुतीचे काँग्रेसचे उमेदवार योगेश नम यांचा त्यांनी पराभव करून पालघरचा बालेकिल्ला राखला. वणगा यांना 68 हजार 40 मतं तर योगेश नम यांना 27 हजार 735 मते मिळाली असून 40 हजार 305 मताधिक्याने वनगा विजयी झाले आहेत.

गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये पालघर विधानसभेमध्ये महायुतीने 60 हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र या निवडणुकीत त्याहून अधिक मताधिक्याने विजय प्राप्त करण्याचा सेनेचा मानस होता. विशेष म्हणजे येथे वनगांविरुद्ध सक्षम विरोधी उमेदवार नसल्याने मोठ्या फरकाने निवडणूक जिकण्याची शिवसेनेची आशा पल्लवीत झाली होती. मात्र वाढवण बंदराविरोधात अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने तसेच बहिष्कार टाकणारी सर्व गावे शिवसेना-भाजपा चा बालेकिल्ला होती. त्यामुळे मतांची संख्या हजारोंनी कमी झाल्याचा शिवसेनेचा दावा आहे.

विवेक पंडित व विश्वनाथ पाटील यांची किमया चालली नाही
भाजपमध्ये अलीकडे दाखल झालेले श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित व कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांच्यामुळे विक्रमगड मतदारसंघात भाजपचा विजय सोपा होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र हे दोन्ही नेते भाजप उमेदवाराला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील भुसारा विजयी,
मतदारांच्या नाराजीचा डॉ. हेमंत सवरांना फटका

मनोज कामडी/जव्हार दि. 24 : 129 विक्रमगड विधानसभा मतदार संघातून महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील भुसारा विजयी झाले आहेत. त्यांनी माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे पुत्र डॉ. हेमंत सवरा यांचा तब्बल 21 हजार 520 मतांनी पराभव केला. भुसारा यांना 88 हजार 425 तर डॉ. हेमंत सवरांना 67 हजार 26 मते मिळाली.

विक्रमगड मतदार संघात महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, सिपीएम, बहुजन विकास आघाडी, वंचित बहूजन आघाडी, कष्टकरी संघटना या मित्रपक्षांनी एकत्र येऊन तळागाळापर्यंत प्रचार केला. महाआघाडीच्या एकही वरिष्ठ नेत्याची येथे प्रचार सभा झाली नाही. तरीही भुसारा यांनी भाजपाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून येथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. तर मंत्री विष्णू सवरा यांनी विक्रमगड मतदार संघात काहीच विकास कामे न केल्याचे सांगत नागरिकांची विशेषत: तरुणांची त्यांच्याविरुद्ध मोठी नाराजी होती. त्याचा फटका डॉ. हेमंत सवरांना बसल्याचे मानले जात आहे.

वसई व नालासोपारा पुन्हा बविआकडे

वसई मतदार संघात बविआचे विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर पुन्हा विजयी झाले असुन त्यांनी शिवसेनेच्या विजय पाटील यांचा 27 हजार 218 मताधिक्याने पराभव केला आहे. ठाकूर यांना 97 हजार 244 तर पाटील यांना 70 हजार 26 मते मिळाली. तर नालासोपारा मतदार संघात विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी शिवसेनेच्या प्रदिप शर्मांचा पराभव केला आहे. क्षितीज ठाकूर यांना 1 लाख 49 हजार 868 मते मिळाली असुन त्यांनी 43 हजार 729 मतांनी शर्मांना पराभवाची धूळ चारली. शर्मा यांना 1 लाख 6 हजार 139 मते मिळाली.

विजयी उमेदवार

उमेदवाराचे नाव (पक्ष) मिळालेली मते

 • 131- बोईसर मतदारसंघ
  राजेश पाटील – ( बहूजन विकास आघाडी) – 78703
  विलास सुकुर तरे – (शिवसेना) – 75951
  संतोष जनाठे – (अपक्ष) – 30952
  दिनकर दत्तात्रेय वाढाण – (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) – 14780
  प्रा. राजेशसिंग कोळी – (वंचित बहूजन आघाडी) – 2882
  रुपेश रामचंद्र धांगडा-(संघर्ष सेना)- 1986
  सूनिल दशरथ गुहे- (बहूजन समाज पार्टी) – 1857
  श्याम अनंत गवारी (भारतीय ट्रायबल पार्टी)-1119
  नोटा- 4622
 • 128-डहाणू मतदारसंघ
  विनोद भिवा निकोले -(माकप)- 72114
  पास्कल जान्या धनारे – ( भारतीय जनता पार्टी ) – 67407
  सुनिल लहान्या ईभाड – (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) – 6332
  राजेश रावजी दूमाडा – (बहूजन समाज पार्टी ) – 2671
  प्रविण नवशा वळवी – (भारतीय ट्रायबल पार्टी ) – 2069
  विजय काकड्या घोरखाना – (बहूजन मूक्ती पार्टी ) – 1467
  शिलानंद बिना काटेला – (वंचित बहूजन आघाडी) – 1384
  संतोष किसन पागी – (आंबेडकर राईट पार्टी ) – 2648
  रमेश जानू मलावकर – (अपक्ष ) – 2242
  दामोदर शिराड रांधे – (अपक्ष ) – 2823
  नोटा -4824
 • 130-पालघर मतदारसंघ
  श्रीनिवास चिंतामण वनगा (शिवसेना) 67835
  योगेश शंकर नम (काँग्रेस) 27687
  उमेश गोपाळ गोवारी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 12794
  सुरेश गणेश जाधव (बहूजन समाज पार्टी) 2192
  विराज रामचंद्र गडग (वंचित बहूजन आघाडी) 11461
  नोटा 7117
 • 129-विक्रमगड मतदारसंघ
  सुनिल चंद्रकांत भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस) 88425
  डॉ. हेमंत विष्णू सवरा (भारतीय जनता पार्टी) 67026
  सुरेश भाऊ भोईर (कम्यूनिष्ट पार्टी ऑफ इंडिया) 3882
  संजय रघूनाथ घाटाळ (बहूजन समाज पार्टी) 1276
  कमा धर्मा टबाले (रेव्होलुशनरी मार्क्सिस्ट पार्टी) 4032
  मोहन बारकू गुहे (भारतीय ट्रायबल पार्टी) 1481
  सखाराम बाळू भोईर (माक्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी) 2043
  संतोष रामदास वाघ (वंचित बहूजन आघाडी) 1751
  प्रमोद येदू डोके (अपक्ष) 1659
  भालचंद्र नवसू मोरघा (अपक्ष) 2771
  नोटा 8495
 • 132-नालासोपारा मतदारसंघ
  क्षितीज हितेंद्र ठाकूर (बहूजन विकास आघाडी) 149868
  प्रदिप रामेश्वर शर्मा, (शिवसेना) 106139
  सलमान अब्दुल करीम बलूच (बहुजन समाज पार्टी ) 1044
  राकेश विश्वनाथ अरोरा (हिदूस्थान जनता पार्टी ) 375
  प्रविण प्रकाश गायकवाड (वंचित बहूजन आघाडी ) 3487
  मोहसिन मोहम्मद शरिफ शेख (बहुजन महापार्टी ) 282
  हितेश प्रदीप राऊत, ( संघर्ष सेना ) 1393
  अमर किसन कवळे (अपक्ष) 407
  ओमकार सुधाकर शेट्टी (अपक्ष) 259
  परेश सूकूर घाटाळ (अपक्ष) 1082
  मुझफ्फर जूलकर व्होरा (अपक्ष) 145
  डॉ. विजया दत्ताराम समेळ (अपक्ष) 535
  सतीश सिताराम वारेकर (अपक्ष) 171
  सुशांत मधूकर पवार (अपक्ष) 663
  नोटा 3221
 • 133-वसई मतदारसंघ
  हितेंद्र विष्णू ठाकूर (बहूजन विकास आघाडी) 102468
  अंतोन व्हिक्टर डिकूना (बहूजन समाज पार्टी) 1282
  प्रफूल्ल नारायण ठाकूर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 3523
  विजय गोविंद पाटील (शिवसेना) 76632
  शाहीद कमाल शेख (वंचित बहूजन आघाडी) 1556
  सुनील मणि सिंह (अपक्ष) 663
  नोटा 3018
Print Friendly, PDF & Email

comments