डहाणू : जनावरांची चोरी करणार्‍या टोळीतील एकाला अटक, तिघे फरार

0
2981

तिघे फरार, कासा पोलिसांची कारवाई

संग्रहित छायाचित्र

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 11 : कासा व आजुबाजूच्या परिसरातील मोकाट जनावरे चोरी करणार्‍या टोळीतील एकाला गाय चोरी करताना रंगेहाथ अटक करण्यात कासा पोलिसांना यश आले आहे. तर त्याचे तीन साथिदार अंधाराचा फायदा घेत निसटण्यात यशस्वी ठरले आहेत. शरीफ युसुफ काझी (वय 49, रा. नालासोपारा गाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असुन त्याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये जनावरे चोरीचे 12 गुन्हे दाखल आहेत.

कासा व आजुबाजूच्या परिसरात मागील काही महिन्यांपासुन जनावरे चोरीचे अनेक गुन्हे घडत होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र काही स्थानिक लोक मदत करत असल्याने सदर चोरटे पोलिसांना चकवा देत फरार होत होते. गेल्या एप्रिल महिन्यात जनावरे चोरणार्‍या एका टोळीने पोलिसांवरच हल्ला करुन पळ काढला होता. त्यामुळे पोलिसांसमोर अशा गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

नुकतीच कासा पोलिसांना 9 सप्टेंबर रोजी डहाणू तालुक्यातील मुरबाड येथे जनावरे चोरी करणारी टोळी चोरी करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावेळी मात्र पोलिसांनी साध्या वेशात व स्थानिक गावकर्‍यांना सोबत घेत संबंधित ठिकाणी सापळा रचला असता एम.एच. 04/डी. बी. 7185 या क्रमांकाची स्विफ्ट कार व एम. एच. 43/बी. बी. 736 या क्रमांकाचा छोटा हत्ती टम्पो अशा दोन वाहनातून आलेल्या 4 जणांच्या टोळीने मुरबाड-धांगडपाडा येथील तुळसीराम चितू धांगडा यांच्या मालकीची एक गाय पिकअप गाडीत भरुन दुसरी गाई पिकअपमध्ये भरीत असतानाच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी कारवाई केली. यावेळी चौघांपैकी एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. तर त्याचे अन्य तीन साथिदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहेत.

दरम्यान, अटक आरोपी शरीफ काझी व त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 379, 34 सह महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा 1973 चे सुधारणा 2015 कलम 5(अ),(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व चोरी गेलेली एक गाई जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, शरीफ काझी या आरोपीविरोधात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये 6, विरार पोलीस स्टेशनमध्ये 2, माणिकपुर पोलीस स्टेशनमध्ये 1 व कासा पोलीस स्टेशनमध्ये 3 असे एकुण 12 गुन्हे दाखल आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments