कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान महोत्सव संपन्न

0
1542

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 6 : तालुक्यातील कोसबाड हिल येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रात 2 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत पोषण आधारित शेती पद्धती या संकल्पनेला अनुसरून कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवाचे उद्घाटन कृषी भूषण यज्ञेश सावे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना व्यावसायिक शेती कशी करावी याबाबत स्वानुभाववरून सविस्तर मार्गदर्शन केले. तर केंद्राचे शास्त्रज्ञ अशोक भोईर आणि उत्तम सहाणे यांनी भाजीपाला पीक संवर्धन व संरक्षण याविषयी अभ्यासपूर्ण माहिती देऊन शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन केले. केंद्राच्या गृह विज्ञान शास्त्रज्ञ रूपाली देशमुख यांनी पोषण आधारित शेती पद्धतीवर सखोल असे मार्गदर्शन केले. कंदवर्गीय भाजीपाला पिकांबाबत कर्जत येथील प्रादेशिक भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नामदेव म्हसकर यांनी मार्गदर्शन केले. महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांची सविस्तर माहिती कृषी अधिकारी सुनिल बोरसे यांनी दिली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव प्रिं. प्रभाकर राऊत यांनी कृषी केंद्राच्या कार्याबद्दल स्तुती करून आधुनिक शेती केल्यानेच उत्पादन व उत्पन्न वाढू शकते असे मत व्यक्त केले. तसेच आपल्या जमिनी विकू नका, असे कळकळीचे आवाहन केले.

महोत्सवा दरम्यान, प्रात्यक्षिक प्रक्षेत्र भेटीचेही आयोजन केले करण्यात आले होते. या भेटीमध्ये भात लागवडीच्या विविध पध्दती, वेगवेगळी पीक प्रात्यक्षिके, पोषण आहार बगीचा, रोपवाटिका, कुक्कुटपाालन, शेळीपालन, मधमाशीपालन आदींबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे प्रमुख विलास जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे, मंगला भांगे, अनिलकुमार सिंग, दिपक ढाक, राजेश आले, संदेश ढाक तसेच प्रसाद कासले, विपूल साळुंके व चेतन उराडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Print Friendly, PDF & Email

comments