पालघर जिल्ह्यात चिकू संशोधन केंद्र सुरू करणार! -खा. राजेंद्र गावित

0
1153

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : डहाणू, बोर्डी व घोलवडमध्ये प्रसिद्ध असलेल्या चिकू फळपिकाच्या पार्श्‍वभुमीवर चिकू उत्पादक व बागायतदारांसाठी जिल्ह्यात चिकू संशोधन केंद्र सुरू करण्यात येणार असुन त्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरवठा करणार असल्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले. डहाणू शिवसेनेच्या वतीने डहाणू व तलासरी तालुक्याकरिता काल, शनिवारी खासदार आपल्या दारी या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा. गावित बोलत होते.

डहाणू तालुक्यातील मसोली येथील दशाश्री माळी वाणीक समाज सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खासदार गावित यांनी लोकसभा निवडणूकीनंतर प्रथमच येथील नागरीकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी सामाजिक तसेच वैयक्तिक प्रश्न मांडून आपल्या समस्या व मागण्यांचे निवेदन खा. गावित यांना दिले. यात रेल्वे, रस्ते, वाढवण बंदर, पाणीपुरवठा, जमिनीसंदर्भातील वैयक्तीक प्रश्न, घरकुल, नोकर्‍या, अतिक्रमण, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता. तर गावित या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

या कार्यक्रमास शिवसेनेच्या पालघर जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, उपजिल्हा प्रमुख संतोष शेट्टी, उपजिल्हा महिला संघटक वैदेही वाढाण, तालुका प्रमुख संजय कांबळे, शहर प्रमुख संजय पाटील, शहर महिला संघटक व नगर सेविका श्वेता पाटील, नगरसेवक वासू तुंबडा, प्रांत अधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग आदी उपस्थित होते.

वाढवण बंदराला कायम विरोधच
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर पुन्हा डोके वर काढलेल्या वाढवण बंदराचा प्रश्‍नही यावेळी मांडण्यात आला. त्यावर या बंदराला माझा कायमच विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या बंदराला विरोध दर्शविल्याने आमची भूमिका स्पष्ट असल्याचेही गावित म्हणाले.

Print Friendly, PDF & Email

comments