
शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 1 : डहाणू तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे सन 2018-19 चे वार्षिक अधिवेशन 29 सप्टेंबर रोजी संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली डहाणू येथील लायन्स क्लबच्या सभागृहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्ह्याचे कोषागार अधिकारी रामसिंग तडवी व विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विनायक शेळके, संघाचे उपाध्यक्ष भालचंद्र चुरी, सह सचिव हेमंत राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर मागील वर्षभरात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. विनायक चुरी यांनी प्रास्ताविक करताना संघाने मागील वर्षभरात केलेल्या कामाची, राबविलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना करुन दिली तसेच भविष्यातील विविध योजनांची माहिती दिली. सह सचिव राऊत यांनी मागील सभेचे इतिवृत्त व मागील वर्षीचा जमाखर्च वाचून त्यास मंजुरी देण्यात आली. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे तडवी यांनी हयातीचा दाखला दरवर्षी वेळेतच सादर करण्याचे महत्त्व विशद करून, तसे न केल्यास होणार्या दुष्परिणामांची माहिती दिली. विनायक शेळके यांनी सातवा वेतन आयोगातील तरतूदी व अप्रशिक्षित शिक्षकांना निवृत्ती वेतन या संबंधीची सविस्तर माहिती दिली.

दरम्यान वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या सभासदांचा गुलाब पुष्प, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या पाल्यांना गुलाब पुष्प व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. तालुका पातळीवर उत्कृष्ट सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून हेमंत धानमेहेर (कासा), मुरलीधर माच्छी (डहाणू), दिनकर राऊत (बोर्डी), हरिश्चंद्र जाधव (बाडापोखरण) व प्रकाश पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर पालघर जिल्ह्याचे उप लेखापाल ज्ञानेश पुरंदरे यांनी सेवानिवृत्तांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कामाबाबत त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डहाणू, चिखला, वाणगाव, चिंचणी, आशागड, घोलवड व बोर्डी विभागांतील सभासद अधिवेशनाला उपस्थित होते. नवरात्राचा पहिला दिवस अर्थात घटस्थापना असल्याने बर्याच सभासदांच्या उपस्थितीवर त्याचा परिणाम झाला.
प्रकाश पाटील यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाच्या सभासद सौ. आशा वर्तक यांनी खुमासदार शैलीत करून कार्यक्रमात रंगत आणली. शेवटी स्नेह भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.