बोईसर : नैसर्गिक नाल्यावर आतिक्रमण, 550 सदनिकांना बसतोय पावसाचा फटका

0
3474

वार्ताहर/बोईसर, दि. 8 : येथील संजय नगर भागातून वाहणार्‍या नैसर्गिक नाल्यावर तसेच नाल्याच्या भोवती मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे अमेय पार्क, भागीरथ अपार्टमेंट, शिव गोविंद नगर आदी वसाहतींमधील सुमारे 550 सदनिकाधारकांना अतिवृष्टीनंतर उद्भवणार्‍या पूरजन्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे येथील घरांमध्ये पाणी शिरुन तसेच विद्यार्थी व नोकरदार मंडळी घरामध्येच अडकून बसत असल्याने त्यांचे विविध प्रकारे नुकसान होत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली आहे.

संजय नगर मधून वाहणार्‍या नैसर्गिक नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून एकेकाळी 15 ते 20 फूट रुंदीचा हा नाला सद्यस्थितीत पाच ते दहा फुटांवर येऊन ठेपला आहे. यामुळे बोईसर शहरातून वाहणारे पावसाचे पाणी या नाल्या लगतच्या परिसरामध्ये साचून गृह संकुलांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. अशावेळी तळमजल्यावर असणार्‍या सदनिकांमध्ये एक ते दीड फूट पाणी साचत असल्याने तेथील रहिवाशांना अनेक अडचणींचा व नुकसानीचा सामना करावा लागतो. तसेच अनेक ठिकाणी चार ते पाच फूट पाणी साचत असल्याने मुख्य रस्त्याशी संपर्क तुटतो. यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार व कर्मचार्‍यांना घरामध्ये बंदिस्त होऊन राहावे लागते. त्याचबरोबर संकुलांमध्ये उभ्या ठेवलेल्या वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

दरम्यान, पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही दिवस परिसरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच या साचलेल्या पाण्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाल्याने रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे येथील रहिवासी संघाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांसह संबंधित शासकीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नाल्यावर झालेले अतिक्रमण हटवण्याबाबत येथील रहिवाशांनी पंधरा वर्षांहून अधिक काळापासून पाठपुरावा करुन देखील याबाबत प्रशासनाने कोणताही ठोस कारवाई न केल्याने सुमारे 550 ते 600 कुटुंबाना दर पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागत असल्याचे सदर निवेदनात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे यासंदर्भात प्रशासनाने तत्काळ ठोस कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments