मटण खाताय? तर सावधान; मृत शेळ्या-मेंढ्या जाताहेत कत्तलखान्यात

0
645
  • वाडा पोलिसांनी केला पर्दाफाश
  • वाड्यात मृत व मरतुकड्या शेळ्या-मेंढ्या घेऊन जाणारी 2 वाहनं पकडली

प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : शहरातील खंडेश्वरी नाका येथे आज, पहाटेच्या सुमारास वाडा पोलीस गस्त घालत असताना नाशिक मालेगाव येथून येणार्‍या दोन संशयित पिकअप गाड्यांची तपासणी केली असता या गाड्यामंध्ये 103 शेळ्यामेंढ्या पालघर जिल्ह्यात कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील 35 शेळ्या मेंढ्या मृत तर इतर शेळ्यामेंढ्या मरणासन्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी पिकअप चालकांसह अन्य आरोपींना ताब्यात घेतले असून या कारवाईने मृत व मरतुकड्या शेळ्या मेंढ्या कत्तलखान्यात पोहचविणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज, गुरुवारी (दि. 26) पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डोरकर, पोलीस हवालदार सतीश शेळवले व संजय दराडे यांचे पथक खंडेश्वरी नाका येथे गस्तीवर असताना एम.एच.41/ए.जी. 0331 आणि एम.एच. 17/ए.जी. 954 या दोन पिकअप गाड्यांना तपासणीसाठी अडविण्यात आल्या. यावेळी या गाड्यांमध्ये 103 शेळ्यामेंढ्या आढळून आल्या. यामधल्या 35 शेळ्या-मेंढ्या मेलेल्या आढळल्या तर उर्वरित शेळ्यामेंढ्या मरणासन्न अवस्थेत आढळल्या. यानंतर पोलिसांनी दोन्ही पिकअपचे चालक व त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या साथिदारांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या मृत शेळ्या-मेंढ्या कत्तलीसाठी नेऊन त्यांचे मांस मुंबई किंवा अन्य ठिकाणच्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये विक्रीसाठी नेले जात असावे, असा संशय व्यक्त होत असुन एकूणच पालघर जिल्ह्यातील कत्तलखान्यांविषयी नागरिकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.

या प्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 429, 34 सह प्राण्यांना क्रूरतेची वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 तसेच मोटर वाहन कायदा कलम 3/181-130(3)/177, 146/196, महाराष्ट्र मोटर वाहन कायदा 83/177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी यांनी दिली.

Print Friendly, PDF & Email

comments