सफाळ्यात तीन गावठी बनावटीच्या बंदुका जप्त!

0
1625
  • बंदुका बनविण्यासाठी लागणार्‍या 7 नळ्या, 21 जिवंत काडतुसे व 84 छर्रेही जप्त
  • पालघर दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई

राजतंत्र मिडीया/पालघर, दि. 16 : तालुक्यातील सफाळे येथून दहशतवाद विरोधी पथकाने मोठ्या प्रमाणावर गावठी बनावटीची शस्त्रे जप्त केली असुन यात 3 सिंगल बोअर बंदुका, 7 बंदुका बनविण्यासाठी लागणार्‍या नळ्या, 21 जिवंत काडतुसे व 84 छर्रे आदींचा समावेश आहे. चिमा शिड्या बरफ (वय 56) या इसमाने बेकायदेशीररित्या ही शस्त्रे बाळगली होती.

सफाळ्यातील सोनावे फोंडापाडा या गावातील चिमा बरफ या व्यक्तीच्या घरी मोठ्या प्रमाणावर शस्त्र असल्याची माहिती पालघर दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीवरुन, आज बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास दहशतवाद विरोधी कक्षाने बरफ याच्या घरी छापा टाकला असता येथे 3 गावठी बनावटीच्या सिंगल बोअर बंदुका, 21 जिवंत काडतुसे, नवीन बंदुका बनविण्यासाठी 7 नळ्या, 84 शिश्याचे मोठे वेगवेगळया आकाराचे छर्रे व 1900 ग्रॅम वजनाचे लहान छर्रे असे साहित्य आढळून आले. यानंतर दहशतवाद विरोधी कक्षाने सदर शस्त्रे जप्त केली असुन चिमा बरफ याला ताब्यात घेतले आहे.

तसेच त्याच्याविरोधात सफाळा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3,5,6,25 सह महाराष्ट्र पोलीस सुधारणा अधिनियम 2014 चे कलम 37(1)(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सानप याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments