प्रदुषणकारी कंपन्यांवर कारवाई होणार!

0
875
  • प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी केली पाहणी
  • विविध ग्लोबल व निपुर केमिकल कंपनीत हवेचा दर्जा तपासणारे यंत्र बसवले

वार्ताहर/बोईसर, दि. 27 : तारापूर औद्योगिक परिसरातील विविध ग्लोबल व निपुर केमिकल या दोन कारखान्यांमधुन रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर विषारी वायू सोडला जात असल्याचे समोर आल्यानंतर प्रदूषण मंडळाने याची दखल घेत सदर कंपन्यांमध्ये हवेचा दर्जा तपासणारे यंत्र बसवून पुढील चोवीस तासात कंपनी परिसरातील हवेतील प्रदूषणाची नोंद घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

देशातील मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेली तारापूर औद्यागिक वसाहत सध्या भीषण प्रदुषणामुळे कुप्रसिद्ध झाली आहे. या वसाहतीमध्ये हजारोंच्यावर कारखाने कार्यरत असून वेगवेगळे उत्पादन या कारखान्यांमधून होत असते. मात्र यातील अनेक कारखान्यांकडून नियमांचा भंग करुन मोठ्या प्रमाणावर जल व वायू प्रदुषण केले जात आहे. असाच एक प्रकार बुधवारी (दि.25) रात्रीच्या सुमारास उघडकीस आला. विविध ग्लोबल व नीपुर केमिकल या दोन कारखान्यांमधुन बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणावर विषारी धूर वातावरणात सोडण्यात येत असल्याचे समोर आले होते. यामुळे सालवड ते चित्रालय या मुख्य रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या नागरिक व कामगारांना तसेच एमआयडीसी परिसरालगत असलेल्या गावातील नागरीकांना डोळ्यांना जळजळ व श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याचप्रमाणे संपूर्ण परिसर या वायू प्रदूषणाने धुकट बनल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे देखील कठीण झाल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

संबंधित बातमी : तारापूर एमआयडीसीत रात्रीच्या सुमारास विषारी वायू प्रदुषण!

याबाबत दैनिक राजतंत्रसह इतर काही वृत्तपत्रांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकाराची दखल घेत प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अर्जुन जाधव यांनी स्वतः विविध ग्लोबल व नीपुर केमिकल या कारखान्यांमध्ये जाऊन पाहणी केली. तसेच तेथे हवेचा दर्जा तपासणारे यंत्र बसवून पुढील चोवीस तासात कंपनी परिसरातील हवेतील प्रदूषणाची नोंद घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments