पालघर : 63 जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुरुवात

0
5545
संग्रहित छायाचित्र

शाळेचा पट वाढवण्यासाठी पालघर गटशिक्षण अधिकार्‍यांचा उपक्रम

संग्रहित छायाचित्र

राजतंत्र न्युज नेटवर्क/ पालघर, दि. 4 : लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तसेच पालघर जिल्ह्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 63 शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा आगवण केंद्र उमरोळी या शाळेत या उपक्रमाचे उद्घाटन पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे यांच्या हस्ते सेमी इंग्रजीची पाठ्यपुस्तके वाटप करून करण्यात आले. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके खरेदी करण्यासाठी शिक्षकांनी, केंद्रप्रमुखांनी व काही गावातील सरपंचांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून हातभार लावला आहे.

पालघर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी जिल्हा परिषद शाळांमधील कमी होत चाललेली विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता तसेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी बद्दलचा न्युनगंड याबाबत विचार करुन जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मुलांना पहिलीपासूनच इंग्रजीमध्ये शिक्षण मिळणे महत्वाचे असल्याचे व त्यादृष्टीने कृती करणे गरजेचे असल्याच्या विचारातून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी, जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळांमधील अंतर कमी व्हावे, मराठी माध्यमाच्या मुलांमध्ये देखील इंग्रजीची गोडी वाढावी ही या उपक्रमाची मुख्य उद्दीष्टे असल्याचे मत खताळ यांनी व्यक्त केले आहे.

यादृष्टीने तसे पाऊल उचलत प्रथम एक कॉन्फरन्स घेण्यात आली. या कॉन्फरन्सला केंद्रप्रमुख व केंद्रातील एक उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते. यावेळी सर्व केंद्रप्रमुखांनी व शिक्षकांनी या उपक्रमास पाठिंबा दर्शविला व या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक, आजी माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी सेमी इंग्रजीचे वर्ग आपापल्या केंद्रात सुरु करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तर एका केंद्रात दोन सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू करून तालुक्यात या शाळांची संख्या 63 वरून 100 वर नेण्याचा आमचा मानस आहे, असे गटशिक्षण अधिकारी खताळ यांनी सांगितले.

दरम्यान, सेमी इंग्रजी सुरु झालेल्या शाळांच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक म्हणून उमरोळीचे केंद्रप्रमुख हर्षा पाटील यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments