राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 9 : शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न व आव्हानांबाबत चर्चा घडवून आणणे, वैचारिक देवाणघेवाण करणे, परस्परांच्या अनुभवाचा फायदा करुन घेणे यासाठी शैक्षणिक संस्था व शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींचे एक व्यासपीठ असावे ही संकल्पना साकारण्याच्या उद्देशाने तालुक्यातील कोसबाड येथील नूतन बाल शिक्षण संघातर्फे येत्या शनिवारी (13 जुलै) प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019: अपेक्षा आणि आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शैक्षणिक आकृतीबंधाची प्रस्तावित पुनर्रचना आणि त्याची व्यावहारिकता, 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठीच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या आकृतीबंधाची आवश्यकता आणि आव्हाने, शिक्षणाच्या हक्काची व्याप्ती वाढवून 3 वर्षीय बालक ते 18 वर्षे वयोगटातील युवकांना शिक्षणाचा हक्क देण्याचा प्रस्ताव व त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, शिक्षकांच्या शैक्षणिक कामगिरीचे मुल्यमापन करण्याचा प्रस्ताव आणि त्याची उपयोगिता, शैक्षणिक विषयांची निवड करण्यासाठी उपलब्ध होणारे बहुपर्याय, नवे शैक्षणिक धोरण कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सहाय्यकारी ठरेल का? आदी मुद्द्यांचा या परिसंवादात परामर्श घेतला जाणार आहे.
कोसबाड येथील पद्मभूषण ताराबाई मोडक विद्यानगरी येथे शनिवार, दि. 13 जुलै रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान हा परिसंवाद पार पडणार असुन यासाठी इच्छूकांना कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी अर्थात 10 ते 10.30 वाजेच्या कालावधीत निशुल्क नोंदणी करता येणार आहे. कार्यक्रमस्थळी पोहोचण्याकरीता डहाणूरोड रेल्वेस्थानकापासून वाहतूकीची व्यवस्था तसेच परिसंवादादरम्यान चहापान व स्नेहभोजनाची सोय करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शिक्षणप्रेमींनी या परिसंवाद कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
अधिक तपशिलासाठी संपर्क :-
संजीव जोशी :- 9822283444
सुधीर कामत :- 7020228789
वाहतूक व्यवस्थेशी संबंधित माहितीसाठी संपर्क :- श्री. नाना कदम :- 9226146442